सातपुड्याच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘चिखलदरा’; पाहण्याजोगे सुमारे १५ पॉइंट्‌स

नीलेश डाखोरे
Thursday, 4 March 2021

‘सनसेट पॉइंट’वरून दिसणारा सूर्यास्त तर डोळ्यांचे पारणे फेडतो. हा पॉइंट पाहिल्याशिवाय चिखलदऱ्याच्या सहलीला पूर्णत्व येऊ शकत नाही. पावसाळ्याच्या दिवसांतली रिमझिम आणि गार गार हवेची झुळूक मनाला भुरळ घालते. हिरव्याकंच गवताचे गालीचे चिखलदऱ्याच्या सौंदर्याला चार चॉंद लावतात.

नागपूर : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्ह जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षा संपताच चाहूल लागते फिरायला जाण्याची. लहान मुलं आई-वडिलांकडे बाहेर जाण्यासाठी तगादा लावत असतात. आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जाणार असा प्रश्न ते आई-वडिलांना विचारत असतात. याच स्वस्त आणि चांगलं उत्तर चिखलदऱ्याच्या रूपात मुलांसह आपल्याला मिळते.

विदर्भ हा विविध गोष्टींनी तसा समृद्ध आहे. येथे वाघांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच विदर्भाला टायगर कॅपिटल म्हणूनही संबोधले जाते. येथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. आपल्याला वाघ बघता यावा म्हणून आजवर तीन ते चार वेळा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ताडोबाला भेट दिली आहे. यावरूनच येथील पर्यटनाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

अधिक वाचा - खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी

सातपुड्याच्या कुशीतील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. इतिहासाची साक्ष देणारा गाविलगड किल्ला. समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर असलेल्या चिखलदऱ्याला ‘विदर्भाचे काश्‍मीर’ म्हणून संबोधले जाते. नागमोडी वळण सुरू झाले की, समजायचे चिखलदऱ्याचा हिरवागार परिसर सुरू झाला. चिखलदऱ्यात पाहण्याजोगे सुमारे १५ पॉइंट्‌स आहेत. भीमकुंड व तेथील धबधबा तर पर्यटकांना मोहिनीच घालतो.

किचकाच्या वधानंतर कुंडात भीमाने हात धुतल्याने त्या कुंडाचे नाव ‘भीमकुंड’ पडल्याची आख्यायिका आहे. भीमकुंडाशेजारीच ‘देवीपॉइंट’ आहे. चंद्रभागा नदीचे उगमस्थान असलेल्या या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह खोल दरीत कोसळतो. येथे गुहेत देवीचे मंदिर आहे. उन्हाळा असो की पावसाळा या मंदिरातून पाण्याचा पाझर सतत सुरू असतो. त्यामुळेच देवीमंदिरातील वातावरण सदासर्वकाळ प्रसन्न असते. काळ्या पाषाणात खोदलेल्या गुहेतील हे मंदिर डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे आहे.

याच पॉइंटजवळ चिखलदऱ्यातील सर्वांत मोठा ‘सक्कर तलाव’ आहे. पावसाळ्यात या तलावात बोटिंगचा आनंद काही निराळाच. ‘मोझरी पॉइंट’ हे असेच मन प्रसन्न करणारे ठिकाण. उंचावर असणाऱ्या या ठिकाणाहून रात्री घाटाखालील गावे व तेथील रोषणाई पाहण्याजोगी असते. 

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना

‘सनसेट पॉइंट’वरून दिसणारा सूर्यास्त तर डोळ्यांचे पारणे फेडतो. हा पॉइंट पाहिल्याशिवाय चिखलदऱ्याच्या सहलीला पूर्णत्व येऊ शकत नाही. पावसाळ्याच्या दिवसांतली रिमझिम आणि गार गार हवेची झुळूक मनाला भुरळ घालते. हिरव्याकंच गवताचे गालीचे चिखलदऱ्याच्या सौंदर्याला चार चॉंद लावतात.

एकमेकांना आवाज देण्याची मजाच काही निराळी

‘पंचबोल पॉइंट’वर एकमेकांना आवाज देण्याची मजाच काही निराळी. या ठिकाणाहून आवाज दिल्यास त्याचे पाच प्रतिध्वनी उमटतात. या पॉइंटवर गेल्याशिवाय चिखलदऱ्याची सहलच पूर्ण होऊ शकत नाही. ‘सनसेट पॉइंट’वरून सूर्य अस्ताला जात असतानाचे दृश्‍य तर डोळ्याचे पारणे फेडतो. यासह चिखलदऱ्यातील अनेक पॉइंटवर गर्दी होत असते. या परिसरात आदिवासी समाजाची संस्कृती आजही टिकून आहे.

निसर्गाच्या अद्‌भुत किमयेने नटलेला हा प्रदेश

इंग्रजांनी चिखदऱ्यात लावलेले कॉफीच्या झाडांचे अस्तित्व आजदेखील शाबूत आहे. थंडगार हवेत येथील कॉफीची चव जिभेवरून जात नाही. निसर्गाच्या अद्‌भुत किमयेने नटलेला हा प्रदेश आहे. झुळझुळ गार वारे.. त्यावर डुलणारी झुल्फे सावरीत मस्त हिंडण्याची हौस भागवायची तर सातपुड्याच्या या प्रदेशात आलेच पाहिजे.

अधिक वाचा - रुग्णालयात सफाईसाठी गेला कर्मचारी; शौचालयाच्या सीटमध्ये सळाख टाकताच बाहेर आले मृत अर्भक

कसे पोहोचायचे? 

चिखलदरा हे अमरावतीपासून ७२ किलोमीटर अंतरावर आहे. अमरावती ते परतवाडा हे अंतर ५० किलोमीटर असून, परतवाड्याहून चिखलदऱ्याला जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसांसह खासगी वाहनेही उपलब्ध आहेत. चिखलदरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पर्यटन महामंडळ, पाणीपुरवठा विभाग, वन विभाग तसेच नगरपालिकेचे विश्रामगृह आहे. याशिवाय अनेक खासगी हॉटेलदेखील आहेत.

कोरोनाच्या नियमांचे करा पालन

सद्या कोरोना वाढीवर आहे. अमरावतीत तर कोरोनाचा स्फोटच होत आहे. यामुळे येथे आठ मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत राहिल्यास आणखी लॉकडाऊन वाढू शकतो. तेव्हा कोणतेही नियोजन करण्यापूर्वी याचा विचार नक्की करा. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. फिरायला जाताना कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur tourism News Planning a mudslide Then read this