सॅमसंग S8, S8+ मोबाईल अचानक होतो रिस्टार्ट

मंगळवार, 2 मे 2017

सॅमसंगने यापूर्वी स्क्रिनसंदर्भातील तक्रारींवर काम करायला सुरूवात केली होती. गेल्या आठवड्यात सॅमसंगने सॉफ्टवेअर अपडेट केले. त्यानंतर स्क्रिनचा रंग लालसर झाला होता. दक्षिण कोरियातील वापरकर्त्यांच्या तक्रारींवर सॅमसंगने तातडीने काम सुरू केले होते. त्या पाठोपाठ आता रिस्टार्टचा प्रश्न सॅमसंगसमोर उभा ठाकला आहे.

सॅमसंग कंपनीने नुकत्याच आणलेल्या गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस8+ मोबाईल फोन आपोआप रिस्टार्ट होत असल्याच्या तक्रारी अमेरिकेतील ग्राहकांनी केल्या आहेत. या आधी या दोन्ही मॉडेल्सच्या स्क्रिनचा रंग लालसर झाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यापाठोपाठ आता फोन रिस्टार्ट होत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.

कंपनीच्या अधिकृत फोरमवर आणि एक्सडीए डेव्हलपर्स फोरमवर ग्राहकांनी फोन रिस्टार्ट होण्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. 'माझ्या गॅलेक्सी एस8 फोनच्या स्क्रिनवर अचानक काही आकार दिसू लागतात आणि त्यानंतर फोन रिस्टार्ट होतो. सेफ मोडमध्ये फोन असतानाही हे घडते. माझ्या फोनमधील इतर कोणत्या अॅपमुळे फोन रिस्टार्ट होत नाही, हे नक्की. मी यासंदर्भात कंपनीशी बोललो. त्यांनी फोन परत द्यायला सांगितला आहे,' असे एका ग्राहकाने फोरमवर लिहिले आहे.

सर्वात प्रथम ही तक्रार एस8 च्या वापरकर्त्यानेच फोरमवर नोंदवली होती. फोन विकत घेतल्यानंतर सेट करत असताना अचानक रिस्टार्ट होत असल्याची तक्रार त्यानंतर सातत्याने होत आहे. 'मी कॅमेरा किंवा सॅमसंग थीम्स वापरत असताना फोन रिस्टार्ट होत होता. फोन चार्जिंगला लावलेला असो किंवा नसो, रिस्टार्टचा प्रश्न सतत भेडसावतो आहे. अचानक सगळी अॅप थांबतात. स्क्रिन बंद होते आणि काही सेकंदात फोन रिस्टार्ट होतो,' असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.