स्मार्टफोनच्या अतिवापराने करंगळीत वाकडेपणा 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

आजच्या तरुणाईसाठी स्मार्टफोन अत्यावश्‍यक बनला आहे, मात्र त्याच्या अतिवापराचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापराचा एक दुष्परिणाम आता समोर आला असून, तुम्ही ही असे करत असल्यास तुमच्या करंगळीकडे निरखून पाहा! सतत स्मार्ट फोन वापरणाऱ्यांच्या करंगळीमध्ये वाकडेपणा येऊ शकतो. सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या म्हणण्यानुसार, दिवसातून कमीत कमी सहा तास स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्सच्या करंगळीमध्ये थोडासा बाक येऊ शकतो. करंगळीच्या या वाकडेपणाला "स्मार्ट फोन पिंकी' असे नाव देण्यात आले आहे. तासन्‌ तास स्मार्टफोन वापरल्यामुळे करंगळीतील नाजूक पेशींवर दाब पडतो व त्यामुळे हा वाकडेपणा येऊ शकतो. स्मार्टफोनच्या बाजारात नव्या आलेल्या मॉडेल्सचे वजन जास्त असून, त्यांचा आकारही वाढत चालला आहे. त्यामुळे करंगळीवर अतिरिक्त भार पडत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अंगठ्याची अधिक हालचाल होत असल्यामुळे अंगठ्याचेही नुकसान होत आहे. त्यातच, आता करंगळी वाकडी होण्याच्या या प्रकारामुळे यूजर्सनी सावध होण्याची गरज आहे. यूजर्सनी स्मार्टफोनचा सलग वापर न करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. कॅंडी क्रश खेळण्यापासून व्हॉट्‌सऍप वापरण्याच्या नावाखाली स्मार्ट फोनच्या आहारी जाणाऱ्यांनी हा सल्ला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 
 

Web Title: Smartphone addiction little finger obliquity