‘ॲप’निंग : बक्षीस, मोबदला, परतावा...

‘ॲप’निंग : बक्षीस, मोबदला, परतावा...

‘‘काय ही आजकालची पिढी दिवसरात्र मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेली असते’’, असे आपण नेहमी ऐकतो. आपण दिवसभर मोबाईलवर वेगवेगळे ॲप वापरत वेळ घालवतो. तो वेळेचा अपव्यय आहे, असे मानले जाते. काही प्रमाणात ते खरेही आहे. पण वाटते तितके हे ‘अर्थ‘हीनही नाही. आपल्या हातातील मोबाईलमध्ये असे ॲपही आहेत, जे आपल्याला घरबसल्या पैसे कमविण्यासाठी मदत करू शकतात. तुम्ही गेम खेळण्यासाठी, सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी, एखादी आवडलेली गोष्ट एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी, तुमचे मत मांडण्यासाठी हे ॲप वापरत असता. पण याच कामासाठी तुम्हाला पैसे मिळाले तर....? ते नक्कीच आवडेल.

गुगल ओपिनिअन रिवॉर्ड: तुम्ही समाजमाध्यमांवर वेगवेगळे सर्व्हे पाहिले असतील. एखाद्या वस्तूबाबत, एखाद्या मुद्‌द्‌याबाबत तुम्ही तुमची मते अशा सर्व्हेमध्ये मांडता. तुमच्या मतावरून संबंधित वस्तू किंवा मुद्‌द्‌याबाबत योग्यता ठरविणे संबंधितांना सोपे जाते. या कामासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात. ‘गुगल ओपिनिअन रिवॉर्ड’ असेच ॲप आहे, ज्यावर ‘गुगल’ विविध विषयांवर सर्व्हे घेत असते. तुम्हाला फक्त त्या सर्व्हेची उत्तरे प्रामाणिकपणे उत्तरे द्यायची आहेत. सर्व्हे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ३२.३० रुपये बक्षिस म्हणून मिळतात. हे पैसे तुमच्या गुगल पेमेंट अकाउंटमध्ये जमा केले जातात. हे ॲप ‘गुगल प्लेस्टोअर’वर उपलब्ध आहे.

लोको (Loco): तुम्हाला मोबोईलवर गेम खेळायला आवडते? मग तुमच्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे. या ॲपवर उपलब्ध असलेल्या गेम तुमच्या आवडीनुसार निवडून खेळायच्या आहेत. हे भारतीय ॲप असून, हिंदी, मराठी, इंग्रजी, तमीळ, तेलुगू आणि बंगाली या भाषेत ते उपलब्ध आहे. तुम्हाला गेमच्या शेवटी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.  प्रश्नांची उत्तरे बरोबर असतील, तर त्यासाठी बक्षिसे मिळतात. ‘गुगल प्लेस्टोर’वर हे ॲप उपलब्ध आहे. 

फोप(Foap) - सेल युअर फोटोज्‌ : तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल, तर तुमच्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही काढलेले फोटो या ॲपवर विकू शकता. या ॲपवर फोटो सेलरबरोबरच फोटो बायर, नावाजलेले ब्रॅड्‌सदेखील असतात, जे तुमचे फोटो खरेदी करतात. तुम्हाला तुमचा फोटो फोम अकांऊटवर पोस्ट करायचा आहे. तुमच्या फोटोला कम्युनिटी रेंटिंग दिले जाते. हे फोटो तुम्ही Foap.com वर विकू शकता. विक्री केलेल्या किमतीच्या ५० टक्के रक्कम तुमच्या पे अकाऊंटला जमा होते. 

मिशो (Meesho) : तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला मार्केटिंग कामाची आवड आहे,  तर हे ॲप उपयुक्त आहे. गृहिणींनाही ते उपयुक्त आहे. तुम्हाला ‘मिशो’ ॲप डाउनलोड करायचे आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेत हे ॲप वापरता येते. ‘मिशो‘वर विविध प्रॉडक्‍ट होलसेल दरात उपलब्ध असतात. हे प्रॉडक्‍ट तुम्ही कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अथवा ग्राहकांना विकू शकता. तुम्हाला ज्या प्रॉडक्‍टची विक्री करायची आहे, त्याचा फोटो आणि माहिती ग्राहकाला पाठवू शकता. त्यानंतर ग्राहकाला ती वस्तू हवी असल्यास  ‘मिशो’ ॲपवरून त्यांचे नाव, पत्ता टाकून ऑर्डर देऊ शकता. ‘मिशो’तर्फे ही वस्तू ग्राहकाच्या पत्त्यावर पोहोचवली जाते. वस्तूची विक्री केल्यानंतर त्यावरील नफ्याची रक्कम तुम्हाला मिळते. हे ॲप ‘गुगल प्लेस्टोअर’वर उपलब्ध आहे.

फ्रॅप(Frapp) : तुम्ही नुकतेच कॉलेजमधून पास झालेला असाल, तुम्हाला इंटर्नशिप आणि कार्यानुभवाची गरज असेल, तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे. या ॲपवर वेगवेगळे टास्क आणि मिशन दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काम निवडू शकता. त्यानंतर ते काम पूर्ण करायचे आहे. नंतर त्याचे पैसे मिळतात. यामध्ये कोडिंग, कंटेट क्रिएटिंग, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे प्रशिक्षण देणारे व्हिडिओ तयार करणे, तुम्ही ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर‘ असाल, तर विविध ब्रॅंडेड प्रॉडक्‍टची जाहिरात करणे अशी कामे मिळतात. हे ॲप ‘गुगल प्लेस्टोअर’वर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com