सेलिब्रिटी वीकएण्ड : कोकण माझ्या आवडीचा

Aaditya-Sarpotdar
Aaditya-Sarpotdar

भटकंती हा माझ्या आवडीचा विषय. त्यामुळं वेळ मिळताच मी भटकंतीसाठी बाहेर पडतो. चित्रपटाच्या दिग्दर्शनानिमित्तानं मला राज्यभर फिरता येतं, विविध ठिकाणांची माहितीही होती. चित्रीकरणासाठी चांगली ठिकाणंही निवडता येतात.

ऐतिहासिक अन् पौराणिक जागांची माहितीही होते. खरंतर माझा आवडता परिसर कोकणाचा. माझं मूळ गावही कोकणातच आहे. चित्रीकरणाला सुटी असताना मी हमखास कोकणात फिरायला जातो. तोच माझ्यासाठी वीकएण्ड असतो. अलिबाग, सावंतवाडी ही माझी आवडती ठिकाणं. त्याचप्रमाणं मी सिंधुदुर्गमध्येही रमतो. तिथं आगळ्यावेगळ्या रचनेची जुनी घरंही पाहायला मिळतात. 

मला दोन लहान मुलं आहेत. त्यामुळं कुटुंबीयांसमवेत भटकंतीला जाताना फार काळजी घ्यावी लागते. मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळं आम्ही पवना धरण परिसरामध्ये दोन-तीन दिवस घालवितो. तिथं टेंटही टाकले जातात. त्यातून मुलांना खूप आनंद मिळतो. त्याचप्रमाणं पुणे-मुंबई दरम्यान दोन-तीन तासांमध्ये जाता येणाऱ्या किल्ल्यांवरही मी मित्रांसमवेत ट्रेकिंगला जातो. अनेक ठिकाणं आणि फार्म हाउसवर वेगवेगळ्या प्राण्यांची माहितीही मिळते.

त्यांची कशी काळजी घेतली जाते, हे मुलांना समजण्यासाठी त्यांनाही बरोबर नेतो. अशाच पर्यटनातून आम्ही घोडेस्वारीही शिकलो. खरंतर निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळं मन प्रसन्न होतं. त्याचा फायदा दिग्दर्शनात हमखास होतो. 

कोकणात केलेल्या भटकंतीचा फायदा मला दिग्दर्शक म्हणून ‘उनाड’ या चित्रपटासाठी झाला. मुलांचं १५ ते १६ वर्षाचं वय उनाडच असतं. त्यावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यापूर्वी मी दोन चित्रपटांचं दिग्दर्शनही कोकणातच केलं आहे. हे सगळं मला भटकंतीमुळंच सुचलं. त्यामुळं प्रत्येकानंच निसर्गाच्या सानिध्यात वा गड-किल्ल्यांवर जाऊन भटकंती करावी. त्यासाठी त्या ठिकाणाची माहिती असणारा माणूस बरोबर न्यावा. त्यामुळं आपला प्रवास, भटकंती सुरक्षित आणि सुरळीत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com