टेक्नोहंट : एक पाऊल डिजिटल व्यवहारांकडे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘ई-रुपी’ नावाच्या नव्या पेमेंट प्रणालीचा शुभारंभ केला.
UPI
UPISakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘ई-रुपी’ नावाच्या नव्या पेमेंट प्रणालीचा शुभारंभ केला. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी ‘ई-रुपी’ हा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय आर्थिक व्यवहार करता येणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या या नव्या प्रणालीविषयी....

1) काय आहे ‘ई-रुपी’?

‘ई-रुपी’ हे इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर आणि डिजिटल पेमेंट आधारित आर्थिक व्यवहारांचे एक कॅशलेस माध्यम आहे. ही एक क्यूआर कोड किंवा एसएमएस आधारित ई-व्हाऊचर व्यवस्था असून, त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो. त्यासाठी क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचीही गरज भासणार नाही. प्राथमिक पातळीवर ‘ई-रुपी’ हे प्रीपेड गिफ्ट-व्हाऊचरसारखे असून, ते सुरूवातीला योजनेत समाविष्ट बँकाच्या माध्यामातून देण्यात येणार आहे. लाभार्थ्याला व्हाऊचर द्यायचे असल्यास त्याची ओळख ही मोबाईल क्रमांकावरुन पटवण्यात येईल. त्यानंतर सरकारकडून संबंधित बँकेला त्या लाभार्थ्याच्या नावाने ‘ई-रुपी’ व्हाऊचर देण्यात येईल. या व्हाऊचरची सेवा केवळ लाभार्थ्याच्याच नावाने असेल आणि केवळ त्याच्यापर्यंतच ती पुरवण्यात येणार आहे. हे व्हाऊचर कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय रिडीम केले जाऊ शकते.

2) कोणत्या बँकेत चालणार ‘ई-रुपी’?

सध्या या योजनेत समाविष्ट असलेल्या ११ बँकांपैकी काही बँका केवळ ‘ई-रुपी’ व्हाऊचर जारी करतील, काही बँका केवळ ते स्वीकारतील, तर काही बँका ‘ई-रुपी’ व्हाऊचर जारी करण्यासोबतच ते स्वीकारतीलही. दोन्ही सुविधा उपलब्ध असलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयआयसीआय, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा आदी बँकांचा समावेश आहे.

3) ‘ई-रुपी’ चे फायदे

देशभरात राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकेतील एज्युकेशन व्हाऊचरच्या धर्तीवर भारतात ‘ई-रुपी’ व्हाऊचरची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात कुठलाही मध्यस्थ नसेल किंवा त्याला गळती राहणार नाही. या व्हाऊचरच्या माध्यमातून मदर अॅन्ड चाईल्ड वेलफेअर स्कीम्स, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, औषधे आणि अन्नधान्य अनुदान योजना आदींचा लाभ थेट लाभार्थ्याला देण्यात येणार आहे.

4) कसा होणार वापर?

लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी समजा केंद्र सरकारने लाभार्थ्यांना अनुदान द्यायचे ठरवले; मात्र ज्या नागरिकांकडे बँक खाते नसेल त्यांनाही आर्थिक लाभ देण्यासाठी ‘ई-रुपी’ प्रणाली हा उत्तम पर्याय आहे. लाभार्थ्यांच्या मोबाईलवर सरकारकडून एक क्यूआर कोड पाठवला जाईल. हा कोड घेऊन सदर व्यक्ती लसीकरण केंद्रावर जाईल. सदर कोड स्कॅन करून ओटीपीद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीला लस दिल्यानंतर रोख स्वरूपात अनुदान दिले जाईल. अशाचप्रकारे अन्य योजनांचेही आर्थिक लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com