Chandrayaan 2 : चंद्राच्या अभ्यासासाठी जगाच्या तब्बल 134 मोहिमा 

सम्राट कदम
Saturday, 13 July 2019

भारताच्या पहिल्याच चंद्र मोहिमेत 'चांद्रयान-1'ने चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध केले आणि जगाची नजर भारताकडे वळल्या. जगातले सर्वांत स्वस्त, प्रभावी अवकाश संशोधन करणारी संस्था म्हणून 'इस्रो'कडे बघण्यात आले. आता इस्रो 'चांद्रयान-2' प्रक्षेपित करत आहे. आजपर्यंत जगासाठी अपरिचित असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयानातले 'विक्रम' लँडर आणि 'प्रग्यान' रोव्हर उतरणार आहे. त्यामुळे चंद्रावर दडलेली रहस्ये समोर येण्यास मदत होणार आहे. 

बालमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चांदोमामाच्या भेटीसाठी लहानग्यां बरोबरच जगातील शास्त्रज्ञही उत्सुक असतात. चंद्राच्या भेटीसाठी आजपर्यंत जगातील सात देशांनी तब्बल 134 मोहिमांचे आयोजन केले आहे. आजपर्यंत भारतासह रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोपियन महासंघ आणि इस्राईल या देशांनी चंद्राकडे झेपावणाऱ्या अवकाश मोहिमा पूर्ण केल्या.

सर्वात प्रथम अमेरिकेच्या हवाई दलाने 17 ऑगस्ट 1978 साली 'पायोनिअर' ही पहिली अवकाश मोहीम हाती घेतली. काही तांत्रिक कारणामुळे तेव्हा ती अयशस्वी ठरली. तत्कालीन जग हे अमेरिका आणि सोवियत रशिया यांच्यात चाललेल्या शीतयुद्धाच्या सावटाखाली होते. अमेरिकेने असे काही भयंकर केले म्हणून रशियानेही अवकाश मोहिमा हाती घेतल्या. लवकरच रशियाच्या 'ल्युना-2' या अवकाश मोहिमेने चंद्रापर्यंत पोचण्यात यश प्राप्त केले. या यशानंतर रशियाने अवकाश मोहिमांचा धडाकाच लावून धरला. त्यांनी 'ल्युना' मालिकेचे तब्बल तेवीस प्रक्षेपणे केली. यातील 'ल्युना-9' ही मोहीम चंद्रावर सुखरूप उतरण्यात यशस्वी ठरली. 

प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाने चालविलेल्या अवकाश मोहीमांमुळे अमेरिकेची चलबिचल वाढू लागली. रशिया जगातली सर्वांत मोठी महासत्ता बनते का काय? या भीतीने अमेरिकन नागरिक आणि सरकार ग्रासले होते. रशिया उपग्रहाद्वारे अमेरिकेची टेहेळणी करत आहे, अवकाशातून हल्ला करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. अशा एक ना अनेक अफवांनी अमेरिकेचे अवकाश काळवंडले होते. अमेरिकेने वेगाने आपली 'अपोलो' मोहीम चालू ठेवली. अखेरीस 1968 मध्ये 'अपोलो-8' ही मानवी सहभाग असलेल्या मोहिमेत अमेरिकेला यश मिळाले. 'अपोलो-11' मध्ये पृथ्वीवरील सजीवाने नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. यामुळे माणसाला मोठी उपलब्धी मिळाली पण, अमेरिकेची महासत्ता बनण्याकडे निर्विवाद वाटचाल सुरू झाली.

सन 2000 नंतर जपान, चीन आणि युरोपियन महासंघाने या स्पर्धेत उडी घेतली. काही प्रमाणात यशही प्राप्त केले. परंतु भारतीय अवकाश संशोधन संस्थे इतके नाही! कारण भारताच्या पहिल्याच चंद्र मोहिमेत 'चांद्रयान-1'ने चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध केले आणि जगाची नजर भारताकडे वळल्या. जगातले सर्वांत स्वस्त, प्रभावी अवकाश संशोधन करणारी संस्था म्हणून 'इस्रो'कडे बघण्यात आले. आता इस्रो 'चांद्रयान-2' प्रक्षेपित करत आहे. आजपर्यंत जगासाठी अपरिचित असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयानातले 'विक्रम' लँडर आणि 'प्रग्यान' रोव्हर उतरणार आहे. त्यामुळे चंद्रावर दडलेली रहस्ये समोर येण्यास मदत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worldwide 134 Campaigns for the Study of moon