US : अमेरिकेतील शाळेने मेटा, गुगल, स्नॅपचॅटला खेचलं कोर्टात! विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप | US school system sues Meta, Google, Snapchat and TikTok over mental crisis among students | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media Addiction

US : अमेरिकेतील शाळेने मेटा, गुगल, स्नॅपचॅटला खेचलं कोर्टात! विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप

अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेने गुगल, मेटा, स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडिया अ‍ॅप्सना कोर्टात खेचलं आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे.

हॉवर्ड काऊंटी पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थेने हा खटला दाखल केला आहे, सोशल मीडियामुळे मुलांमध्ये अभूतपूर्व असं मानसिक आरोग्य संकट दिसून येत असल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे. मुलांना याचं व्यसन लावण्यासाठी कंपन्याच जबाबदार असल्याचं या शैक्षणिक संस्थेनं (US School system files lawsuit) म्हटलं आहे.

"गेल्या दशकामध्ये अमेरिकेतील सोशल मीडिया एंगेजमेंट वाढली आहे. हा अपघात किंवा योगायोग नाही. या कंपन्यांनी तरुणांना आपले प्रॉडक्ट वापरण्याची सवय लागावी यासाठी अभ्यास करून घेतलेल्या निर्णयांचा हा परिणाम आहे." असं या खटल्यामध्ये म्हटलं आहे. मेटाचं इन्स्टाग्राम, फेसबुक; गुगलचं यूट्यूब आणि स्नॅपचॅट, टिकटॉक अशा प्रॉडक्ट्सबाबत यामध्ये म्हटलं आहे. (Lawsuit against Meta, Google, Snapchat and TikTok)

"या कंपन्यांनी आपल्या यूजर्सच्या मानसिकतेचा अभ्यास करून, ते अधिकाधिक एंगेज राहतील यासाठी विविध निर्णय घेतले आहेत. यूजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार कंटेंट दाखवणं, त्यांना सातत्याने नवीन कंटेंट दाखवत ठेवणं अशा गोष्टी या कंपन्या करतात. या टेक्निक तरुण यूजर्सवर परिणामकारक आणि हानीकारक ठरतात." असं या संस्थेने आपल्या बाजूने म्हटलं आहे.

मुलांना करतायत टार्गेट

अल्पवयीन मुलांनाही सध्या स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अ‍ॅक्सेस आहे. या मुलांची सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, आणि ते दिवसातील बराच वेळ यावर व्यतीत करतात. या यूजर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा एंगेज ठेवण्यासाठी या मोठ्या कंपन्या नवनवीन फीचर्स लाँच करतात. यामुळे हे यूजर्स पुन्हा पुन्हा हे अ‍ॅप्स वापरतात, असा दावा या खटल्यामध्ये करण्यात आला आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, अलाबामा, टेनेसी आणि इतर काही राज्यांमधील शाळा आणि शैक्षणिक संस्थांनीही यापूर्वी अशाच प्रकारचे खटले दाखल केले आहेत.