सोलो ट्रॅव्हलर : गोवन गर्ल

शिल्पा परांडेकर
Friday, 6 March 2020

नाव : अदिती कारापूरकर 
वय : २६ 
गाव : गोवा (सध्या जयपूर, राजस्थान) 
काम : फ्रीलान्सर ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर,

नाव : अदिती कारापूरकर 
वय : २६ 
गाव : गोवा (सध्या जयपूर, राजस्थान) 
काम : फ्रीलान्सर ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर, 

‘जो काम में मजा है, उसे अपना प्रोफेशन बनाओ. फिर वो काम, काम नहीं खेल लगेगा.’ हा संवाद परिचित वाटतोय ना? एका फरहानला हे समजाविण्यासाठी एक रांचो होता. पण या ‘गोवन गर्ल’साठी तिची जिद्द, धाडस व तिचा आत्मविश्‍वास हाच तिचा रांचो होता. कायद्याचे शिक्षण, आयटीमध्ये चांगल्या पदाची नोकरी... सर्व सुखासुखी होते नक्की; पण असे ‘ते’ काहीतरी होते, की जे अदितीला शांत बसू देत नव्हते. आपल्याला काहीतरी सर्जनशील काम करायला हवे. एकसुरी आयुष्य आपण नाही जगू शकत. म्हणून तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

लहानपणापासून प्रवासाची आवड होती व कुटुंबासोबत अनेक ठिकाणी तिने प्रवासही केला होता; परंतु एकटीने प्रवासाचा तिने विचारही कधी केला नव्हता. मात्र स्वतःला शोधण्यासाठी ‘सोलो ट्रॅव्हलिंग’सारखा उत्तम पर्याय नाही, याची तिला खात्री होती. 
स्वतःच्या बचतीतून तिने पहिली सोलो ट्रिप केली ‘कसोल.’ ‘‘अधीरता, उत्सुकता, भीती हे सर्व वाटत होते नक्की. पण या प्रवासात माझा हरवलेला आनंद आणि त्या चार भिंतींच्या आड लपलेली ‘मी’ मला सापडले आणि माझे आयुष्यच बदलून गेले.’’ 

‘मला फिरण्याची आवड आहे, हे तर मला समजले, पण पुढे काय? आपण या आवडीलाच व्यावसायिक रूप दिले तर?’’ हा आयुष्याला कलाटणी देणारा दुसरा महत्त्वाचा निर्णय तिने घेतला आणि सुरुवात झाली नव्या प्रवासाची - ‘गोवन गर्ल - एका सामान्य मुलीचा, असामान्य प्रवास’. 

अदिती ‘गोअन गर्ल’ या नावाने ब्लॉग लिहिते. विमानातील मासिके व विविध वेबसाइट्सवर लिखाण करते. शिवाय, याच नावाने तिचे यू-ट्यूब चॅनेलही आहे. एकटीने प्रवास करण्याबरोबरच देश-विदेशांतील प्रवाशांना नवीन ठिकाणांची, प्रांतांची ओळख करून देणे अशाप्रकारे आवड आणि व्यवसाय यांचा सुरेख मेळ अदितीने घातला आहे. प्रसिद्ध ठिकाणांशिवाय वेगळ्या गोष्टींची माहिती करून घेऊन प्रवाशांना त्या दाखवणे, ही माझी आणि माझ्या व्यवसायाची खासीयत असल्याचे अदिती सांगते. 

भारत, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लंड, भूतान, मकाऊ, हाँगकाँग, शिवाय हिमालयातील विविध ट्रेक्स असा प्रवास तिने एकटीने केला आहे. प्रवास करू इच्छिणाऱ्या मैत्रिणींना अदिती सांगते, ‘‘सुरुवातीला एकटीने प्रवास करणे थोडे भीतिदायक वाटेलही, परंतु विश्‍वास ठेवा, हा प्रवास तुम्हाला सक्षम, स्वावलंबी बनवेल. तुम्हाला आत्मबल, आत्मविश्‍वास देईल, हे नक्की.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on aditi karapurkar