टेक्नोहंट : दणकेबाज ‘बड्स २ प्रो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buds 2 Pro

स्मार्टफोनपाठोपाठ आता बाजारपेठेत नवनव्या ऑडिओ गॅजेट्सची क्रेझ पाहायला मिळत आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे वायर्ड हेडफोन, ब्ल्यूटूथ हेडफोन, नेकबॅण्डसह आकर्षक इअरबड्स उपलब्ध झाले आहेत.

टेक्नोहंट : दणकेबाज ‘बड्स २ प्रो’

स्मार्टफोनपाठोपाठ आता बाजारपेठेत नवनव्या ऑडिओ गॅजेट्सची क्रेझ पाहायला मिळत आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे वायर्ड हेडफोन, ब्ल्यूटूथ हेडफोन, नेकबॅण्डसह आकर्षक इअरबड्स उपलब्ध झाले आहेत. अशाच प्रकारे सॅमसंगने गॅलेक्सी ‘बड्स २ प्रो’ या नव्या इअरबड्स सादर केल्या असून त्यात दिलेल्या वैशिष्ट्यांबाबत...

तंत्रज्ञान विकसित होताना अनेक गॅजेट्स अत्याधुनिक होत आहेत. ऑडिओ गॅजेट्सबाबतही तेच म्हणावे लागेल. सुरुवातीच्या मोठ्या वायर्ड हेडफोनपासून सुरू प्रवास आता केवळ कानात बसणाऱ्या इवलाश्या इअरबड्सपर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे वेगवेगळे इअरबड्स उपलब्ध असून, त्यांचा दर्जा, फीचर्सवरून अवघ्या चार-पाचशे रुपयांपासून ते २५ ते ३० हजारांपर्यंत इअरबड्स उपलब्ध होतात. हल्ली वायर्ड हेडफोनच्या तुलनेत अनेकजण ब्ल्यूटूथ हेडफोन किंवा इअरबड्सला पसंती देत असल्याचे दिसते. हीच बाब लक्षात घेता सॅमसंगनेही अलिकडच्या काळात ऑडिओ गॅजेट्स क्षेत्रात प्रवेश केला असून, गॅलेक्सी बड्स सीरिज बरीच लोकप्रिय झाली. त्याचाच पुढचा भाग म्हणून सॅमसंगने गॅलेक्सी बड्स २ प्रो हे नवे, पण तितकेच अत्याधुनिक आणि नवे फीचर्स असलेले इअरबड्स सादर केले. आकाराने अगदी छोटे, आकर्षक रंगसंगती, वापरायला कम्फर्टेबल आणि दमदार आवाज ही गॅलेक्सी बड्स २ प्रोचे खास वैशिष्ट्यं म्हणता येईल.

गॅलेक्सी बड्स 2 प्रोचे इअरबड्स आणि केसची रचना उत्तम असून, त्यावरील मॅट डिझाईन सहज लक्ष वेधून घेते. बोरोपर्पल, ब्लॅक आणि व्हाइट या तीन रंगसंगतीमध्ये सादर झालेले हे गॅलेक्सी बड्स २ प्रो हे इअरबड्सचा इतर स्मार्टफोनच्या तुलनेत सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनसोबत अधिक चांगला अनुभव येतो. त्यातील बड्स प्रो मॅनेजर अॅपच्या मदतीने आपल्याला इअरबड्समधील विविध फीचर्स सहजपणे हॅण्डल करता येतात. उदा. नॉईस कॅन्सलेशन अॅक्टिव्हेट करण्यापासून ते ट्रान्स्परन्सी मोड, नॉर्मल मोड, 360 ऑडिओ, व्हॉइस डिटेक्ट आदी फीचर अॅक्सेस करता येतात. त्याशिवाय तुम्ही इअरबड्स कानात लावल्यानंतर नॉईज कॅन्सलेशन हे आपोआप अॅक्टिव्हेट होते.

तसेच, दोन्ही इअरबड्स कानातून बाहेर काढल्यास म्युझिक ऑटोमॅटिकली पॉझ होते. बड्सवर लॉंग प्रेस केल्यास तुम्हाला ट्रान्स्परन्सी मोडवर स्वीच करता येते. या इअरबड्समधील आणखी खास फीचर्स म्हणजे व्हॉईस डिटेक्ट. तुम्ही इअरबड्सवर गाणी ऐकताय आणि त्यावेळी तुम्ही कुणाशी बोलत असाल, तर आपोआप गाण्याचा आवाज कमी होतो; मात्र व्हॉट्सअॅप कॉलिंगवेळी तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो.

साऊंड क्वालिटीच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी बड्स २ प्रो उत्तमच म्हणायला हवेत, कारण दोन्ही इअरबड्स कानात घातल्यानंतर ऑडिओ बॅलन्स आणि ऑडिओ क्वालिटी उत्तम मिळते. त्याशिवाय ३६० ऑडिओमध्ये तुम्ही मान डावीकडे वा उजवीकडे फिरवल्यानंतर आवाजही त्यानुसार रोटेट होतो. आयपीएक्स ७ सर्टिफिकेशन असल्याने पाणी आणि घामाचा या इअरबड्सवर कोणताही परिणाम होत नाही. बॅटरी लाइफदेखील तुलनेने उत्तम असून, फूल चार्ज केल्यावर साधारणपणे पाच ते साडेपाच तासांपर्यंत हे इअरबड्स आपण सहजपणे वापरू शकतो. या इअरबड्ची किंमत १८ हजार रुपये असून, ते सर्वत्र उपलब्ध झाले आहेत.

वैशिष्ट्ये

  • आकार : (केस - 50.2 x 50.1 x 27.7 mm) (इअरबड्स - 21.6 x 19.9 x 18.7 mm)

  • वजन : (केस - 43.4 gm)(इअरबड्स - 5.5 gm)

  • बॅटरी : (केस - 515 mAh)(इअरबड्स - 61 mAh)

  • कनेक्टिव्हिटी : ब्ल्यूटूथ v5.3

  • अन्य फीचर्स : हाय एसएनआर माईक, अॅक्टिव नॉईज कॅन्सलेशन, व्हॉइस डिटेक्ट, ३६० ऑडिओ, एअर व्हेंटिलेशन.

टॅग्स :mobile5G Smart Phone