इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करताय?, मग 'या' 6 गोष्टींची नेहमी काळजी घ्या

बाळकृष्ण मधाळे
Friday, 19 February 2021

ई-वाहन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला काही खास गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की, त्याची बॅटरी, सेवा आणि धोरणाबद्दल...

सातारा : पर्यावरण दूषित करण्यात वाहने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. या अशा गाड्यांमधील धूर हवेत मिसळून हवा प्रदूषित करण्याचे काम होत आहे. मात्र, आता पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होताना दिसत आहे. या अशा इलेक्ट्रिक वाहनांमुळे ग्राहक पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना बाय-बाय करताना देखील पहायला मिळत आहे. अलीकडच्या काही दिवसांत दिल्लीतील प्रगती मैदानात ई-वाहन एक्सपो लागला होता. या प्रदर्शनात ई-वाहनांची माहिती दिली जात होती. याचा लाभ काहींनी घेतला, तर काहींना शक्य झाले नाही. त्यामुळे आपणही इलेक्ट्रॉनिक कार घेणार असाल, तर ती घेण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. चला तर या कारबाबत 6 खास गोष्टी जाणून घेऊ..

1. इलेक्ट्रॉनिक गाड्यांची किलोमीटरची श्रेणी बघा

इलेक्ट्रॉनिक कार खरेदी घेण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की, आपल्याला दररोज प्रवास करावा लागतो. त्यादृष्टीने इलेक्ट्रॉनिक गाड्यांची श्रेणी तपासा, कारण ती गाडी एकदा चार्ज केल्यानंतर ती विशिष्ट अंतरापर्यंत टिकते. त्यामुळे  आपण जेव्हा-जेव्हा इलेक्ट्रॉनिक कार घेण्यासाठी जाता, तेव्हा आपण विचार केला पाहिजे की, ही कार त्या अंतरासाठी योग्य आहे की नाही. बाजारात आपल्याला सुमारे 60 ते 120 किलोमीटर अंतरापर्यंत इलेक्ट्रिक वाहने धावताना आढळतील, ती तुम्ही खरेदी करु शकता.

2. इलेक्ट्रॉनिक कारच्या बॅटरीची क्षमता तपासा

आपल्याला ठाऊक आहे, बॅटरीशिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक वाहन चालत नाही. जेव्हा आपण ई-वाहन खरेदी करायला जाता, तेव्हा त्या वाहनाची बॅटरी क्षमता किती असते हे पाहणे आवश्यक आहे. ई-वाहनात वॅटची बॅटरी जितकी जास्त असेल, तितकी कारची श्रेणी अधिक आहे. ही बॅटरी नंतर बदलली जाऊ शकते की, नाही हे देखील लक्षात ठेवा.

Image result for इलेक्ट्रॉनिक कार

3. इलेक्ट्रॉनिक वाहनांचे सेवा आणि धोरण समजून घ्या

सहसा पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी सर्व वाहने कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन सहजपणे दुरुस्ती केली जाऊ शकतात. तथापि, आपल्याला हे माहित असले पाहिजे, की ई-वाहनांच्या बाबतीत असे होत नाही. कारण, जर ई-गाड्यांमध्ये काही दोष असेल, तर तुम्हाला त्याच ई-कारच्या सर्व्हिस सेंटरवर जावे लागेल. म्हणून, आपण कोणतेही इलेक्ट्रॉनिक वाहन घेत असाल, तर त्या कंपनीच्या सर्व सेवा, धोरणे आणि हमी काळजीपूर्वक तपासा.

4. किंमतीनुसार गाडीची खरेदी करा

दिल्लीतील प्रगती मैदानात ई-वाहनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तिथे काही गाड्यांच्या किंमतींबद्दल माहिती गोळा केली असता आमच्या असे लक्षात आले की, ई-कारची किंमत कोणत्याही सामान्य गाड्यांसोबत जोडली जात नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा तुम्ही ई-कार खरेदी करायला जाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, सर्व सामान्य गाडी इतकीच या गाडीची सुध्दा किंमत आकारण्यात आली आहे. त्यामुळे किमतीच्याबाबतीत जागृत असणे आवश्यक आहे.

Image result for इलेक्ट्रॉनिक कार

5. गाडी खरेदी करताना दुसऱ्यांचा सल्ला घ्या

जर आपण इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करणार असाल, तर इतरांचा सल्लाही घेण्यास पुढाकार घ्या. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने किंवा कुटुंबातील अन्य सदस्याने कधी इलेक्ट्रॉनिक कार वापरली असेल, तर इलेक्ट्रॉनिक कार वापरणे योग्य आहे की नाही, याबाबत खात्री करुन घ्या. तसेच त्यांना दुचाकी किंवा इतर वाहन घेणे योग्य आहे की नाही, हे देखील आवर्जुन विचारा.

6. कारची वैशिष्ट्ये आवर्जुन पहा

इलेक्ट्रॉनिक वाहन घेण्यापूर्वी त्या वाहनाची सर्व वैशिष्ट्ये जाणून घ्या. तद्नंतर दुचाकी वाहन किंवा चार चाकी कार या दोन्हींची माहिती घेतल्यावर गाडीची खरेदी करा. सहसा आपण कोणत्याही वाहनाची एक किंवा दोन वैशिष्ट्ये  समजून घेतो, परंतु इलेक्ट्रॉनिक वाहन घेताना त्या वाहनाची सर्व वैशिष्ट्ये पाहणे विसरून जातो, तर अशी चूक अजिबात करू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Take Special Care When Buying An Electronic Car