
सॅमसंगने फाईव्ह-जी सुविधेसह ए-सीरिजमध्ये दोन नवेकोरे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च केले. गॅलेक्सी ए ३४ ५जी आणि गॅलेक्सी ए ५४ ५जी या दोन स्मार्टफोनमधील वैशिष्ट्यांबाबत...
टेक्नोहंट : अग्रगण्य आणि अग्रेसर गॅलेक्सी ए ५४ आणि ए ३४
सॅमसंगने फाईव्ह-जी सुविधेसह ए-सीरिजमध्ये दोन नवेकोरे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च केले. गॅलेक्सी ए ३४ ५जी आणि गॅलेक्सी ए ५४ ५जी या दोन स्मार्टफोनमधील वैशिष्ट्यांबाबत...
सॅमसंग गॅलेक्सी ए ५४ ५जी
संपूर्ण आयताकृती आणि वर्तुळाकार कॉर्नर असलेली डिझाईन; तसेच ६.४ इंची सुपर ॲमोलेड डिस्प्लेमुळे सॅमसंग गॅलेक्सी ए ५४ला आकर्षक लूक मिळाला आहे. हा स्मार्टफोन हाती घेतल्यावर प्रीमियम आणि दर्जेदार स्मार्टफोन असल्याचा फील येतो. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमुळेही स्मार्टफोनला चांगला लूक आला आहे. परंतु जवळपास २०० ग्रॅम वजनामुळे हा स्मार्टफोन थोडा जड वाटतो. १२०Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी रिझोल्युशनमुळे स्मार्टफोन वापरताना चांगला अनुभव येतो. ५० मेगापिक्सल, १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्याच्या मदतीने चांगले फोटोग्राफ काढता येतात.
या कॅमेऱ्यामध्येच गुगल लेन्सप्रमाणे बीक्सबी व्हिजन हे खास फिचर दिले आहे. त्यामुळे एखादा मजकूर भाषांतरित करणे, चित्र वा मजकूर गुगलवर शोधणे, बारकोड वा क्यूआर कोड स्कॅन करणे आदी कामे क्षणार्धात केली जातात. हे फीचर खासच म्हणावे लागेल. यात Samsung Exynos १३८० हा फाईव्ह जी प्रोसेसर असून तो अँण्ड्रॉईड १३ ने सुसज्ज आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व २५६ जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे. परंतु स्मार्टफोनसोबत सॅमसंगने चार्जिंग ॲडाप्टर न देता केवळ केबल दिला आहे. लाईम, ग्राफाईट आणि व्हायलेट अशा रंगांमध्ये उपलब्ध झालेला हा स्मार्टफोन ३८,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ ५-जी
गॅलेक्सी ए ५४ चा लहान भाऊ; मात्र उंची अधिक असे वर्णन गॅलेक्सी ए ३४ चे केल्यास वावगे ठरू नये. ६.६ इंची सुपर ॲमोलेड डिस्प्लेसह आयताकृती; परंतु स्लीम कॉर्नरमुळे ए ५४ च्या तुलनेत ए ३४ अधिक आकर्षक वाटतो. त्यातही ग्लास मॅट डिझाईनमुळे स्मार्टफोनला प्रीमियम लूक मिळाला आहे. आकार आणि उंचीने मोठा असला, तरी वजनाच्या दृष्टीने ए ५४ पेक्षा थोडा हलका वाटतो. डिस्प्लेविषयक फीचर्स बऱ्यापैकी सारखे असून, कॅमेऱ्याच्या बाबतीत मात्र थोडा कमी वाटतो.
४८ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि अवघ्या १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ए ५४ प्रमाणे या स्मार्टफोनमध्येही बीक्सबी आणि अन्य कॅमेरा फीचर सारखेच आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅमसह १२८ जीबी आणि २५६ जीबी मेमरी स्टोरेजसह उपलब्ध आहे. ए ३४ मध्ये Mediatek Dimensity १०८० ५जी प्रोसेसर आहे. मिड-प्रीमियम स्मार्टफोनची रेंज तपासली असता हा प्रोसेसर चांगला म्हणता येईल. लाईम, ग्राफाईट आणि सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध झालेला या स्मार्टफोनची किंमत ३०,९९९ रुपयांपासून सुरू होते.