वाढवा तुमच्या संगणकाची कार्यक्षमता

वाढवा तुमच्या संगणकाची कार्यक्षमता

देशभरात कोरोनाचं संकट आलं आणि संपूर्ण देशच लॉकडाउन झाला. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, कार्यालयं बंद करावी लागली. मात्र, त्यावर उपाययोजना म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देण्यात आला. एरवी कार्यालयात सहज होणारं काम घरूनच लॅपटॉप, संगणक, मोबाईलवर केलं जाऊ लागलं. मात्र, वाढत्या कामामुळे लॅपटॉप, संगणक स्लो होणं, हँग होणं अशा अडचणी समोर येऊ लागल्या. अशावेळी करता येणाऱ्या उपाययोजना....

सिस्टिम मेन्टनन्स किंवा सिस्टिम इन्फॉर्मेशन वापरा
सध्या बहुतांश लॅपटॉप, संगणकांमध्ये ‘विन्डोज १०’ ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, एररचे निदान करण्यासाठी सिस्टिम मेन्टनन्स किंवा सिस्टिम इन्फॉर्मेशनचा पर्याय आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्याचा वापर करून आपण आपल्या संगणकाचा किंवा लॅपटॉपचा वेग वाढवू शकतो. एवढेच नव्हे, तर अॅंटी-व्हायरसच्या मदतीने आढळलेले व्हायरस, एरर नष्ट करण्यासाठी सिस्टिम मेन्टनन्स किंवा सिस्टिम इन्फॉर्मेशनचा वापर करता येतो.

  रिस्टार्टचा पर्याय महत्त्वाचा
सध्या अनेक अभियंते, व्यवस्थापन क्षेत्रातील अधिकारी तसेच खासगी व्यावसायिक घरूनच काम करत आहे. अनेकदा काम संपल्यावर किंवा काम नसताना त्यांचा लॅपटॉप किंवा संगणक बंद करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच काम संपल्यावर सुरू असलेला लॅपटॉप ‘विन्डोज १०’मध्ये असलेल्या सुविधेमुळे आपोआप स्लिप मोडमध्ये जातो. मात्र त्यावेळी लॅपटॉपवरील सुरू असलेले टास्क किंवा वेगवेगळ्या टॅब्स सुरूच असतो. त्यामुळे लॅपटॉप किंवा संगणकाच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे काम संपल्यानंतर लॅपटॉप किंवा संगणक आवर्जून बंद केले पाहिजेत. तसेच तुम्ही दिवसभरात ८-१० तासांहून अधिक वेळ काम करत असाल, तर ३-४ तासानंतर तुमचा लॅपटॉप किंवा संगणक एकदा रिस्टार्ट करा. त्यामुळे अनावश्यक टॅब्स, कॅचे फाईल्स बंद होतील.

  रॅम बढाकर तो देखो...
पूर्वीच्या तुलनेत आता अधिकाधिक क्षमतेच्या रॅम असलेले लॅपटॉप किंवा संगणक बाजारात उपलब्ध आहेत. अधिक क्षमतेच्या रॅममुळे संगणकाचा किंवा लॅपटॉपचा वेग वाढतो. मात्र, तुमच्याकडे जुना संगणक असल्यास आणि त्यातील रॅम कमी असेल तर तो अपडेट करता येईल किंवा अन्य रॅमचा अतिरिक्त स्लॉट लावून लॅपटॉपचा वेग वाढवता येतो. पूर्वीच्या तुलनेत आता कामाचा व्याप वाढल्याने अधिकाधिक क्षमतेची रॅम असणे आवश्यक आहे. त्यामुळे संगणक तसेच लॅपटॉपची कार्यक्षमता वाढवता येते.

  अनावश्यक अॅप्स उडवाच
तुमच्यापैकी अनेकांना आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा संगणकामध्ये अनेक अॅप्स किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायची सवय असते. सुरुवातीला काही दिवस त्या अॅप्स किंवा सॉफ्टवेअरचा वापर केल्यानंतर नंतर ते संगणकामध्ये तसेच धूळखात पडलेले असते. सध्याच्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात कामाचा व्याप वाढल्यानंतर अशाप्रकारचे अनावश्यक अॅप्स किंवा सॉफ्टवेअर तुमच्या संगणकाचा वेग कमी करतात. त्याशिवाय नव्या लॅपटॉपसोबत कंपनीकडूनच अनेक अॅप्सही दिलेले असतात. त्यांना तांत्रिक भाषेत ब्लॉटवेअर म्हणतात. अशावेळी तुमच्या फारसे कामाचे नसलेले अॅप्स  उडवायलाच हवते. विन्डोजच्या कन्ट्रोल पॅनेलमध्ये जात प्रोग्रामचा पर्याय निवडून अनावश्यक असलेले अॅप्स किंवा सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करा.

  अपडेट राहा
काळानुरूप तंत्रज्ञान अद्ययावत होते, त्याप्रमाणे अॅप्स तसेच सॉफ्टवेअरमध्येही नवनवीन अपडेट्स उपलब्ध होतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिमचेही ठरावीक काळानंतर संबंधित कंपनीकडून अपडेट्स उपलब्ध केले जातात. त्यामागील कारण म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिम, अॅप्स किंवा सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी येत असतात. ते सोडवण्याचे काम नवे अपडेट्स करत असतात. त्यामुळे तुमचा संगणक, लॅपटॉप आणि  मोबाईलही ‘अप टू डेट’ ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये प्ले-स्टोअरवर माय अॅप्समध्ये जात अॅप्स अपडेट करता येईल आणि विन्डोजमधील अपडेट तपासण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन अपडेटचा पर्याय तपासावा. त्यानंतर तुम्ही चेक फॉर अपडेट्सच्या माध्यमातून तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप अपडेट करता येतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com