'वंदे भारत' म्हणजे रुळांवरचा कम्प्युटरच! पाहा कशी काम करते ही स्वदेशी हायटेक ट्रेन | Union Minister for Railways Ashwini Vaishnav says Vande Bharat Express is Practically a computer on wheels | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat

'वंदे भारत' म्हणजे रुळांवरचा कम्प्युटरच! पाहा कशी काम करते ही स्वदेशी हायटेक ट्रेन

आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत देशातच तयार करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस ही खऱ्या अर्थाने नवभारताचे प्रतीक आहे. देशातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या रेल्वे सिस्टीमने कात टाकल्याचे ही ट्रेन दाखवून देते. स्वयंचलित असणारी ही सेमी-हायस्पीड ट्रेन म्हणजे चाकांवर चालणारा एक कम्प्युटरच (Vande Bharat is Computer on Wheels) असल्याचं मत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं.

"वंदे भारत खऱ्या अर्थाने चाकांवर चालणारा कम्प्युटर आहे. याची वाहन नियंत्रण प्रणाली, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरट्रेन, ट्रान्सफॉर्मर्स, मोटर अशा जवळपास सर्व गोष्टी सॉफ्टवेअरने नियंत्रित केल्या जातात." असं अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले.

ट्रेनमध्ये वापरल्यात हजारो चिप्स

या स्मार्ट ट्रेनमध्ये हजारो इंटिग्रेटेड सर्किट किंवा चिप्सचा वापर केला जातो. या चिप्स ट्रेनला पुढे ढकलणे, ब्रेक लावणे, ऑटोमॅटिक दरवाजे उघडणे-बंद करणे अशा प्रकारच्या सर्व यांत्रिक क्रिया करण्यासाठी गरजेच्या असतात. एका सामान्य रेल्वेमध्ये अशा सुमारे २,००० चिप्स वापरण्यात येतात. तर, वंदे भारतमध्ये अशा तब्बल १५ हजार चिप्स वापरण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ इंजिनिअरने दिली.

साध्या ट्रेनमध्ये काय फरक

साध्या ट्रेनमध्ये एक इंजिन कोच असतो. या कोचमध्येच जवळपास सर्व चिप्स वापरण्यात आलेल्या असतात. कारण हा कोचच बाकी सर्व डब्यांना ओढत असतो. रेल्वेच्या बाकी डब्यांमध्ये केवळ लाईट आणि एसी किंवा पंखे याव्यतिरिक्त अन्य विजेच्या गोष्टी नसतात.

वंदे भारत रेल्वेमध्ये एक नाही, तर तब्बल आठ मोटर कोच आहेत. म्हणजेच, एकूण १६ पैकी अर्धे डबे हे स्वयंचलित आहेत. त्यामुळेच, या ट्रेनमध्ये वापरण्यात आलेल्या चिप्सची संख्या साधारण रेल्वेच्या तुलनेत कितीतरी जास्त असते.

याशिवाय, वंदे भारत ट्रेनमध्ये हायटेक ब्रेकिंग सिस्टीम, टीसीएमएस, ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम अशा गोष्टीही आहेत. सर्व डब्यांमध्ये एसी, जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, सीसीटीव्ही, इन्फोटेन्मेंट सिस्टीम अशी उपकरणे असल्यामुळे, या ट्रेनमध्ये जास्त चिप्सची गरज भासते. ट्रेनची संपूर्ण सिस्टीम ही टीसीएमएसद्वारे (ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम) संचालित होते. ट्रेनमधील आठ मोटर कोच हे स्वतंत्र्य कम्प्युटरप्रमाणे कार्य करतात, जे एका नेटवर्कशी जोडलेले आहेत.

टीसीएमएस काय आहे

टीसीएमएस (TCMS), म्हणजेच ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम ही वंदे भारत ट्रेनचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ट्रॅक्शन, ब्रेकिंग, हीटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम अशा कित्येक गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी टीसीएमएसचा वापर होतो. याव्यतिरिक्त, ही सिस्टीम रेल्वेची कायम देखरेख करते. यामुळे भविष्यात कुठे बिघाड निर्माण होईल याचा अंदाज लावणे शक्य होते.