
ग्राहकांना दिली जाणारी सेवा अधिकाधिक सुलभ करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना सदैव प्रयत्नशील असतात. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना २४ तास सेवा देण्यासाठीही या आस्थापना सज्ज असतात.
टेक्नोहंट : व्हॉट्सॲपची साथ, रांगेवर करेल मात
ग्राहकांना दिली जाणारी सेवा अधिकाधिक सुलभ करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना सदैव प्रयत्नशील असतात. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना २४ तास सेवा देण्यासाठीही या आस्थापना सज्ज असतात. अशाच प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घरबसल्या अनेक कामे अगदी काही मिनिटांमध्ये करू शकता. अशाच काही महत्त्वाच्या सेवांबाबत थोडक्यात...
भारतीय आयुर्विमा महामंडळ
एलआयसीने त्यांच्या पॉलिसीधारकांसाठी व्हॉट्सॲपवर चॅटबोट सेवा सुरू केली. त्यामध्ये विविध अकरा प्रकारच्या सेवा थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाल्या आहेत. या सेवेसाठी पॉलिसीधारकांनी प्रथम www.licindia.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी आणि नोंदणीकृत मोबाईलवरून ८९७६८ ६२०९० या क्रमांकावर ‘Hi’ असा संदेश पाठवावा. त्यानंतर विविध ११ प्रकारच्या सेवांची यादी तुमच्यासमोर येते. त्यापैकी हव्या त्या माहितीबाबतचा क्रमांक टाइप करून संबंधित सेवा मिळवता येते. व्हॅल्यूफास्ट या संस्थेने एलआयसीसाठी ही सेवा उपलब्ध केली आहे.
मुंबई मेट्रो १
मध्य मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी मेट्रो १ हा उत्तम पर्याय समजला जातो. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना मेट्रोचे तिकीट सहजगत्या काढता यावे म्हणून व्हॉट्सॲप ई-तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही सेवा मिळवण्यासाठी https://wa.me/+९१९६७०००८८८९ या लिंकवर क्लिक करून किंवा मोबाईलमध्ये ९६७०००८८८९ हा नंबर सेव्ह करून त्यावर ‘Hi’ मेसेज पाठवल्यास ई-तिकीट प्रणालीची लिंक मिळते. त्यावरून तुम्ही सहजपणे मेट्रो १चे तिकीट काढू शकता.
पुणे मेट्रो
पुणे मेट्रोनेही प्रवाशांच्या सुविधेसाठी व्हॉट्सॲप ई- तिकीट प्रणाली सुरू केली आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या ओटीपीचा वापर करून तिकीट काउंटरवरून सहज तिकीट काढू शकता. त्यासाठी https://wa.me/+९१९४२०१०१९९० या लिंकवर क्लिक करून किंवा मोबाईलमध्ये ९४२०१०१९९० हा क्रमांक सेव्ह करून ‘Hi’ मेसेज पाठवल्यास पुणे मेट्रोच्या तिकिटासाठी लगेच ओटीपी मिळतो.
मासिक पाळीबाबत माहिती
सिरोना या कंपनीने महिलांच्या मासिक पाळीचे वेळापत्रक; तसेच विविध माहितीसंदर्भात व्हॉट्सॲपवर चॅटबोट सेवा सुरू केली आहे. त्यासाठी ९७१८८६६६४४ हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून त्यावर ‘Hi’ असा मेसेज पाठवल्यावर भाषा निवडून हवी ती माहिती मिळवता येते. सध्या या चॅटबोटवर मासिक पाळींचे वेळापत्रक, त्यातील चढ-उतार, मासिक पाळी चुकल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या माहितीसह महिलांसाठीच्या विविध वस्तू थेट व्हॉट्सॲपवरूनही ऑनलाईन खरेदी करता येतात.
वाणसामान खरेदी एका क्लिकवर
दैनंदिन गरजेच्या वस्तू उद्या. खाद्यपदार्थ, भाजीपाला, किराणा आदी सर्व साहित्य आता व्हॉट्सॲपवरून तुम्ही खरेदी करू शकता. जिओमार्टने व्हॉट्सॲप चॅटबोट सेवेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली आहे. ७९७७०७९७७० हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून त्यावर ‘Hi’ मेसेज पाठवल्यास तुम्हाला सर्व साहित्यांचा कॅटलॉग मिळतो. त्यावरून तुम्हाला हव्या त्या वस्तू खरेदी करता येतात.