पतंजलीची फेक स्वदेशगिरी पुन्हा उघड; 'किंभो' अॅप केले डिलिट

Thursday, 31 May 2018

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने व्हॉटसअॅपला टक्कर देण्यासाठी काल(बुधवार) 'किंभो' हे स्वदेशी मेसेजिंग अॅप लाँच केले. मात्र चोवीस तासाच्या आतच हे अॅप प्लेस्टोर वरुन गायब झाले. 

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने व्हॉटसअॅपला टक्कर देण्यासाठी काल(बुधवार) 'किंभो' हे स्वदेशी मेसेजिंग अॅप लाँच केले. मात्र चोवीस तासाच्या आतच हे अॅप प्लेस्टोर वरुन गायब झाले. किंभो अॅपच्या सर्व्हर्सवर ट्राफीक जास्त असून त्याचे काम सुरु आहे व लवकरच प्लेस्टोरवर अॅप उपलब्ध होईल असे ट्विटही किंभोच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले मात्र प्लेस्टोर वरून हे अॅप गायब होण्याचे कारण वेगळे असल्याचे बोलले जात आहे.

'किंभो' स्वदेशी चॅट अॅप असून ते भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवले आहे, हे अॅप व्हॉट्सअॅपला टक्कर देईल असा दावा काल पतंजलीने केला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्नियातील एका कंपनीच्या 'बोलो' या चॅट अॅपचे नाव बदलून पतंजलीचे स्वदेशी अॅप तयार झाल्याचे समोर आले आहे. अल्ट न्यूज या इंग्रजी वेबसाईटने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

हे अॅप डाउनलोड केल्यानंतर इंस्टॉल करताना काही ठिकाणी बोलो अॅप असा उल्लेखही दिसुन येतो. www.kimbho.com या वेबसाईटवर दिलेल्या फोटोवरही बोलो अॅप असा उल्लेख असल्याचे अल्ट न्यूजने सांगितले आहे.  ही वेबसाईटही अचानक बंद झाली आहे. सध्या सर्व्हरचे काम सुरु असल्याने वेबसाईट बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गुगलवर बोलो चॅट अॅप सर्च केल्यानंतरही पतंजलीचेच नाव दिसते. 

स्वदेशी समृद्धी सिम कार्ड्स सुरू केल्यानंतर मोठा गाजावाजा करत पतंजलीने या 'स्वदेशी'(?) मेसेजिंग आणि व्हिडिओ चॅट अॅपची घोषणा केली खरी मात्र 24 तासांच्या आतच त्यांच्या या स्वदेशी असण्याच्या दाव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patanjali rebrands an American app as Swadeshi Kimbho chat app