घरगुती वापरासाठी तळहाताएवढे ड्रोन 

Monday, 15 May 2017

पुणे : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी. पण, आपल्या तळहातावर बसतील एवढे छोटे ड्रोन तुम्ही पाहिले आहेत का? पवईच्या आयआयटी मुंबई या संस्थेच्या तीन तरुणांनी असे नॅनो ड्रोन विकसित केले आहेत. या नॅनो ड्रोनचा वापर आपल्या घराची सुरक्षितता, अग्निशमन कार्य, शिक्षण किंवा थेट संरक्षण खात्यासाठी करावयाच्या काही विशिष्ट कृतींसाठी करता येणे शक्‍य आहे. 

पुणे : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी. पण, आपल्या तळहातावर बसतील एवढे छोटे ड्रोन तुम्ही पाहिले आहेत का? पवईच्या आयआयटी मुंबई या संस्थेच्या तीन तरुणांनी असे नॅनो ड्रोन विकसित केले आहेत. या नॅनो ड्रोनचा वापर आपल्या घराची सुरक्षितता, अग्निशमन कार्य, शिक्षण किंवा थेट संरक्षण खात्यासाठी करावयाच्या काही विशिष्ट कृतींसाठी करता येणे शक्‍य आहे. 

आयआयटी मुंबईच्या "सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आन्त्रप्रेन्युअरशिप' (साइन) या इन्क्‍युबेटरमध्ये "ड्रोन एव्हिएशन' नावाची ही स्टार्टअप कंपनी अपूर्व गोडबोले, प्रसन्न शेवरे आणि दिनेश सैन या तिघांनी सुरू केली आहे. अपूर्व हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, दिनेश हा चिफ ऑपरेटिंग ऑफिसर, तर प्रसन्न हा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून स्टार्टअपचे काम पाहत आहे. उच्चशिक्षण घेत असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. नोव्हेंबर 2014 मध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने "एरियल सिनेमॅटोग्राफी'चे प्रयोग या तिघांनी केले; मात्र ड्रोन यंत्राचे वजन आणि आकार खूप मोठा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ड्रोनचा आकार आणि वजन कमी करता येईल का, असा विचार घेऊन तिघांनी सप्टेंबर 2015 मध्ये काम सुरू केले. त्यानंतर चार महिने या संकल्पनेवर काम केल्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये पहिला "नॅनो ड्रोन' त्यांनी तयार केला. या ड्रोनचे वजन अवघे 50 ग्रॅम. आकाराने फक्त 8.5 चौरस सेंटिमीटर, तर उड्डाणाचा सर्वाधिक कालावधी 7 मिनिटे. उडवायला सोपा, अगदी मोबाईलमधल्या एका ऍपद्वारे नियंत्रण करता येईल असा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनेक वेळा आपटला तरी बिघडणार नाही असा. 

स्टार्टअपविषयी अधिक माहिती देताना कंपनीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर दिनेश म्हणाले, ""आयआयटीच्या आवारामध्ये आम्ही ड्रोनच्या वापराविषयी घेतलेल्या कार्यशाळांमध्ये आतापर्यंत शेकडो मुलांनी सहभाग घेतला आहे. घराची सुरक्षितता, वाहतूक नियमन, सर्वेक्षण, पर्यटन, कृषी, शिक्षण, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये नॅनो ड्रोन उपयुक्त ठरू शकतात. व्यावसायिक कारणांसाठी ड्रोनच्या विक्रीची परवानगी नाही. त्यामुळे सध्या कार्याशाळांच्या माध्यमातून ड्रोन कसा बनवायचा, तो बिघडला तर दुरुस्त कसा करायचा, ड्रोनमधील बॅटरी, मोटार आदी याचे शिक्षण देण्याच्या कामावरच आम्ही भर देत आहोत.'' नॅनो ड्रोनचे पुढील व्हर्जन आम्ही लवकरच बाजारात दाखल करत आहोत. या नव्या व्हर्जनमध्ये "ऍड- ऑन फीचर्स' देत आहोत, ज्याच्या आधारे कॅमेरासुद्धा बसवता येईल. आमच्या स्टार्टअपचे प्रमुख लक्ष्य हे घरगुती ग्राहकच आहेत, असेही दिनेश यांनी सांगितले. 

- सप्टेंबर 2015 मध्ये 'ड्रोन एव्हिएशन' या सेल्फ फंडेड स्टार्टअपची स्थापना 
- प्लुटो - "डू इट युवरसेल्फ' (डीआयवाय) पद्धतीने सहजरीत्या बनविता येणारा "नॅनो ड्रोन' 
- मोबाईलमधील कंट्रोलर ऍपद्वारे नियंत्रण 
- नेहमीच्या ड्रोनसाठी दिवसाला वीस हजारांहून अधिक भाडे आकारणी केली जाते; मात्र नॅनो ड्रोनसाठी फक्त हजार ते दीड हजार रुपये घेतात 
- नॅनो ड्रोन बनविण्याचा खर्च पाच हजार रुपयांपर्यंत येतो 
- विविध क्षेत्रांत ड्रोनचा वापर भविष्यात वाढणार असल्यामुळे शाळांमधून मुला-मुलींना प्रशिक्षणाची गरज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small drone for domestic use