esakal | रेल्वेचे ‘ऑल इन वन’ ॲप
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेचे ‘ऑल इन वन’ ॲप

रेल्वेचे ‘ऑल इन वन’ ॲप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - प्रवाशांना रेल्वेच्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ऑल इन वन’ असलेले ‘एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप’ आणले जाणार आहे. या ॲपवर तिकीट आरक्षणापासून ते टॅक्‍सीही बुक करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल. हे ॲप दोन महिन्यांत सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  

रेल्वेकडून तिकीट सुविधांमध्ये बदल करत प्रवाशांना डिजिटल पर्याय दिला जात आहे. यामध्ये तिकीट आरक्षित करण्यापासून ते प्रवाशांच्या तक्रारी, सूचनांसाठी वेबसाईट, कॅशलेस व्यवहारासाठी तिकीट स्वाईप मशीन, पीएनआर तपासणीसाठी वेबसाईट तसेच हेल्पलाईन नंबर इत्यादींचा समावेश आहे. मात्र, मोठी प्रवासीसंख्या तसेच तिकीट आरक्षणापासून ते अन्य सुविधांसाठी देण्यात आलेले पर्याय यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतानाच बराचसा वेळही जातो. एकंदरीतच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी सर्व सोईसुविधांनी युक्‍त असे एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यावर काम सुरू असून हे ॲप दोन महिन्यांच्या आत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. 

ॲपमध्ये वाहतुकीशी संबंधित उपयोगी अशी सेवा असेल. यामध्ये प्रवास योजना, तिकीट, ट्रेनशी संबंधित प्रश्‍न, भाड्याने टॅक्‍सी घेणे, सामान वाहून नेण्यासाठी हमाल आरक्षित करणे, ई-कॅटरिंग, प्रवासासंबंधित तक्रारी, रेल्वेचे आरामगृह आरक्षित करणे इत्यादी सुविधा उपलब्ध असतील. महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षित आणि अनारक्षित तिकीट सेवेबरोबरच महिन्याचा रेल्वे पास व प्लॅटफॉर्म तिकीटही या ॲपमधून उपलब्ध होईल. 

रांगा कमी होण्याची आशा
ॲपमध्ये सर्व प्रकारच्या तिकिटांसाठी एकच नोंदणी आणि देय प्रकार असेल. अशा प्रकारचे ॲप उपलब्ध झाल्यास तिकीट खिडक्‍यांसमोरील रांगा कमी होतील, अशी आशा रेल्वेला आहे. एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप जून महिन्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार होते; परंतु तांत्रिक कारणास्तव पुन्हा दोन महिन्यांच्या आत प्रवाशांना उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या तिकीट आरक्षण; तसेच प्रवासी तक्रारी, माहितीसाठी वेगवेगळे ॲपही आहेत. त्याऐवजी एकाच ॲपमध्ये सर्व सोई-सुविधा आणण्याचा प्रयत्न आहे.

loading image