स्वयंभू गणेश- गणपतीपुळे

अरविंद तेलकर
Friday, 20 December 2019

कसे जाल?
पुण्याहून सातारा, कऱ्हाड, मलकापूर, साखरपामार्गे ३२५ किलोमीटर. ताम्हणी किंवा वरंध घाटमार्गेही जाता येईल. मुंबईहून कोलाड, महाड, चिपळूणमार्गे ३३८ किलोमीटर. गणपतीपुळ्यात गणेश मंदिराचं भक्तनिवास आहे. त्याशिवाय अनेक हॉटेलही आहेत. होम स्टे सुविधाही मिळू शकते.

वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
गणेश ही देवता भरतवर्षाचं आराध्य दैवत आहे. सातारकर छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रधानपदी (पेशवे) बाळाजी विश्‍वनाथ भट यांची नियुक्ती केली. पेशवे हे मोठे गणेशभक्त होते. त्यांच्याच काळात गणपतीची अनेक मंदिरे बांधण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यातीलच एक गणपतीपुळे. प्राचीन काळात या गणपतीपचा उल्लेख पश्‍चिमद्वार देवता, असा करण्यात आला आहे. भारताच्या आठ दिशांना आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी पुळ्याचा स्वयंभू गणेश ही एक आहे. पुळे या छोट्या गावात बाळंभटजी भिडे हे गावाचे खोत होते. त्यांच्यावर संकट कोसळलं आणि निवारण झाल्यानंतरच अन्नग्रहण करीन, असा त्यांनी निश्‍चय केला. एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला. मी भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी आगरगुळे (सध्याचं गणेशगुळे) इथून दोन गंडस्थळं व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. डोंगर हे माझं निराकार स्वरूप आहे.

पुणेकरांनो, व्हेज-नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारण्याची संधी; पाहा कुठे?

माझी सेवा, अनुष्ठानं आणि पूजाअर्चा कर. तुझ्यावरचं संकट दूर होईल, असा तो दृष्टांत होता. त्याच काळात भिडे यांची एक गाय दूध देत नव्हती. गुराख्यानं तिच्यावर लक्ष ठेवलं आणि सध्याच्या मूर्तीच्या जागी एका शिळेवर तिच्या आंचळांतून दुग्धधारांचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्यानं खोतांना सांगितल्यानंतर परिसराची साफसफाई करण्यात आली. तिथं त्यांना दृष्टांतातली गणेश मूर्ती दिसली. त्या जागेवर त्यांनी गवती छपराचं एक छोटं मदिर बांधलं आणि धार्मिक विधी सुरू केले.

गणेशाच्या या स्वयंभू स्थानाची महती सर्वत्र पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रथानांमधले सचिव अण्णाजी दत्तो यांनी केंबळी म्हणजे गवती छपराच्या जागा सुंदरसा घुमट बांधला. काही काळानं पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानाचे कारभारी माधवराव वासुदेव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवरावांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. सध्याच्या मंदिराचं बांधकाम १९९८ ते २००३ या काळात झालं. प्राचीन भारतीय स्थापत्यकलेनुसार हे मंदिर बांधण्यात आलं. त्यासाठी आग्ऱ्याहून खास लाल रंगाचा दगड आणण्यात आला. मंदिराच्या दक्षिण आणि उत्तरेला प्रत्येकी पाच त्रिपुरं आहेत.

त्रिपुरी पौर्णिमेला त्यावरचे दिवे, आसमंत झगमगवून टाकतात. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सूर्यास्तसमयी सूर्याची किरणं थेट स्वयंभू गणेशाचं दर्शन घेतात. वर्षभर इथं भाविकांची गर्दी असते. त्यांच्या सोयीसाठी सन २०१० मध्ये भक्तनिवास बांधण्यास सुरुवात झाली. ते पूर्ण होण्यास सुमारे चार वर्षं लागली.

पहिल्या मजल्यावर १५ डॉरमॅटरी आहेत. प्रत्येक डॉरमॅटरीत २५ जणांची सोय होऊ शकते. दुसऱ्या मजल्यावर ३६ खोल्या आहेत. त्यात सुमारे १०० भाविकांची निवासाची सोय आहे.

किनारपट्टीच्या या प्रदेशात इतरही अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. गणपतीपुळ्याहून अवघ्या साडेचार किलोमीटरवरचं मालगुंड, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांचं जन्मस्थान. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकारानं त्यांच्या राहत्या घराचं स्मारकात रूपांतर करण्यात आलं आहे. मालगुंडपासून एक किलोमीटरवर ओंकारेश्‍वराचं हेमाडपंती पद्धतीचं मंदिर आहे.

गणपतीपुळ्याहून सुमारे २० किलोमीटरवर जयगडचा किल्ला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहनं जाऊ शकतात. किल्ल्यात गणेशाचं मंदिर आहे. हा किल्ला विजयपूरच्या (विजापूर) आदिलशाहनं बांधला होता. संगमेश्‍वराच्या नाईक यांनी तो जिंकून घेतला. विजापूरकरांनी दोन वेळा तो पुन्हा ताब्यात घेण्याचाच अयशस्वी प्रयत्न केला. ब्रिटिश राजवटीत तो त्यांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या डाव्या बाजूचा रस्ता कऱ्हाटेश्‍वर मंदिर आणि दीपस्तंभाकडं जातो. बांधीव पायऱ्या उतरून या मंदिरात जाता येतं. मंदिराच्या जीर्णोद्धारात शंकराची पिंडी सापडली होती. जयगडहून १८ किलोमीटरवर कोळीसरे इथं लक्ष्मीकेशव मंतिर आहे. लक्ष्मीकेशवाची मूर्ती सुमारे पाच फूट उंच असून, नेपाळमधील गंडकी नदीतल्या शाळिग्रामापासून ती घडवण्यात आली आहे. ही देखणी मूर्ती चतुर्भुज आहे. कोळीसरेहून ३२ किलोमीटरवर हेदवी हे टुमदार गाव वसलंय. हेदवीचा शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त किनारा पर्यटक आणि भाविकांना नेहमीच आकर्षित करतो. किनाऱ्याजवळच उमा-महेश्‍वराचं मंदिर आहे. इथून ५ किलोमीटरवर वेळणेश्‍वराचं मंदिर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpatipule tourism place