विद्यार्थ्यांनी तयार केली सौरउर्जेवरील सायकल

सुधाकर काशीद
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

रस्त्यात पुढे चढ लागला, की फक्‍त सायकलचा ॲक्‍सिलेटर फिरवा आणि एखादे दुचाकी वाहन चालवल्यासारखी पॅडल न मारता सायकल चालवा. ही तांत्रिक किमया कोल्हापुरातल्या तीन तरुणांनी केली आहे. विशेष हे की सौरऊर्जेचा वापर करून ही पारंपरिक कम आधुनिक सायकल तयार करण्यात या तरुणांच्या धडपडीला यश आले आहे.

कोल्हापूर - रस्ता सरळ आहे, मग नेहमीप्रमाणे पॅडल मारत ही सायकल चालवा. रस्ता उताराचा आहे, मग आपोआपच आरामात जावा आणि रस्त्यात पुढे चढ लागला, की फक्‍त सायकलचा ॲक्‍सिलेटर फिरवा आणि एखादे दुचाकी वाहन चालवल्यासारखी पॅडल न मारता सायकल चालवा. ही तांत्रिक किमया कोल्हापुरातल्या तीन तरुणांनी केली आहे. विशेष हे की सौरऊर्जेचा वापर करून ही पारंपरिक कम आधुनिक सायकल तयार करण्यात या तरुणांच्या धडपडीला यश आले आहे.

मोटरवर सायकल ही संकल्पना जुनीच आहे; पण त्याला कोल्हापूरच्या या तरुणांनी सौरऊर्जेची कल्पक जोड दिली आहे. 
संकल्प किशोर मळेकर, सिद्धेश चौगुले व किरण वळिवडे अशी या तिघांची नावे असून, ते न्यू पॉलिटेक्‍निकचे विद्यार्थी आहेत. त्यांना प्रोजेक्‍टचा भाग म्हणून नवे काही करताना पर्यावरणपूरकतेला प्राधान्य दिले आहे. या सायकलचे वैशिष्ट्य असे, की सायकलच्या पुढे असलेल्या सौर पॅनेलवरून २४ व्हॉल्टचे सहा सेल चार्ज होतात.

ते सायकलच्या चाकाला लावलेल्या मोटारीस ऊर्जा देतात. ही मोटार चालू ठेवून ही सायकल सलग सहा किलोमीटर जाऊ शकते; पण या तिघांनी सायकलची पारंपरिकता कायम ठेवली आहे. त्यामुळे ज्या वेळी गरज नसेल किंवा रस्ता सरळ असेल त्यावेळी नेहमीप्रमाणे पॅडल मारत ही सायकल चालवता येते आणि आता रस्त्याला चढ लागला आहे, हे जाणवायला लागले आणि ॲक्‍सिलेटर फिरवला की हीच सायकल हलक्‍या दुचाकी वाहनाप्रमाणे आपोआप चालू लागते. पुन्हा उताराचा किंवा सरळ रस्ता आला की पारंपरिक पॅडल मारत सायकल पुढे नेता येते. 
त्यामुळे सायकल मारण्याचा आनंद घेताना व्यायामही करता येतो आणि सौरऊर्जेच्या ताकदीचा लाभही घेता येतो. 

या सायकलमुळे पेट्रोल खर्च बचत, प्रदूषण कमी व रस्त्यावरची दुचाकींची गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय लोकांचा व्यायामही होणार आहे. अमेरिकेत सध्या फक्त लाँग ड्राईव्हसाठी चारचाकी वाहनांचा वापर आहे. बाकी किरकोळ अंतरासाठी सायकललाच प्राधान्य आहे. कोल्हापूरचा विचार केला आणि बिंदू चौक केंद्र बिंदू मानला तर चारही दिशेला कोल्हापूरची हद्द केवळ ७ ते ८ किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या सायकलचा वापर येथे सहज शक्‍य आहे. आज ही सायकल गव्हर्न्मेंट पॉलिटेक्‍निक येथे तज्ज्ञ प्राध्यापकांना दाखवण्यात आली, तसेच त्यांच्यासमोर सायकलचे प्रात्यक्षिकही दाखविले. सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रा. किरण वळिवडे व किशोर मळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. 

ही सायकल २४ व्होल्ट्‌च्या सहा सेलवर चालते. सायकलीला २६० वॉटची मोटार आहे. सायकलला पुढे जे पॅनेल आहे, त्यावर हे सेल कार्यान्वित होतात. ही सायकल ताशी १०ते १२ किलोमीटर जाते. सलग मोटारीवर चालवली, तर सहा किलोमीटर जाते. पेट्रोल दर ९३ रुपयांवर पोचला होता, त्यावेळी ही संकल्पना डोक्‍यात आली.
- संकल्प मळेकर

Web Title: Solar ride made by Kolhapur New Polytechnic students