
Affordable Cars : दुचाकीवर फॅमिली घेऊन जायची रिस्क नको! बाईकच्या किंमतीत मिळतायत या कार; पाहा यादी
दुचाकीवर ट्रिपल सीट जाणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, कित्येक लोक तरीही आपल्या पत्नी आणि मुलांसह दुचाकीवर फिरताना दिसतात. असं करणं खरंतर खूप धोक्याचं आहे. मात्र, कार घेणंही सर्वांना परवडत नाही. पण जर दुचाकीच्या किंमतीतच चांगली कार मिळत असेल तर?
सध्या दुचाकी वाहनांची किंमतही भरपूर वाढली आहे. अगदी 100-150 सीसी क्षमतेच्या गाड्यांची किंमतही एक लाखांपर्यंत जाते. पुढं 350 सीसी क्षमतेच्या गाड्यांची किंमत तर दोन-तीन लाखांपर्यंत जाते. याच किंमतीत तुम्हाला चांगली सेकंड हँड कार (Affordable second hand cars) मिळू शकते. अशाच काही स्वस्तात मस्त गाड्यांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ह्युंडाई ईऑन
ह्युंडाईच्या या गाडीचं प्रॉडक्शन कंपनीने सध्या बंद केलं आहे. मात्र, सेकंड हँड मार्केटमध्ये अजूनही या गाडीला चांगली पसंती मिळत आहे. यामध्ये तुम्हाला एअरबॅग देखील मिळते. विशेष म्हणजे एक ते दीड लाखांपर्यंत ही गाडी यूज्ड कंडिशनमध्ये आरामात मिळू शकते.
मारुती वॅगनआर
मारुतीची ही गाडी यूज्ड कंडिशनमध्ये तुम्हाला २.५ ते ३ लाखांपर्यंत मिळेल. चांगली बूट स्पेस असल्यामुळे तुम्ही या गाडीला सीएनजीमध्ये देखील कन्व्हर्ट करू शकाल. यामुळे तुमची अधिक बचत होईल.
मारुती सुझुकी अल्टो
मारुतीच्या या गाडीला सेकंड हँड मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी राहते. या गाडीचं मायलेज देखील अगदी चांगलं आहे. मारुती अल्टोची 800 आणि K10 ही दोन्ही मॉडेल्स तुम्हाला दीड ते दोन लाखांपर्यंत मिळू शकतील.
ह्युंडाई i10
ह्युंडाईच्या आय10 या गाडीचं उप्तादन बंद झालं आहे. तरीही यूज्ड कार्सच्या मार्केटमध्ये याला भरपूर मागणी आहे. दोन ते अडीच लाखांपर्यंत तुम्हाला ही यूज्ड कार मिळून जाईल. याला उत्तम पिकअप आणि मायलेज मिळेल.
रेनॉल्ट क्विड
रेनॉल्टच्या या गाडीमध्ये ड्युअल एअरबॅग, एबीएस असे अनेक सेफ्टी फीचर्स मिळतात. या गाडीचं जुनं मॉडेल सेकंड हँड मार्केटमध्ये तुम्हाला दीड ते दोन लाखांपर्यंत मिळेल.