लाखोंनी पाहिली"रिंग ऑफ फायर'

पीटीआय
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

 

 

एस्टॅन्शिआ एल मस्टर (अर्जेंटिना) : दुर्मिळ समजले जाणारे आणि खगोलप्रेमी ज्याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असतात, ते कंकणाकृती सूर्यग्रहण (रिंग ऑफ फायर) पाहण्यासाठी आज दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये गर्दी केली होती.
दक्षिण अमेरिकेमध्ये शंभर किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार असल्याने या टप्प्यात येणाऱ्या चिली, अर्जेंटिना, अंगोला, झांबिया आणि कॉंगो येथे या क्षणाचे साक्षीदार ठरण्यासाठी खगोलप्रेमी सज्ज झाले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी बाराच्या थोडे आधी तळपत असणाऱ्या सूर्याला चंद्राने ग्रासले आणि या पट्ट्यामध्ये अंधार पसरला. मात्र, आकाशात सूर्याची कडा धगधगत असल्याचे विलोभनीय दृश्‍य दिसताच खगोलप्रेमींनी जल्लोष केला. हाच जल्लोष आफ्रिकेमध्येही पाहायला मिळाला.
पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत आल्यास सूर्यग्रहण दिसते. मात्र, एका सरळ रेषेत आल्यानंतरही अनेकदा या तिघांमधील अंतरातील फरकामुळे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. त्यामुळे हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.
Web Title: Ring of the fire