पक्षी अभयारण्यातील अविस्मरणीय मुक्काम

पंकज झरेकर
Saturday, 18 January 2020

नैसर्गिक संपत्तीचं भांडार नाशिक शहराला लाभलं आहे. त्यातीलच एक रत्न म्हणजे नांदूर मधमेश्‍वर पक्षी अभयारण्य.

भटकंतीसाठी नाशिक जिल्हा समृद्ध आहे. गुजरात सीमेकडे सेलबारी-डोलबारी, अजिंठा सातमाळ या डोंगररांगा, शहरापासून दहा बारा किलोमीटरवरच अंजनेरी, ब्रह्मगिरी, पहिने अशा डोंगरांचा सहवास, गंगापूर, भावली, वैतरणा, मुकणे अशा अनेक जलाशयांचा शेजार, प्राचीन लेणी असं नैसर्गिक संपत्तीचं भांडार नाशिक शहराला लाभलं आहे. त्यातीलच एक रत्न म्हणजे नांदूर मधमेश्‍वर पक्षी अभयारण्य.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाशिक शहरापासून सायखेडामार्गे अवघ्या तासाभराच्या अंतरावर हे अभयारण्य आहे. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामुळे निर्मित जलाशयाच्या काठाने अंदाजे १०० चौरस किलोमीटरचे अभयारण्य घोषित झालं आहे. उथळ पाणी, अनेक प्रकारच्या पाणवनस्पती, काठावरची झाडी आणि समृद्ध भोवताल यामुळं अनेक पक्ष्यांसाठी उत्तम नैसर्गिक अधिवास निर्माण झाला आहे. नाशिक-सायखेडा-शिंगवे मार्गाने चापडगाव येथे या अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. काही अंतरावरच उभारलेल्या निरीक्षण मनोऱ्यावरून संपूर्ण जलाशयाचे आणि आसपासचे विहंगम दृश्य दिसते. सशुल्क गाइडसह वनखाते आणि खासगी गाइड यांच्या एकत्रित सौजन्याने तंबू निवासाची आणि मुक्कामाची सुविधाही उपलब्ध आहे. इथला मुक्काम आगळावेगळा आणि अविस्मरणीय ठरतो. 

कधी जाल आणि काय पाहाल?

हिवाळ्यातल्या सकाळच्या थंडीत अंधारातच नाशकातून मधमेश्‍वरची वाट धरायची. तांबडं फुटायच्या आधीच गेटवर पोचायचे. 

दिवस उजाडता वॉचटॉवरवरून नयनरम्य  सूर्योदयाचा अनुभव घ्यायचा. पर्यटन सुविधा केंद्रात एव्हाना जाग आलेली असते. तिथं गरमागरम चहा घेऊन असाच एखादा दूरवर गेलेला बांध धरून चालत रहायचं. झाडांखाली अजूनही धुक्याचा वावर असतो. अशा धुक्यातून दूरवर चालत जायचं. 

आपल्या चाहुलीनं बांधानजीकची बेडकं पाण्यात झेपावतात, एखादा पाणसर्प सळकन बांधावरून गवतात शिरतो. कानांवर पाणपक्ष्यांचा क्वॅकक्वॅक, पाण्यातली पंखांची फडफड, पिलांचा कोवळा स्वर, घसा बसल्यासारखा ट्राव-ट्राव असा आवाज येत राहतो. 

शेलाट्या, चित्रबलाक, थापट्या, विविध प्रकारची बदकं, चक्रवाक, करकोचे असे विविध पक्षी अधूनमधून जलाशयात दर्शन देत राहतात. हा नेचरट्रेल मनाला सुखद शांतता देऊन जातो. 

अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून पुढं काही अंतरावर बंधाऱ्याचे, धरणाचे गेट पाहता येतील. शिवाय तिथलं प्राचीन मधमेश्‍वर आणि मृगव्याध मंदिर अतिशय सुंदर आहे. 

 काय काळजी घ्याल?
पिण्याचे पाणी आणि कोरडा खाऊ जवळ ठेवावा. 
डोक्यावर टोपी, पायांत चांगले बूट, निरीक्षणासाठी दुर्बीण आणि कॅमेरा असल्यास उत्तम.
कचरा करू नका, अधिवास खराब होईल, पक्षी विचलित होतील असे वागू नका

  काय अनुभवाल?
तलावाच्या काठाने आपली चाहूल लागू न देता झाडीत लपलेल्या पक्ष्यांचा शोध आणि हालचाल.

बदकांची एकामागोमाग चाललेली रांग, ध्यानस्थ बसलेला बगळा, आकाशात भरारी मारणारे पाणघार आणि गरुड, सावज टिपायला गवताच्या काडीवर बसलेला खंड्या.

पक्ष्यांचे पाण्यात अन्न शोधणे,  भक्ष्य पकडणे

झाडावर पंख पसरवून कोवळ्या उन्हात सुकवत बसलेला पाणकावळा, उंच उंच पावले टाकीत खाद्य वेचणाऱ्या पाणकोंबड्या.

आढळणारे पक्षी 

Image may contain: bird and outdoor, text that says "जांभळी पाणकोंबडी राखी बगळा चित्र बलाक किंगफिशर (खंड्या) मध्यम बगळा कॉमन चिमणी मार्श हॅरिअर"

 

Image may contain: bird and outdoor, text that says "झोळीवाला रोहित प्लवर गरुड बहिरी ससाणा (एकूण २५० वेगवेगळ्या पक्ष्यांची नोंद.)"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaj zarekar article