अपघात टाळणारे 'टीजे टायर्स'

सलील उरुणकर
सोमवार, 8 मे 2017

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील (एक्‍स्प्रेस-वे) जानेवारी ते डिसेंबर 2016 कालावधीतील अपघातांचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेच्या अहवालानुसार, मोटारींचे 'टायर' खराब असल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण 7 टक्के आहे. अतिवेगामुळे टायर फुटणे किंवा पंक्‍चर झाल्यानंतर अपघात होण्याचे प्रकार आता टाळता येणार आहेत. 'टीजे टायर्स' या स्टार्ट अप कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे केवळ अपघातच रोखता येतील असे नाही, तर 'टायर'च्या आयुष्यमानातील वाढ आणि इंधन बचतही साधता येईल.

महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेसाठी जाताना दुचाकी पंक्‍चर झाली.. परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याने शिक्षकांना विनवण्या केल्यानंतर समीर पांडा यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. या प्रसंगानंतर समीर यांच्या मनात 'टायर टेक्‍नॉलॉजी' विकसित करण्याचा विचार घोळू लागला. पंक्‍चर झाल्यानंतरही अपघात होणार नाही, वाहनचालकाला तोल राखता येईल व अतिवेगामुळे तापणारही नाही, असा टायर तयार करण्याचे त्याचं स्वप्न होते. या संकल्पनेवर समीर यांनी गेली दहा वर्षे काम केले आणि दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या 'टीजे टायर्स' (www.tycheejuno.com) या स्टार्ट अपला या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळाले. 

वाहननिर्मिती क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीतील कामासह 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेले समीर स्टार्ट अपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सहसंस्थापक जयंत प्रधान सीए असून, मुख्य वित्त अधिकारी म्हणून काम पाहतात. उदित बोंदिया हे संशोधन आणि निर्मिती विभागाचे प्रमुख व तुषार साहू आयटी विभागाचे प्रमुख म्हणून आहेत. 

स्टार्ट अपच्या प्रवासाची माहिती देताना समीर म्हणाले, ''तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी रसायनशास्त्र क्षेत्रातील निवृत्त प्राध्यापक डॉ. के. एन. पांडा यांची खूप मदत झाली. मात्र, तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर त्याचे 'लायसेन्स' मिळविण्यासाठी खूप झगडावे लागले. अनेक भारतीय टायर उत्पादन कंपन्यांशी बोलणी केली, पण उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागणार असल्याने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 'नासा टेक ब्रिफ'तर्फे सन 2015 मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर परिस्थितीत बदल झाला. टायरनिर्मिती स्वत:च करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, आता त्या दृष्टीने दुचाकी वाहनांची बाजारपेठ आम्ही डोळ्यासमोर ठेवली आहे.'' 

''ट्युबलेस टायरच्या तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या 'सिलंट' पदार्थाच्या काही मर्यादा आहेत. कायम हवेच्या संपर्कात असल्यामुळे चार ते सहा महिन्यांमध्ये हे 'सिलंट' घन स्वरूपात बदलते आणि त्यानंतर त्याची उपयुक्तता घटते. त्याऐवजी मल्टी-चेंबर टायर निर्माण केल्यास पंक्‍चर झाल्यानंतरच सिलंट पदार्थ हवेच्या संपर्कात येतो. तसेच, ओव्हरस्पिडिंगमुळे टायर तापण्याचे व फुटण्याचा प्रसंग उद्‌भवू नयेत म्हणून कुलंट पदार्थाचा वापर करून टायर थंड ठेवण्यासाठीही टायरमधील चेंबरचा उपयोग होऊ शकतो,'' असे पांडा यांनी सांगितले. 

महाराष्ट्राची उदासीनता, आंध्राची तत्परता 
'टीजे टायर्स'कडून नव्या तंत्रज्ञानाची चाचणी पुण्यामध्ये चिंचवड परिसरात घेण्यात आली. ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार 'टीजे टायर्स'चे उत्पादन आणि दर्जा पुण्यामध्ये निश्‍चित करण्यात आला. पुणे 'ऑटो हब' असल्यामुळे स्टार्ट अपचे काम महाराष्ट्रातच सुरू करण्याची पांडा व प्रधान यांची इच्छा होती. याबाबत राज्य सरकारशी त्यांनी संपर्क केला, मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्या उलट, आंध्र प्रदेश सरकारने पांडा यांना ऑफिस सुरू करण्यासाठी तिरुपती येथील एका 'ऍक्‍सलरेटर'मध्ये तातडीने जागा उपलब्ध करून दिली. ही जागा त्यांना दोन वर्षे मोफत वापरता येईल. ''अनेक गुंतवणूकदारांकडून 'फंडिंग' मिळवून देण्याचे आश्‍वासनही आंध्र सरकारने दिले आहे. स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक झाल्यानंतर पुण्यात कंपनीचे कार्यालय स्थापन करण्याचा आमचा मानस आहे,'' असे पांडा यांनी सांगितले. 

टायरची वैशिष्ट्ये 

  • दुचाकी, मोटारी, ट्रक, विमानांच्या टायरसाठी तंत्रज्ञान उपयुक्‍त. 
  • सध्या फक्त दुचाकी वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 
  • टायर तंत्रज्ञान : 1.3 दशलक्ष कोटी रुपयांची बाजारपेठ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salil Urunkar writes about TJ Tyres startup