भटकंती : नांदूर मधमेश्वर अभयारण्य : महाराष्ट्राचे ‘भरतपूर’

नांदूर मधमेश्वर अभयारण्य
नांदूर मधमेश्वर अभयारण्य

नांदूर मधमेश्वर अभयारण्य निफाड तालुक्यात (जि. नाशिक) आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. अभयारण्याचे क्षेत्र सुमारे १००.१२ चौरस किलोमीटर एवढे आहे. गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर १९९९मध्ये बंधारा बांधण्यात आला. त्यातील पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्यांद्वारे सोडण्यात येऊ लागले.

त्यामुळे गाळ, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे, अशी भूरूपे तयार झाली. पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे, शैवाल, दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे ३५००० पक्षी आढळत असल्याची नोंद आहे. ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सालीम अली यांनी सन १९८२ मध्ये नांदूर मधमेश्वरला भेट दिली आणि ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे’ असे उद्‍गार काढले आणि सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली. हा परिसर १९८६ मध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथे मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, काळे कुदळे, खंड्या, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकू बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात. या जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हटले जाते. तसेच येथे टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. त्याशिवाय गॉडविट, सॅंड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरीत पक्षीसुद्धा येतात. पक्षिनिरीक्षकांच्या नोंदीनुसार येथे सुमारे २४० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात.

अभयारण्य परिसरात कोल्हा, मुंगूस, उदमांजर, बिबटे, लांडगे, विविध प्रकारचे साप इत्यादी प्राणी आढळतात. येथील जलाशयात सुमारे २४ जातींचे मासे आहेत. पक्षिनिरीक्षकांसाठी चापडगाव येथे दुर्बिण, स्पॉटिंग स्कोप, फिल्ड गाईड (पक्षी मार्गदर्शक पुस्तक), मार्गदर्शक यांची सोय करण्यात आलेली आहे. जलाशयाच्या काठाने निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले आहेत. मांजरगाव येथेसुद्धा निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेला आहे. खाणगाव थडी येथे निसर्ग निर्वाचन केंद्र, वन उद्यान, वनविश्रामगृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

येथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळत असल्यामुळे आणि येथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या आणि स्थलांतराच्या काळात एकूण पक्ष्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्यामुळे जागतिकदृष्ट्या हे महत्त्वाचे स्थळ आहे. २०२० मध्ये या ठिकाणाला जागतिक रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली. रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट होणारे हे महाराष्ट्रातील पहिले ठिकाण आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com