भटकंती  : चिपळूणचा गोवळकोट 

मयूर जितकर 
Friday, 5 June 2020

आपल्या महाराष्ट्रात पावसाळ्यात गडकिल्ल्यांचे निसर्गवैभव फुलते.कोकणातील चिपळूण या शहराजवळ वशिष्ठी नदीची खाडी आहे.ही खाडी समुद्राला जोडत असल्याने या मार्गामुळे चिपळूणला बंदराचे महत्त्वही प्राप्त झाले.

पावसाळा सुरू झाला की, हिरव्यागार निसर्गातील भटकंतीची चाहूल लागते. यंदा कोरोनामुळे अजून तरी अशा भटकंतीवर निर्बंध आहेत. मात्र, हे संकट लवकरच दूर होऊन आपल्याला भटकंती करता येईल, अशी आशा करूया. तोपर्यंत अशा ठिकाणांची माहिती घ्यायला काय हरकत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या महाराष्ट्रात पावसाळ्यात गडकिल्ल्यांचे निसर्गवैभव फुलते. कोकणातील चिपळूण या शहराजवळ वशिष्ठी नदीची खाडी आहे. ही खाडी समुद्राला जोडत असल्याने या मार्गामुळे चिपळूणला बंदराचे महत्त्वही प्राप्त झाले. याच मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीमध्ये गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. हा लहानशा आकाराचा किल्ला गोविंदगड म्हणूनही ओळखला जातो. तो चिपळूणपासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याला करंजेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिराचे प्रांगणही चांगल्या प्रकारे सुशोभित केलेले आहे. एकेकाळी या भागामध्ये करंजाची झुडुपे मोठ्या प्रमाणावर होती. या करंजाच्या झुडपांमध्ये प्रकटलेली देवी म्हणून तिचे नाव करंजेश्वरी पडले. या जीर्णोद्धार केलेल्या प्राचीन मंदिरात राहण्याचीही चांगली सोय आहे. गडावर रेउजाई मातेचे मंदिर आहे. आपण पायऱ्या चढून वर गेल्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पाची मोठी इमारत दिसते. तेथून पाचदहा मिनिटांच्या अंतरावर किल्ल्याची तटबंदी आहे. तटबंदीमधील दरवाजा आता अस्तित्वात नाही. दोन्ही बाजूचे बुरूज आपले लक्ष वेधतात. त्यापैकी एका बुरुजावर फडकणारा भगवा झेंडा आणि त्याखालील तोफ मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. उजव्या बाजूच्या बुरूजावरही दोन मोठ्या तोफा आहेत. गडाची दगडी तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे. गडाच्या पश्चिमेस आल्यावर बुरुजावरून वशिष्ठी नदीच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते. त्याचप्रमाणे, नारळाच्या बागा व आजूबाजूचा हिरवागार निसर्ग मन प्रफुल्लित करतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कसे जाल 
चिपळूण मुंबई-पणजी महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. ते कोकण रेल्वेनेही जोडले गेले आहे. 

जेवण्याची पाण्याची सोय 
गोवळकोट किल्ल्यावर पाण्याची तसेच जेवणाचीही सोय नाही. त्यामुळे, खाद्यपदार्थ, पाणी सोबत ठेवावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayur jitakar article about gowalkot chiplun