खडतर वाटेवरचं जिद्दी आव्हान

हर्षदा कोतवाल
Monday, 11 November 2019

पाठीवर भली मोठी जड बॅग घ्यायची आणि सिंहगड किंवा तळजाई टेकडी गाठायची हे आता तिच्यासाठी रोजचचं झालं होतं. व्यायामाशिवाय आहारकडेही तिने लक्ष द्यायला सुरवात केली. एवढी अवघड मोहीम तिने सहज केला आणि त्याबद्दल तिचे कौतुकही केले गेले. तिचा फिटनेस आणि स्टॅमिनाबद्दल सर्वांनी तिचे मनापासून कौतुक केले आणि इथूनच तिच्या नव्या प्रवासाला सुरवात झाली. या मोहीमेनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. 

तिला सर्वांत जास्त प्रिय असणाऱ्या तिच्या बाबांना जाऊन आज वर्ष झालं होतं. सहा हजार फूट उंचीवर असणाऱ्या हिमालयातील माऊंट कॅथ्रेडलच्या शिखरावर निडरपणे उभी राहून ती कदाचित बाबांना हेच सांगत असावी की, तुम्हाला माझा अभिमान वाटावा असंच काम मी केलं आहे. त्यावेळी तिच्या मनात भावनांचा काय कल्लोळ उठला असेल याचा मात्र फक्त विचारच केलेला बरा. या ट्रेकनंतर तिने आता मागे वळून पाहणं सोडून दिलं आहे. अजूनही गिर्यारोहणातलं तिचं करिअर तळ्यातमळ्यातच आहे. आजही कधीकधी आपण ही वाट का निवडली असा प्रश्न संयमी टकले हिला नक्कीच पडतो. मात्र, तिचा प्रवास पाहता तिच्यासारख्या अनेक मुलींना सोलो ट्रॅव्हलिंग आणि गिर्यारोहणामध्ये करिअर करण्यास प्रेरणा मिळेल हे नक्की. 

शाळेत असताना ऍथलेटिक्स, स्विमिंग, स्केटींग, जिम्नॅस्टिक अशा खेळात पारंगत असलेल्या संयमीचे तुमच्या आमच्या सारखेच दहावीनंतर मात्र या साऱ्या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष झालं. पाच-सहा वर्षे तिने स्वत:च्या शरिराकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही. कोणताही शारीरिक व्यायाम नसल्याने तिला सोपे सोपे ट्रेकही अवघड वाटू लागले. आतापर्यंत तिला ट्रेकिंगबद्दल गोडीही लागली नव्हती. या काळातच तिने सिंहगडावर ट्रेकला जायचं असं ठरवलं. मात्र, सिंहगड चढताना अर्ध्यातच ती धापा टाकू लागली आणि दमलेल्या तिने माघार घेतली. हिमायलातील उंच शिखरांवर लिलया चढाई करणारी संयमी साधा सिंहगडचा ट्रेक पूर्ण शकली नव्हती. तसं पाहायला गेलं प्रत्येक पुणेकरासाठी ज्याचा इतिहास वाचत वाढले, घडलो, ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो असा प्रिय सिंहगडही पूर्ण चढता न येणं म्हणजे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. तिच्याही मनात ही खंत घर करुन बसली. 

स्टेबल करिअर मिळवण्याच्या नादात पद्वीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 2016मध्ये तिने रिअल इस्टेटमध्ये नोकरी करण्यास सुरवात केली. 9-5 जॉब करती करता ती कॉर्पोरेट लाईफमध्ये चांगलीच रमली. आपण दर नववर्षी अनेक गोष्टी ठरवतो आणि संपूर्ण वर्ष किती भारी घालवणार याबद्दल विचार करतो. मात्र, हा विचार 15 दिवसांत हरवतो आणि आपण पुन्हा भोपळ्या चौकात येतो. संयमीनेदेखील असेच अनेक संकल्प केले असतील. मात्र, तिला कल्पनाही नव्हती की हे वर्ष तिच्या आयुष्यात एवढं बदल घडवणारं ठरेल. 'माऊंट एव्हरेस्ट' हे जगातील प्रत्येक म्हणजे अगदी नवशिख्या, कसलेल्या प्रत्यकेच गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. का? तर ते जगातील सर्वांत उंच शिखर आहे हे मी आता वेगळं नमूद करायला नको. त्यापू्र्वी करायला लागणारा 'माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प' म्हणजे प्रत्येकासाठी ड्रीम मोहीम असते. 18 दिवसांची ही मोहीम खर्चिक, सहनशक्तीची परिक्षा पाहणारी आणि प्रचंड थंडीत करावी लागणारी मोहीम आहे. मात्र, या सगळ्यात येणारा अनुभव आणि एव्हरेस्टचं झालेलं दर्शन म्हणजे एक नयनसोहळाच असतो. संयमीला 2016मध्ये एप्रिल महिन्यात 'माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प'च्या मोहीमला जाण्याची संधी मिळाली. हो हो 'माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प'. 

Image may contain: 1 person, smiling, outdoor

एव्हरेस्टचा बेस कॅम्प म्हणजे एक वेगळंच प्रकरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बेस कॅम्प असूनही याची उंची 5,400 मीटर म्हणजेच 17,500 फूट. तापमान -5 ते -15 पर्यंत खाली उतरते तर वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण फक्त 54 टक्के असते. अशा प्रतिकूल परिस्थीतही एव्हरेस्टच्या पायथ्याशी दरवर्षी एक गाव वसतं. त्यातही बेसकॅम्पवर जिथं तंबू लावले जातात तो भूभाग अतिशय अस्थिर आहे. इथलं तापमान सतत
बदलत राहतं आणि म्हणूनच खालचा बर्फाचा पृष्ठभाग सतत हालत राहतो. इथे अनेक ठिकणी हिमभेगाही आहेत. जर चुकून यात कोणी पडलं तर कळणारही नाही एवढ्या त्या विशाल असतात. बेस कॅम्पवर कोणीही एकट्याने न फिरण्याचा नियम आहे आणि त्यामुळे आधीपासून तयार असलेल्या वाटांवरुनच चालणं इथं गरजेच असतं. बेस कॅम्पवरचं वातावरण म्हणजे अजब खेळ आहे. इथं दुपारपर्यंत  लख्ख ऊन असतं आणि त्यामुळे बरंच उबदार वातावरण असतं. पण संध्याकाळ होऊ लागली की वातारवरणात झपाट्याने बदल होतात. दिवस मावळला की एकदमच अंधारुन येतं आणि कधीकधी पाऊस आणि सोबतच हिमवर्षावाचाही सामना करावा लागतो. सूर्योदयाबरोबरच रात्रबर गोठलेले झरे वाहायला लागतात तर सूर्य मावळला की तेच झरे पुन्हा गोठतात. दूरदूरपर्यंत फक्त दोन रंग दिसतात, एक बर्फाचा पांढरा आणि दुसरा खडकांचा काळा. 

एवढे रौद्र रुप असणाऱ्या या मोहीमेसाठी सरावही तसाच करावा लागणार होता. संयमीनेही सलग 2-3 महिने कसून सराव केला. पाठीवर भली मोठी जड बॅग घ्यायची आणि सिंहगड किंवा तळजाई टेकडी गाठायची हे आता तिच्यासाठी रोजचचं झालं होतं. व्यायामाशिवाय आहारकडेही तिने लक्ष द्यायला सुरवात केली. एवढी अवघड मोहीम तिने सहज केला आणि त्याबद्दल तिचे कौतुकही केले गेले. तिचा फिटनेस आणि स्टॅमिनाबद्दल सर्वांनी तिचे मनापासून कौतुक केले आणि इथूनच तिच्या नव्या प्रवासाला सुरवात झाली. या मोहीमेनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. 

या मोहीमेवरुन पुण्यात परतल्यावर तिने सर्वप्रथम आपली नोकरी सोडून दिली. मोहीमेसाठी लागलेल्या 18 दिवसांच्या कालावधीत तिला कळून चुकलं होतं की 9-5 मध्ये अडकून राहणारी ती मुलगी नाही आणित्यामुळेच तिने नोकरीला रामराम ठोकला. 2016 तिच्यासाठी सर्वतोपरिने चांगले होते. तिने बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्ससाठी नोंदणी केली. याच काळात तिची पुण्यातील गिरीप्रेमी या संस्थेशी ओळख झाली. ती गिरीप्रेमीमध्ये लहान मुलांसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहू लागली आणि त्यांच्यासोबत दर महिन्याला त्यांना ट्रेकला नेऊ लागली. तिने याच वर्षात नाशिकमधील अंजनेरी आणि पाहिने नवरी या डोंगरांवर रॉक क्लायबिंग केले तसेच सिंहगडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत सायकल चालवत आली. सिंहगडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर ती ढसाढसा रडली होती. या गोष्टीचं मोल तिच्यासाठी प्रचंड होतं आणि म्हणूनच तिचा आनंद वाट मिळेल तिकडे वाहवत जात होता. 

बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्समध्ये  हिमालयातील मोठ्या मोहीमांसाठी गरजेचे असलेले प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये कमी ऑक्सिजनमध्ये आणि विशिष्ट उंचीवर गेल्यावर कसे ट्रेकिंग करावे याचे प्रशिक्षण दिले जात. याशिवाय रॉक क्लायम्बिंग, रिव्हर राफ्टींग आणि रॅपलिंग यांचेही प्रशिक्षण दिले जाते. तिने पेहलगाममधील जवाहरलाल इन्स्टीट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगमधून हा कोर्स पूर्ण केला. पुण्यापासून श्रीनगर आणि तिथून पेहलगामप्रयंतचा प्रवास एकटीने करणे तिच्यासाठी नवीन होते. कोर्सला सुरवात झाल्यावर पहिला आठवडा तिला फार कठीण गेला. रोज रात्री तंबूत परतल्यावर ती रडत बसायची. तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला आणि नवे मित्र मैत्रिणी व्हायला थोडा वेळ गेला. त्यानंतर मात्र तिने या कोर्समध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केली. या कोर्सच्या शेवटी तिला Best Endurance- female award मिळाला. या कोर्समध्ये तिला स्वत:च्या क्षमतेचा अंदाज आला होता आणि त्यामुळे ती प्रचंड आनंदी होती. अशातच तिने अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्ससाठी नोंदणी केली. हा कोर्स ती हिमालयीन इन्स्टीट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगमधून ऑक्टोबर-नोव्हेंबर या ऐन थंडीच्या काळात करण्याचा ठरविला. 

Image may contain: outdoor and nature

लहानपणीपासूनच बाबा म्हणजे तिचा बेस्ट फ्रेंड होता आणि म्हणूनच अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्सला जाण्याच्या तिच्या निर्णयाचे ते स्वागत करतील अशी तिची अपेक्षा होती. झाले मात्र उलटेच. तिने अजूनही करिअरची कोणतीही वाट धरली नसल्याने बाबांनी तिच्या या निर्णयला कडाडून विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये रोज मतभेद होऊ लागले. तिला बाबांनी अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्सचा फॉर्म भरण्यासाठीही पैसै दिले नाहीत. मात्र तिनेही गिर्यारोहणातच करिअर करायचे ठरवले होते, मग त्यासाठी काहीही करायला लागले तरी चालेल.. बाबा ऐकत नाहीत म्हटल्यावर तिने घरी खोटं बोलून पैश्यांची सोय केली आणि अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्सचा फॉर्म भरला. पुढील काही महिने तिने कोर्ससाठी सराव चालू ठेवला तसेच गिरीप्रेमीमध्ये मार्गदर्शक म्हणून कामही करायला सुरवात केली. याच काळात तिने पहिल्यांदा 250 फूट उंचीच्या तैलाबैलावर रॉक क्लायम्बिंग केले. 

आता सगळं आपल्या मनासारखं होणं याला तर आयुष्य म्हणत नाहीत. सगळा रस्ता चांगला असतानाच आपल्याला ठेच लागावी यालाच तर आयुष्य म्हणतात. संयमीलाही चांगलीच ठेच लागली. माऊंट नूनच्या मोहीमेसाठी गेलेल्या तिच्या बाबांचा 7000 मी. उंचीवर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मृत्यु झाला. तिचं आयुष्य थांबलं. तिच्या आयुष्यातील गिर्यारोहणाचं बाळकडूच आटलं होतं. बाबांच्या मृत्युनंतर तिला जगण्याचा राग येऊ लागला. मात्र या रागाला तिने योग्य वाट देण्याचं ठरवलं आणि तिने स्वत:ला कोर्सच्या सरावात झोकून दिलं. अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्सला जाण्याचा तिचा निर्णय आता अगदी ठाम झाला होता. आता ती मागे वळून पाहणार नव्हती. अजिबातच नव्हती. मग तिने कसून सरावाला सुरवात केली. पाठीवर 15 किलो वजन घेऊन दोन वेळा सिंहगडावर चढ उतार करण्यास तिने सुरवात केली. सलग महिनाभर ती क्लायम्बिंग जिमला गेली. तिच्या बाबांचे निधन आणि अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्समध्ये केवळ दीड महिन्याचे अंतर होते. मोहीमवर असतानाच बाबांना मृत्युने मिठी मारली तरी तिच्या आई आणि आजोबांना तिला एकदाही कोर्सला जाऊ नको असे सांगितलेही नाही. तिचा अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्सचा अनुभव खूप चांगला होता मात्र चांगली कामगिरी करुनही तिला त्यात 'ब' श्रेणी मिळाली. पुण्यातील एका गिर्यारोहण संघटनेच मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या तिने या कोर्ससाठी प्रचंड कष्ट घेतले होते आणि त्यामुळेच ही बीब तिच्यासाठी फार लाजिरवाणी होती. तिने चिडून गिर्यारोहण सोडण्याचा निर्णय घेतला. तिला आलेला राग जाण्यसाठी तब्बल पूर्ण आठवडा जावा लागला. 

त्यानंतर तिने गिर्यारोहणाकडे करिअर म्हणून पाहणे बाजूला ठेवले. मात्र, त्यापासून ती लांब नाही राहू शकली. या काळात तिने सह्याद्रीमध्ये भटकंती केली. डिसेंबर-जानेवारीमध्ये तिने हिमालयात चापोटा, चंद्रशिला, तुंगनाथ आणि काऊरी पास असे ट्रेक केले. 2018मध्ये ती पुन्हा अॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्स करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधील निमास येथे गेली. यावेळी तिला काहीही करुन  'अ' श्रेणी मिळवायचीच होती. मात्र यावेळी आव्हानेही वेगळी आणि खडतर होती. 18 जणांच्या कोर्समध्ये संयमी एकटीच मुलगी होती. तिच्यासोबतीला महिला प्रशिक्षकही नव्हत्या. यावेळी पाठीवर 15-18 किलोची बॅग घेऊन तब्बल 250 किमी चालायचे होते. यावेळी तिला एकटीला वेगळा तंबू देण्यात आला होता. संपूर्ण कोर्सभर अनेक रात्री रडत काढल्या आणि त्याला कारणही तशीच होती. सूर्यास्तानंतर तंबूत गेल्यावर तिच्याशी बोलायलाही कोणी नाही..  थंडीला सुमारच नाही..  सलग 21 दिवस काहीच नेटवर्क नाही.. बाहेरच्या जगाबद्दल काहीच खबरही नाही... प्रत्येक क्षणाला येणारी बाबांची आठवण... त्यात सुरवातीलाच स्टाफकडून मिळालेली गैरवर्तणूक.. या सर्व अडचणींचा सामना करत तिने अखेर या कोर्समध्ये अ श्रेणी मिळवलीच. 

Image may contain: one or more people, snow, mountain, outdoor and nature

या कोर्सनंतर तिचं आयुष्य पुरतं बदललं. कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी आता ती खचून जाणार नव्हती. त्यांनंतर काही काळ तिने पुण्यातील गडांवर ट्रेक्सचे नियोजन केले. आणि जुलैमध्ये अससेल्या मोहीमेचा सराव सुरु केला. जुलै 2018मध्ये ती स्वत:च्या खिशातून 80 हजारांहून जास्त रक्कम खर्च करत माऊंट कॅथ्रेडल या सहा हजार फूट उंचीच्या शिखरावर निघाली. या रकमेतील बरीचशी रक्कम आईने भरली होती त्यामुळे शिखर सर करण्याचे वेगळेच दडपण तिला आले होते. बाबांना जाऊन आता वर्ष होत असल्याने मनात वेगळाच काहूर माजला होता. नयनरम्य मात्र प्रचंड खडतर आणि आव्हानात्मक स्पिती व्हॅलीमध्ये असणाऱ्या माऊंट कॅथ्रेडल शिखरावर तिने चढाई केली. त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर केवळ बाबा आणि तिला सतत पाठींबा देणारी घरातील इतर माणसे होती. तिच्यासाठी हा क्षण प्रचंड भावनिक होता. 

या मोहीमेवरुन परतल्यावर तीने मेघालयमध्ये ट्रेक्सचे नियोजन केले. गिरीप्रेमीच्या साथीत ती सध्या बेसिंग रॉक क्लायम्बिंगचे प्रशिक्षण देते, ट्रेक्सचे नियोजन करते आणि यंदाच्या वर्षात जुलैमध्ये सात हजार फूट उंचीवर असलेल्या शिखरावर जाण्यासाठी तयारीही करत आहे. तिचे किंवा गिर्यारोहणात करिअर करण्याचा निर्णय घेतलेल्या कोणाचेही आयुष्य बाहेरुन पाहिले की त्याचा प्रचंड हेवा वाटतो. मात्र, त्यामागे अमाप कष्ट असतात हे इतरांना कधीच दिसत नाही. बऱ्याचदा रात्रची झोप मिळत नाही, खिशातील पैसे पुरेसे होत नाहीत, अनेक दिवस घरापासून लांब रहावे लागते आणि फॅन्सी जेवणही जेवता येत नाही. मात्र, म्हणून ही वाट वाईट आहे असे नाही. या वाटेवर रोज नव्या माणसांना आणि त्यांच्या कहाणीला भेटण्याची संधी मिळते, रोज नव्या अनुभवाची भरपडत असते तर बोलायला विषयांची कमतरता अजिबात भासत नाही. ही वाट अवघड असली तरी सैयमीने स्वत: याची निवड केली आहे आणि या वाटेवर निडर राहून नवी शिखरे सर करायला ती रोज तयार असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inspiring journey of Saiyami takale from Pune