बर्मुडा ट्रॅंगलचे गूढ उकलले!

महेश बर्दापूरकर
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

बर्मुडा ट्रॅंगल ऊर्फ डेव्हिल्स ट्रॅंगल या समुद्रातील गूढ भागाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असंल. उत्तर अटलांटिक समुद्रातील पश्‍चिमेकडच्या भागात 75पेक्षा जास्त विमानं आणि शेकडो जहाजं गूढरीत्या बुडाली किंवा गायब झाल्यानं हा भाग गेली अनेक दशकं चर्चेत आहे. फ्लोरिडा, बर्मुडा आणि प्युरटो रिको या तीन देशांना जोडणाऱ्या त्रिकोणामध्ये या घटना घडल्या आहेत. या ट्रॅंगलचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न संशोधक गेली अनेक वर्षे करीत होते व त्यात यश आल्याचा दावा नुकताच करण्यात आला आहे. बर्मुडा ट्रॅंगलचं रहस्य, अपघातांमागच्या गूढरम्य कथा आणि संशोधकांनी उलगडलेलं रहस्य यांबद्दल...
 

बर्मुडा ट्रॅंगल्सचा "उदय'
जगभरातील विविध पत्रकारांनी अटलांटिक महासागरातील एका विशिष्ट भागात जहाजे व विमाने अदृश्‍य होत असल्याच्या बातम्या व लेख 1950च्या दशकात प्रसिद्ध केली. "द मायामी हेरॉल्ड' या वर्तमानपत्रात 17 सप्टेंबर 1950 रोजी एडवर्ड वॅन विंकल जोन्स यांचा एक लेख सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. त्यानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेच्या नौदलाची या भागात सराव करणारी "फ्लाइट 19' नावानं परिचित पाच विमानं गायब झाल्याची बातमी "फेट' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाली. या लेखात सर्वप्रथम सध्या चर्चेत असलेल्या ट्रॅंगलचा उल्लेख केला गेला. "फ्लाइट 19'च्या एका वैमानिकानं विमान गायब होण्याआधी "आम्ही पांढऱ्या पाण्यात प्रवेश करतो आहोत, काहीच योग्य घडत नाहीए. आम्ही नक्की कुठं आहोत हेच समजत नाहीए. इथलं पाणी हिरवं आहे, पाढरं नव्हे,' असं सांगत असल्याचं प्रसिद्ध झालं. त्यातूनच या भागात काही अमानवीय शक्ती काम करीत असल्याचं लेखक ऍलन इकर्ट यांनी सर्वप्रथम मांडलं. त्याचं हेच विधान त्यानंतर अनेक लेखकांनी उचलून धरलं. "फ्लाइट 19'वर आधारित एक लेख व्हिन्सेंट गॅडिज यांनी "द डेडली बर्मुडा ट्रॅंगल' या नावानं लिहिला आणि त्यावरच एक पुस्तकही लिहिलं. त्यानंतर जॉन वॅलेक स्पेन्सर, चार्लस्‌ बेरिट्‌झ, रिचर्ड विनर यांसारख्या अनेक लेखकांनी बर्मुडा ट्रॅंगल व तेथील "अमानवी शक्ती'बद्दल रकानेच्या रकाने भरून लिहिलं व हे गूढ जगभरात चर्चेत आलं.

बर्मुडा ट्रॅंगल आणि अपघात
बर्मुडा ट्रॅंगलवर झालेल्या अपघाताच्या गूढ घटनांची मोठी यादीच सांगितली जाते. त्यात वर उल्लेख केलेल्या "फ्लाइट 19' व्यतिरिक्त अनेक अपघातांचा समावेश होतो.
यूएसएस सायक्‍लोप्स
अमेरिकेचे "यूएसएस सायक्‍लोप्स' हे मॅंगेनिज खनिजाची वाहतूक करणारे जहाज 4 मार्ग 1918 रोजी बार्बेडोसमधून निघाले व त्यानंतर बेपत्ता झालं. या जहाजावर 309 कर्मचारी होते. जहाज अदृश्‍य कसं झालं याबद्दल अनेक तर्क लढवले गेले. वादळ, समुद्री चाचे किंवा शत्रूचा हल्ला झाला असल्याची शक्‍यताही वर्तविली गेली. सायक्‍लोप्सच्याच जातीची व हेच खनिज वाहून नेणारी आणखी दोन जहाजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याच भागात बुडाली होती. क्षमतेपेक्षा अधिक माल जहाजावर चढविल्यानं हे अपघात झाले असावेत, यावर सर्वांचं एकमत झालं.

कॅरोल ए डेअरिंग
हे 1919मध्ये बांधलेलं महाकाय जहाज 3 जानेवारी 1921 रोजी नॉर्थ कॅरोलिना येथून बेपत्ता झालं. "डेअरिंग'च्या बेपत्ता होण्यामागं मद्याच्या तस्करीचा संबंध असल्याच्या अफवा त्याकाळी मोठ्या प्रमाणावर उठल्या होत्या. "डेअरिंग'च्या मार्गावरून काही वेळातच "एसएस हेवीट' हे जहाज गेलं व गायब झालं. लाइट हाउसनं "डेअरिंग'नंतर गेलेल्या एका जहाजाला संदेश पाठवले व ते त्यानं पाळले नाहीत. "डेअरिंग'चे सर्व कर्मचारी गायब होण्यामागं "हेवीट'चा संबंध असावा, असा संशय व्यक्त केला गेला.

फ्लाइट 19
अमेरिकेच्या नौदलाची "फ्लाइट 19' ही पाच विमानांची तुकडी 5 डिसेंबर 1945 रोजी बेपत्ता झाली. ही विमाने 141 मैल अंतर पार करून पुन्हा बेस कॅम्पवर येणार होती, मात्र उड्डाणानंतर ती कधीच परतली नाहीत. या विमानांच्या शोधासाठी 13 कर्मचारी असलेलं "पीबीएम मरिनर' हे विमान पाठविण्यात आलं, मात्र तेही बेपत्ता झालं. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील एका जहाजानं हवेत अनेक स्फोट पाहिल्याचं सांगितलं. या घटनेनंतर समुद्रात मोठं वादळही आलं. मात्र, मार्ग चुकल्यानं व त्यादरम्यान इंधन संपल्यानं ही विमानं कोसळली असावीत, असा अहवाल नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिला. या विमानांत मोठ्या प्रमाणावर इंधन भरल्यास त्याची वाफ होऊन स्फोट होत असल्याचंही नंतर पुढं आलं.

स्टार टायगर
अझोरेस येथून बर्मुडाला निघालेले स्टार टायगर हे विमान 30 जानेवारी 1948 रोजी बेपत्ता झालं. स्टार एरिअल हे आणखी एक विमान 7 जानेवारी 1949 रोजी बर्मुडा येथून जमैकाला जाताना अदृश्‍य झालं. ही दोन्ही ब्रिटिश साउथ अमेरिकन एअरवेजची विमानं होती. या दोन्ही विमानांची तांत्रिक क्षमता बेतास बात होती. यातील एक विमान बर्मुडा ट्रॅंगलमध्ये प्रवेश करण्याच्या खूप आधीच अदृश्‍य झाल्याची नोंद झाली.
 

डग्लस डीसी-3
हे विमान 28 डिसेंबर 1948 रोजी सेंट जुआन इथून मयामीला जाताना अदृश्‍य झालं. विमान किंवा त्यातील 32 प्रवाशांचा शोध शेवटपर्यंत लागलाच नाही. शोधकार्य घेणाऱ्या पथकानं या विमानाच्या प्रवासाबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध असल्यानं त्याच्या अदृश्‍य होण्याचं कारण शोधणं शक्‍य नसल्याचं जाहीर करून टाकलं.

केसी-135 स्टार्टोटॅंकर्स
अमेरिकेच्या हवाई दलाची दोन विमानं 28 ऑगस्ट 1963ला एकमेकांवर धडकली आणि त्यांना अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली. सर्व चौकशांमध्ये ही दोन विमानं एकमेकाला धडकल्याचं समोर आलं, मात्र या धडकेच्या अंतरामध्ये 260 किलोमीटरचा फरक दिसून आला. एअर फोर्सच्या एका गुप्त अहवालात अपघाताच्या "दुसऱ्या' ठिकाणी वादळामुळं वाहून आलेल्या शैवाल आणि लाकडाच्या ढिगामध्ये विमानांचे अवशेष दिसल्याचं म्हटलं होतं.

कोनीमारा 4
हे जहाज अटलांटिक महासागरात बर्मुडाच्या दक्षिणेस 26 सप्टेंबर 1955ला दुर्घटनाग्रस्त झालं. या घटनेत सर्व खलाशी आणि कर्मचारी बेपत्ता झाले, मात्र जहाजाला कोणतंही नुकसान झालं नाही, असं सांगितलं गेलं. हे जहाज तीन मोठ्या वादळांतून सहीसलामत बाहेर आल्याचंही स्पष्ट झालं. या परिसरात 14 व 18 या तारखांना मोठी वादळं आली होती व त्याचा फटका बर्मुडाला बसला होती, अशी नोंद आहे.

अपघाताची कारणे
होकायंत्रातील बदल ः या भागात होकायंत्राच्या सुईमध्ये मोठे बदल होत असल्याचं समोर आलं आहे. परिसरातील चुंबकीय बदलामुळं हे घडत असल्याचंही सांगितलं जातं.
गल्फ स्ट्रीम ः मेक्‍सिकोच्या आखातात तयार होऊन फ्लोरिडापर्यंत वाहणाऱ्या या प्रवाहामुळं इंजिनात बिघाड झालेली जहाजं भरकटत असावीत किंवा पाण्यात उतरू पाहणारी विमानं अदृश्‍य होत असावीत, असं सांगितलं जातं.

मानवी चुका : या परिसरातील बहुतांश विमानं व जहाजांच्या अपघातात मानवी चुका असल्याचं समोर आलं आहे.
वादळी हवामान ः या परिसरात मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळं होत असल्यानं विमानं आणि जहाजांना धोका निर्माण होतो. या परिसरातील जहाजांना 100 ते 145 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणारे वारे व उसळलेल्या लाटांचा सामना करावा लागतो.
मिथेन हायड्रेटस ः या परिसरातील ज्वालामुखींमुळं पाण्यात मिथेन हायड्रेट्‌सचे प्रमाण अधिक असून, त्यामुळं पाण्याची घनता कमी होते. अशा पाण्यात जहाजांना तरंगत राहणं कठीण होतं व ती बुडतात.

काय सांगते नवे संशोधन
संशोधकांनी बर्मुडा ट्रॅंगल परिसरामध्ये षटकोनी ढगांची निर्मिती होत असते व त्यामुळं जहाजं व विमानं अदृश्‍य होत असल्याचं म्हटलं आहे. ""हे षटकोनी ढग एअर बॉंबप्रमाणे काम करतात व त्यातील वाऱ्यांचा वेग 275 किलोमीटर प्रतितास असतो. त्यामुळं विमानांना उड्डाणात व जहाजांना पुढं सरकण्यात अडचणी येतात. या ढगांमध्ये "मायक्रोब्रस्ट' ही प्रक्रिया होते. त्यातून ढगांच्या खालच्या भागातून हवेचा मोठा झोत बाहेर पडतो व त्यातून मोठी लाट निर्माण होते. अशा अनेक लाटांतून एक मोठी लाट निर्माण होऊन त्याच्या तडाख्यात जहाजं सापडतात, तर विमानावर हवेचा झोत पडल्यास ती कोसळतात,' असं हवामानशास्त्रज्ञ रेंडी कार्व्हेनी यांनी स्पष्ट केलं आहे.

जहाजं, विमानं अदृश्‍य का होतात?
बर्मुडा ट्रॅंगल परिसरातील समुद्राची खोली तब्बल 8 हजार 700 मीटर आहे. समुद्रात एवढ्या खोल जाऊन जहाजांचा शोध घेणं केवळ अशक्‍य असतं. त्याचबरोबर षटकोनी ढगांच्या माऱ्यामुळं कोसळलेली विमानं किंवा बुडालेलं जहाजं या परिसरातील वर उल्लेख केलेल्या "गल्फ स्ट्रीम'च्या जोरदार प्रवाहामुळं लगेचच दूर अंतरापर्यंत वाहून जातात. त्यामुळं या परिसरात गायब झालेली वस्तू पुन्हा सापडणं अशक्‍य ठरतं!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: science behind bermuda triangle