
Twitter : ब्लू-टिक असणाऱ्यांना मस्कने दिलं गिफ्ट! आता ट्विटरवर करता येणार 'हे' काम
ट्विटर विकत घेतल्यापासून इलॉन मस्कने एकापाठोपाठ एक विविध निर्णय घेतले आहेत. यातील बहुतांश निर्णय हे यूझर्सना धक्का देणारे होते. मात्र, आता मस्कने आपल्या पेड यूझर्सना मोठं गिफ्ट दिलंय. ट्विटरवर ब्लू-टिक असणारे यूझर्स आता २ तासांचे व्हिडिओ ट्विट करू शकणार आहेत.
यापूर्वी होती एका तासाची लिमिट
यापूर्वी ट्विटर यूझर्स केवळ ६० मिनिटांचे व्हिडिओ (Twitter Video Upload) अपलोड करू शकत होते. मात्र, मस्कने केलेल्या या घोषणेनंतर आता व्हेरिफाईड यूझर्स दोन तासांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकणार आहेत. तसेच, यापूर्वी ट्विटरवर केवळ २ जीबी साईजच्या फाईल अपलोड करता येत होत्या; मात्र आता ही लिमिट ८ जीबीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ब्लू टिकसाठी चार्जेस
मस्कने (Elon Musk) घेतलेला हा निर्णय केवळ ट्विटरच्या ब्लू-टिक असणाऱ्या यूझर्ससाठी लागू होणार आहे. म्हणजेच, ब्लू-टिक नसणारे यूझर्स अजूनही केवळ ६० मिनिटांचे वा २ जीबी साईजचे व्हिडिओ अपलोड करू शकणार आहेत. ट्विटरचे ब्लू-टिक (Twitter Blue Tick) मिळवण्यासाठी मात्र यूझर्सना सबस्क्रिप्शन घ्यावे लागत आहे.
यूझर्सच्या भन्नाट रिअॅक्शन
मस्क यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर ट्विटर यूझर्सनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'ट्विटर आता नेटफ्लिक्स झालंय', 'हे ट्विटर आहे की ट्विटट्यूब?' अशा विविध प्रतिक्रिया यूझर्स देत आहेत. तसेच, कित्येक यूझर्सनी या अपडेटबाबत मस्कचे आभार देखील मानले आहेत.