ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 10 December 2019

वासोटा किल्ल्याच्या ट्रेकिंगची भुरळ ही युवा वर्गात कायम आहे. देशभरातून अनेक हौशी ट्रेकर्स शनिवार, रविवार आणि सुटीदिवशी वासोटा ट्रेकिंगची सफारी करून आनंद लुटत आहेत. त्यामुळे वासोटा किल्ल्यावर आता ट्रेकर्सबरोबरी ही कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. 

किल्ले वासाेटा (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात किल्ले वासोट्याचा उपयोग कैद्यांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेला हा किल्ला प्रचंड खडतर आहे. 'वासोटा' हा सातारा जिल्ह्यातील वन दुर्ग म्हणून आेखळला जाताे. या किल्ल्याची उंची सुमारे 4267 फूट इतकी आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई- सकाळचा अॅप डाऊनलाेड करा
 
बामणोली येथून लॉंचने जाण्याशिवाय वासोटा येथे जाताच येत नाही. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चोरवणे या गावातूनसुद्धा वर चढाई करता येते. किल्ल्याच्या पायथ्याला मेट इंदवली येथे वन विभागाची परवानगी घेऊन वासोटाला जाता येते. हा ट्रेक उन्हाच्या अगोदर सुरवात करणे सोयीस्कर ठरते.

असा आहे किल्ले वासाेटा 

वासोटा किल्ल्यावर गेल्यावर काळाकुट्ट पाषाणाचे एकावर एक असे सात थर असलेला बाबूकडा, भग्नावस्थेत असलेला ताई-तेलीणीच्या किल्ल्याचा चौथरा, पाण्याची शिवकालीन तळी, महादेवाचे प्राचीन मंदिर यांसह सह्याद्रीच्या पर्वतरांगा, रत्नागिरी जिल्ह्याचा निसर्गरम्य परिसर, सह्याद्रीची उंच पर्वत शिखरे तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल या सर्व गोष्टींचे नेत्रसुख घेता येते. हे सर्व निसर्गसौंदर्य एवढे अप्रतिम आहे की, येथे येण्याचा पुन्हा पुन्हा मोह होतो.

प्रवास वासाेट्याचा 
सातारा - कास - बामणोली हा मार्ग सुंपर्णतः डांबरी आहे. हे अंतर सुमारे 40 किलोमीटरचे आहे. बामणोली येथून लॉंचमधून (बोट) वासोट्याच्या पायथ्याला जाता येते.
 
लॉंचसाठी सुमारे चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारले जातात. एका बोटीत किमान 12 प्रवाशांना घेतले जाते.
 
वन विभागाची परवानगी घेताना ओळखपत्र आवश्‍यक आहे. परवानगी शुल्क प्रत्येकी 50 रुपये आहे.

या ठिकाणी तुम्ही कॅमेरा नेणार असाल तर तुम्हांला 50 रुपये शुल्क द्यावे लागतात. तसेच येथे येणाऱ्या ग्रुपकडून 500 रुपये अनामत रक्कम घेतली जाते.
 
नॉनव्हेज पदार्थ, मद्य तसेच तंबाखूजन्य पदार्थ व शस्त्र नेण्यास येथे सक्त मनाई आहे.
 

या किल्ल्याची चढाई थोडी फार अवघड स्वरूपाची आहे. या किल्ल्यावरील ट्रेक म्हणजे एक थ्रिलच असते. येथे थोडा जरी पाय घसरला, तर सरळ दोन हजार फूट खोल दरीत. तुमचे पाय येथे लटपटायला लागतात पण ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही वाटचाल सुरूच ठेवता.
जेव्हा तुम्हा हा किल्ला सर करता तेव्हा तुमच्या मुखातून आपोपाच छत्रपती शिवाजी महाराज की जय....अशी घोषणा बाहेर पडता. अर्थाच तुम्ही एक लढाई जिंकली अशी त्यातील भावना असावी. 

संजय कदम, ट्रेकर्स, सातारा.

जरुर वाचा -  महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

रोजच्या कामाच्या व्यस्ततेतून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वासोट्याचा ट्रेक थरारक तेवढाच सुंदर होता. निसर्गाची किमया पाहायची असेल तर एकदा तरी वासोटा ट्रेक केलाच पाहिजे. सुरक्षिततेला प्राधान्य देवून वासोटा पर्यटन राबविले पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करु.

शरद पाटील, तहसीलदार, जावळी, तालुका, जिल्हा - सातारा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trekkers Are Keen To Visit Vasota Fort