
Kavach System : रेल्वे अपघात रोखणारं कवच तंत्रज्ञान आहे तरी काय? जाणून घ्या
भारतातील रेल्वे अपघात रोखण्यासाठी २०२२ मध्ये कवच ही प्रणाली लाँच करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयाने ही ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम (ATP) लाँच केली होती. काय आहे ही प्रणाली, आणि रेल्वे अपघात रोखण्यासाठी ती कसं काम करते? जाणून घेऊयात.
समोरची रेल्वे आपोआप थांबेल
कवचची (Kavach System) रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, निर्धारित अंतरावर त्याच मार्गावर दुसरी ट्रेन आल्याची माहिती मिळाल्यास ती आपोआप थांबेल. या डिजिटल सिस्टिममुळे रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करणे किंवा अन्य काही बिघाड अशा मानवी चुका झाल्यानंतर ट्रेन आपोआप थांबतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही प्रणाली बसवल्यास परिचालन किंमत प्रति किलोमीटर 50 लाख रुपये इतका येईल. तर जागतिक स्तरावर अशा सुरक्षा यंत्रणेची किंमत प्रति किलोमीटर सुमारे 2 कोटी रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कवच प्रणालीमध्ये विशेष काय?
'कवच' प्रणालीमध्ये उच्च वारंवारिता रेडिओ कम्युनिकेशनचा (Radio Communication) वापर करण्यात येतो. तसंच कवच SIL-4 (सिक्युरिटी स्टँडर्ड लेव्हल फोर) शी सुसंगत आहे. ही कोणत्याही सुरक्षा प्रणालीमधील सर्वोच्च पातळी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व गाड्या शेजारील रुळांवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी थांबल्या जातील. कवचला 160 किमी प्रतितास वेगासाठी मान्यता देण्यात आली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी दाखवलं होतं प्रात्यक्षिक
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी यापूर्वीच या सुरक्षा प्रणालीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यांनी थेट ट्रेनमध्ये बसूनच या प्रणालीची चाचणी घेतली होती. या चाचणीदरम्यान दोन रेल्वेगाड्या विरुद्ध दिशेने वेगाने एकमेकांसमोर चालवल्या गेल्या. मात्र, या दोन्ही रेल्वेंची धडक होण्यापूर्वीच रेल्वे 380 मीटरवर रोखली गेली. यामुळे संभव्य अपघात रोखला गेला.