
Tech Hacks : हॅकर्स स्वप्नातही चोरू शकणार नाही तुमचा फेसबुक डेटा! वापरा फक्त ही सोपी ट्रिक
तुमच्या फेसबुक अकाउंटवर तुमची बरीच माहिती असते. तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कुठे राहता, तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी अशा सर्व माहितीसोबतच तुमच्या सर्व मित्रांचे अकाउंटही याला जोडलेले असतात. त्यामुळे तुमचं फेसबुक अकाउंट हॅक होणं हे तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठीही धोक्याचं असतं. फेसबुकवरील माहितीचा कित्येक प्रकारे गैरवापर करता येऊ शकतो.
काय आहेत धोके?
कित्येक फेसबुक यूजर्सचं अकाउंट आतापर्यंत हॅक झालं आहे. अशा व्यक्तींच्या फोटोंचा गैरवापर करण्यात आला आहे. किंवा मग या अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या मित्रांना पैसे मागून गंडवण्यात आलं आहे. तुमच्यासोबतही असं काही घडू नये, यासाठी तुमचं फेसबुक अकाउंट सुरक्षित असणं गरजेचं आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत.
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन
तुमच्या फेसबुकला दुप्पट सुरक्षा देण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हा पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही जर डेस्कटॉपवर फेसबुक उघडलं असेल, तर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. मोबाईल अॅपमधून यासाठी तुम्हाला डाव्या बाजूला खाली दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करावे लागेल.
यानंतर 'सेटिग्स अँड प्रायव्हसी' यावर क्लिक करून, सेटिंग्स हा पर्याय निवडा. यानंतर उघडलेल्या पेजवर डाव्या बाजूला 'पासवर्ड अँड सिक्युरिटी' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर समोर पुन्हा पासवर्ड अँड सिक्युरीटी हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हा पर्याय निवडा.
यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऑथेंटिकेशन हवं आहे याचे हे ऑप्शन्स आहेत. यामध्ये टेक्स्ट मेसेज, ऑथेंटिकेटर अॅप, सिक्युरिटी की असे तीन पर्याय दिसतील. यातील टेक्स्ट मेसेज ऑथेंटिकेशन पद्धतीला सर्वात सुरक्षित मानतात.
गुगलची मदत
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू केल्यानंतर तुम्ही लॉग-इन करण्यासाठी बॅकअप मेथड निवडू शकता. यासाठी तुम्ही गुगल ऑथेंटिकेटर सारख्या अॅप्सची मदत घेऊ शकता. लॉग-इन करताना या अॅपवर एक सिक्युरिटी की येईल, ती वापरूनच तुम्हाला लॉग-इन करता येईल.
अलर्ट करा सेट
तुम्ही नवीन अकाउंटवरून गुगल लॉग-इन केल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्हाला अलर्ट येतो, अगदी तशीच सुविधा फेसबुकच्या बाबतीतही मिळते. हा लॉग-इन अलर्ट सेट केल्यानंतर दुसऱ्या एखाद्या डिव्हाईस वरून कोणी लॉग-इन केले, तर तुम्हाला तातडीने टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल येईल. शिवाय, फेसबुक अॅपवरही याचं नोटिफिकेशन मिळेल, ज्यानुसार तुम्ही त्वरीत कारवाई करू शकाल.
स्वतः घ्या खबरदारी
या टिप्स वापरून तुम्ही अकाउंट सुरक्षित करू शकता. मात्र, हॅकर्स तुमच्या अकाउंटचा अॅक्सेस मिळवण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत असतात. त्यामुळे काही प्रमाणात खबरदारी घेणेही गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशय येणाऱ्या लिंक्सवर क्लिक करू नये. तसंच, आपला पासवर्ड कोणालाही पाठवू नये.