पांडवकालीन मेरुलिंग; मंदिराच्या गाभाऱ्यात उमटताे तुमचा प्रतिध्वनी

बाळकृष्ण मधाळे | Monday, 3 August 2020

श्रावण महिना हा सर्वानाच हवाहवासा वाटणारा पवित्र महिना. श्रावणातील साेमवारी भाविक माेठ्या भक्तीभावाने महादेवाच्या मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतात

सातारा : सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेलं छोटसं गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. येथील मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. पाच पांडवांनी म्हणजेच युधीष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या बंधूंनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतः मोठ-मोठ्या शिळा आणून प्रशस्त अशी उभारणी केली आहे. या मंदिरात थोड्या मोठ्या आवाजात बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज चार ते पाच वेळा ऐकू येतो. अर्थात प्रतिध्वनी उमटतो. तो ऐकण्यासाठी अनेक भाविक मंदिराच्या थेट गाभाऱ्यात जातात. मंदिराच्या शेजारीच बावडी आहे. या बावडीचे पाणी पिण्यासाठीही वापरले जाते, तसेच गावातील पाळीव प्राण्यांसाठीही या पाण्याचा वापर होतो.
 
श्रीक्षेत्र महाबळेश्वरसारखेच शंकराचे देवस्थान या गावाला देखील लाभले आहे. यामुळे श्रावण महिन्यात येथे मोठा उत्सव पाहायला मिळतो. मंदिराशेजारी असलेल्या बावडीत अनेकजण स्नान करत असतात. येथे एक कुंड देखील असून, त्यामधून गरम पाणी येते. दर सोमवारी येथे जिल्ह्यासह तालुक्‍यातील अनेक गावांतील भाविक मोठ्या उत्साहाने वाहने घेऊन किंवा डोंगराचा घाट चढून पायी शिवशंकराच्या दर्शनासाठी जातात. येथे पायी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. श्रावणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला पाहायला मिळतो. हे पाहून येथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन अगदी प्रसन्न होते. या डोंगराचे दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा डोंगर चढताना मध्यातच एकावर एक अशा भल्या मोठ्या शिळा आहेत.

डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर

ऊन, वारा, पाऊस झेलत, न डगमगता त्या एकमेकींवर अगदी दिमाखात उभ्या आहेत. डोंगर चढताना प्रथमदर्शनी असाही भास होतो की, पावसाने किंवा हवेने या शिळा खाली पडून आपल्या अंगावर तर येणार नाहीत ना? श्रावणाच्या काळात मेरुलिंग ग्रामस्थांकडून बाहेरील गावावरून येणाऱ्या भक्तांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. दर सोमवारी येथील मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. देणगी स्वरूपात आलेला पैसा हा देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जातो. सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे गाव महादेव मंदिरासोबतच पर्यटनासाठीही प्रसिद्ध मानले जाते.

कसे जाल?  पुण्याहून आनेवाडी टाेल नाका, सायगाव, माेरघर 112.5 किलाेमीटर , मुंबईहून 255.3 किलाेमीटर. 

मुक्कामाची सोय : सातारा व मेढा शहरात हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. साताऱ्यातील मुक्कामात किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, बामणोली, चाफळ, पाटेश्वर आदी ठिकाणं पाहता येतील. मेढ्यातील मुक्कामानंतर पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी सहज जाणे शक्य आहे.

Edited By : Siddharth Latkar

दगडपूरचा संतुक (ऐश्वर्य पाटेकर)
संतुकचे आई-वडील हादरले. गयावया करू लागले. तरी संतुक त्याच्या निर्णयापासून हलेना म्हणून जिवाचा आसबोस करू लागले. संताप संताप करू लागले. मग मात्र संतुकला त्यांचं दुखणं उमगलं. पिढ्यान् पिढ्याची सवय अंगवळणी पडत गेलेली माणसं होती ती. मर्जी रक्तातच मुरलीय त्यांच्या. इतक्या सहजी ती बाजूला होणार नाही. म्हणून त्यानं नमतं घेत, बिघडलेली परिस्थिती तवताक दुरुस्त केली. आई-वडिलांस हायसं वाटलं. त्यांचा जीव भांड्यात पडला. म्हणून तो त्याच्या निर्णयापासून हटला होता असं नाही, तो त्याच्या निष्ठेवर अचल होता. तो हळूहळू आई-वडिलांना समजावत गेला. त्याची ही समजावण्याची पद्धत दुखण्यावर दवा म्हणून असर करत गेली.