फिरस्ते : सांधण व्हॅलीचा अद्‍भुत थरार

हर्षदा कोतवाल
Wednesday, 29 January 2020

ट्रेक डिटेल्स 
लागणारा वेळ : ९ ते १० तास 
पाण्याची सोय : व्हॅलीत कंबरेभर पाणी असले, तरी ते पिण्याजोगे नाही. त्यामुळे सोबत २/३ लीटर पाणी असणे आवश्‍यक 
जेवणाची सोय : साम्रद गावात जेवणाची सोय होऊ शकतो. मात्र, ट्रेक मोठा असल्याने सोबत सुका खाऊ ठेवावा. 
ट्रेकसाठी गावातून गाईडही मिळतो. 

कसे जाल? 
पुण्यापासून साम्रद गाव दोनशे किलोमीटर आहे. पुण्याहून एसटीनं संगमनेरपर्यंत जाता येतं. तेथून भंडारदऱ्यापर्यंत बसनं जाऊन साम्रदपर्यंत शेअर वाहनानं जाता येतं. 

कधी जाल? 
पावसाळ्याचे चार-पाच महिने वगळता कडक उन्हाळ्यातही हा ट्रेक करता येतो. 

लक्षात ठेवा 
अंधारामुळे खोल दरीचा अंदाज येत नाही, तसेच पाण्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्यानं पायात चांगले बूट, पूर्ण कपडे आणि सोबत टॉर्च असणं अत्यावश्‍यक आहे. रॅपलिंग करायचं असल्यास सोबत साहित्य असावं किंवा गाइड (त्यांचे साहित्य असते) असावा. पावसाळ्यात या व्हॅलीत अजिबात जाता येत नाही.

सांधण व्हॅलीबद्दल ऐकलं होतं, तेव्हापासून हा माझा ड्रिम ट्रेक होता. मी एक दिवस अचानक सांधण व्हॅलीला निघाले. रात्रीची वेळ असल्यानं घाट रस्त्याला वर्दळ फारच कमी, अगदी आमची गाडी एकटीच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही भल्या पहाटे साम्रद गावी पोचलो. पहाटे पूर्वेला जसाजसा सूर्य क्षितिजावर आपल्या किरणांचे कवडसे फेकू लागला, तसं रात्रीच्या गडद अंधारात दडलेले साम्रद गावाचं सौंदर्य खुलू लागलं. सूर्यकिरणांचा मंद प्रकाश आकाशात पसरला आणि साम्रद गावाचे चारही दिशांनी रक्षण करणारे पहारेकरी दिसू लागले. समोर अतिशय आखीव रेखीव दिसणारा रतनगड, डावीकडे अभेद्य असा हरिशचंद्रगड, मागे सह्याद्रीतील कठीण अलंग मदन आणि कुलंग गड, दूर आकाशाला गवसणी घालणारे कळसूबाई शिखर आणि उजवीकडे खोल सांधण व्हॅली. हे सर्व गड सोन्याची जर असलेली शाल पांघरलेल्या आई भवानीच्या रुपाएवढे देखणे भासत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for sandhan valley

विचार केला होता त्यापेक्षा नक्कीच जास्त कठीण, तसेच जिद्द आणि सहनशक्तीची परीक्षा पाहणारा हा ट्रेक. वैशाखातले ऊन असो किंवा श्रावणातला पाऊस, सांधण व्हॅलीचे रूप नेहमीच देखणे असते. एकमेकांना समांतर उभ्या असलेल्या सांधण व्हॅलीच्या भिंती त्यांच्या पोटात काय दडलंय याचा थांगही लागू देत नाहीत. ट्रेकला सुरुवात केल्यावर काही मिनिटांतच कंबरेभर पाण्यातून जावं लागलं आणि पुढं काय मांडून ठेवलंय याची मला प्रचिती आली. सांधण व्हॅलीच्या भिंती एवढ्या उंच आहेत, की कित्येक ठिकाणी सूर्यप्रकाश पोचतच नाही आणि कदाचित म्हणूनच या व्हॅलीला ‘Valley of Shadows’ असंही म्हणतात. 

आम्ही सलग तीन तास चालल्यानंतर पहिल्या रॅपलिंग पॉइंटला पोचलो. कड्यावरून खाली पाहिल्यावर मनात धडकी भरेल असा तो रॅपलिंग पॉइंट, त्यातच खालून येणारा धबधब्याचा धडकी भरविणारा आवाज वातावरणात अधिक गडद रंग भरत होता. मात्र, माझा रॅपलिंगचा पहिलाच अनुभव असल्यामुळं फार उत्सुकताही होती. स्वतःला धीर देत दोरी हातात घट्ट पकडली आणि त्याहीपेक्षा मन अधिक घट्ट करून रॅपलिंगला सुरुवात केली. खाली गेल्यावर कळालं, की आपण किमान ९० फूट रॅपलिंग करून आलो आहे. पुढं काही ठिकाणी दोन खडक एकमेकांशेजारी अशा रीतीनं तटस्थ उभे होते की, त्यातून झोपूनच मार्ग काढावा लागला. दुसऱ्या रॅपलिंग पॉइंटवरून खाली गेल्यावर सरळ छातीभर पाण्यात उतरावं लागलं. पुढं पाच मिनिटं चालून आम्ही व्हॅलीच्या बेसला पोचलो. 

आता आमची खरी कसोटी होती. कारण मागील सहा तास आम्ही व्हॅली उतरत आल्यानं थकवा जाणवत नव्हता, आता मात्र साडेतीन तास चढाई करायची होती आणि तेही भर उन्हात! पायातलं त्राण संपल्यात जमा होतं, घशाला सारखी कोरड पडत होती. मात्र, उंचावर गेल्यावर तिथून व्हॅलीचं दिसणारं नयनरम्य रूप फार सुखावणारं होतं. रतनगड आणि आजोबा पर्वतांमध्ये खोलवर दडून बसलेली ही सांधण व्हॅली इतकी अद्‍भुत असेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. सलग दहा तास चालण्यानं शरीर पुरतं थकलं होतं, पण मन मात्र सांधणचं विलोभणीय रूप साठवण्यात थकतं नव्हतं. एकाच वेळी सर्व थरारांचा अनुभव देणारा हा ट्रेक प्रत्येक ट्रेकरनं आयुष्यात एकदा तरी नक्कीच करावा. 

इन्स्टाग्राम हॅंडल : @harshadakotwal5 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article harshada kotwal on sandhan valley