'यू-ट्युब' ठरतंय 'गुगल'साठी सर्वांत फायदेशीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

'यू-ट्युब'च्या वाढत्या उत्पन्नामुळे 'सेल्फ ड्रायव्हिंग कार'सारख्या 'गुगल'च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित प्रकल्पांनाही आर्थिक बळ मिळण्याची शक्‍यता आहे. 'यू-ट्युब'मधून नेमके किती उत्पन्न मिळाले, याची माहिती 'अल्फाबेट'ने जाहीर केलेली नाही.

सॅन फ्रॅन्सिस्को: 'गुगल'च्या विविध सुविधांपैकी अर्थकारणाच्या दृष्टीने 'यू-ट्युब' सर्वाधिक फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तंत्रज्ञानाशी चटकन जुळवून घेणाऱ्या नव्या पिढीसाठी 'यू-ट्युब' हे केबल टीव्हीपेक्षाही अधिक महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे.

स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे इंटरनेट आपल्या हातात आले आहे. बातम्या, मनोरंजन किंवा संगीत ऐकण्यासाठी नवी पिढी आता स्मार्टफोनवरच आणि त्यातही 'यू-ट्युब'वरच अवलंबून असल्याचीही निरीक्षणे आहेत. यामुळे माध्यम विश्‍वातील जाहिरातींवरील खर्चाच्या प्रमाणामध्येही बदल होत चालला आहे. पारंपरिक माध्यमांपेक्षा आता 'यू-ट्युब'सारख्या माध्यमांवरून जाहिराती करण्याकडे जाहिरातदारांचा कल वाढू लागला आहे.

'यू-ट्युब'कडे वाढत चाललेल्या जाहिरातींच्या प्रमाणामुळे या सुविधेचा 'गुगल'च्या उत्पन्नात लक्षणीय वाटा आहे. 'गुगल'ने काल (गुरुवार) तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. 'गुगल'ची मातृसंस्था असलेल्या 'अल्फाबेट' या कंपनीला गतवर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपेक्षा तब्बल 27 टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या तिसऱ्या तिमाहीअखेरचे 'अल्फाबेट'चे उत्पन्न 5.1 अब्ज डॉलर इतके होते.

या भक्कम आर्थिक कामगिरीमुळे 'गुगल' आता विविध दूरचित्रवाहिन्यांवरील अधिकाधिक कार्यक्रम 'यू-ट्युब'वरून प्रसारित करण्याचे हक्कही विकत घेण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. यामुळे 'यू-ट्युब'च्या युझर्समध्ये आणखी वाढ होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 'यू-ट्युब'च्या वाढत्या उत्पन्नामुळे 'सेल्फ ड्रायव्हिंग कार'सारख्या 'गुगल'च्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित प्रकल्पांनाही आर्थिक बळ मिळण्याची शक्‍यता आहे. 'यू-ट्युब'मधून नेमके किती उत्पन्न मिळाले, याची माहिती 'अल्फाबेट'ने जाहीर केलेली नाही.

इंटरनेटच्या वाढत्या प्रसारासह गेल्या काही वर्षांमध्ये 'यू-ट्युब'ची लोकप्रियताही वाढत गेली आहे. 'यू-ट्युब'च्या युझर्सची संख्या एक अब्जांहून अधिक झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. तसेच, 'यू-ट्युब'चे बहुतांश युझर्स 18 ते 34 या वयोगटातील आहेत.

Web Title: YouTube is financially profitable for Google and Alphabet