जंगलातले ते दोन दिवस, रुट ब्रिज आणि माझा ड्रीम वॉटरफॉल

हर्षदा कोतवाल
Monday, 9 December 2019

हाच तर होता तो! गेलं वर्षभर ज्याची भर दिवसाही मी स्वप्न पाहिली होती, पहिल्या दिवसापासून ज्यासाठी मी उषाकडे किरकिर केली होती, जो माझं मेघालयला येण्यामागचं खरं कारण होता तो हाच तर होता. रेन्बो वॉटरफॉल. प्रचंड भव्यआणि रौद्र रुप त्याचं. बरोबर मध्यात एक मोठा दगड आहे, त्याच्यावर जोरदार आवाज करत हा सातत्याने प्रहार करतो

वर्षभरापूर्वी मी इन्स्टाग्रावर माझ्या एका मैत्रिणीचे नॉनग्रियाट मधील एका धबधब्याचे फोटो पाहिला होता. तो फोटो इतका भारी होता की तो लगेच माझ्या मनात बसला. तो फोटो मी तसाच उषाला पाठवला आणि म्हटलं, मला मेघालयला जायचं आहे. कोणतही विचार न करता तीसुद्धा लगेच हो म्हणाली.  त्यावेळी मला या धबधब्याचं नावही माहित नव्हतं. या ट्रीपमध्येसुद्धा आम्ही दोन दिवस नॉनग्रियाटमध्ये होतो तरीही मला हे माहित नव्हतं की ज्याची स्वप्न मी दिवसाही बघत होते तो धबधबा म्हणजे इथलाच रोन्बो वॉटरफॉल आहे. 

मेघालय आये और ट्रेक नही किया??

दिवसभर एकाहून एक भारी धबधबे बघून आता मन तृप्त झालं होतं. आता आम्ही मोसमाई केव्ह्जला निघालो होतो. मोसमाई केव्ह्ज म्हणजे सृष्टीचा चमत्कार आणखी काहीच नाही. आयुष्यात भीती म्हणजे काय असतं ना हे मला या ठिकाणी आल्यावर समजलं. या गुहांमध्ये गडद अंधार, काही काही कोपऱ्यांवर लाईट लावण्यात आल्या आहेत पण त्यांना पाहूनसुद्धा या जागेवर भीतीच वाटते. या गुहांमध्ये असलेला प्रत्येक दगड अंगावर आल्याचा भास होतो. प्रत्येक दगडात आपण कोणता ना कोणता आकार शोधत असल्याचा भास होतो. या गुहा नक्की कशा होत्या, त्या एवढ्या भीतीदायक का वाटत होत्या हे मला शब्दांत सांगणं फारचं कठीण आहे. असं होतं ना की एखादी गोष्ट तुम्हाला खूप मनापासून सांगायची असते पण काही केल्या तुम्हाला व्यक्तच होता येत नाही, मोसमाई केव्ह्जबद्दल माझं तेच झालंय. 

Image may contain: outdoor

आम्ही बरोबर चार वाजता नॉनग्रियाट गावात उतरायला सुरवात केली. तब्बल साडेतीन हजार पायऱ्या उतरुन जायचं होतं आम्हाला आणि तेही दाट अंधारुन यायच्या आत. आम्ही अक्षरश: पळत सुटलो. कोणत्याच जागी थांबलो नाही आणि आम्ही बरोबर तासाभरात आम्ही जिथे राहणार होतो त्या घराच्या बाहेर उभं होतो. मात्र, अचडणी नाही आल्या तर ती ट्रीप कसली ना? आम्ही जिथे राहणार होतो त्या घरात आधीच एका परदेशी जोडपं होतं. आम्ही ज्यांच्या घरात राहणार होतो त्यांच्या बायकोने लक्षात न येऊन आठवड्याभरासाठी आलेल्या या जोडप्याला आमचं घर देऊन टाकलं होत. ते दोघंही दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होते. आता काय करायचं? आम्हाला राहायला जागाच नव्हती, अॅलवीन हा आमचा गाईड होता. तो दोन घरं बघून आला पण आम्हाला काय राहायला जागा मिळालीच नाही. साडेपाच वाजले होते आणि आता गडद अंधार पडला होता. अखेर आम्हाला राहायला घरं नाही मिळत म्हटल्यावर आमची जेवणाची सोय बघणाऱ्या काकूंच्या आईच्या घरी आम्ही राहणार असं ठरलं. 

चला करुया भारतातल्या स्कॉटलंडची सफर

आमच्याकडे पर्याय नव्हता, म्हणून आम्ही जास्त आढेवेढे घेतले नाहीत. एकाच तर रात्रीचा प्रशन होता, त्यानंतर आमचं मूळ घरं सकाळी रिकामं होणार होतं आणि मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो असतो. ज्या घरात आम्ही राहिलो ते घरं दोन खोल्यांचं लाकडापासून तयार केलेलं होतं. दोनपैकी मोठी खोली आम्हा पाचजणींना दिली आणि छोट्याशा खओली त्यांच तब्बल सहा जणांचं कुटुंब राहिलं. बाथरुममध्ये जायचं म्हणजे मोठं जिवावर येणारं काम होतं कारण आम्हाला पाचजणींना त्यांचं कुटुंब असलेल्या खोलीत जाऊन बाथरुम वापरावं लागतं होतं. सगळ्यांना रात्रीच ठरवलं उद्या कोणीही अंघोळ करणार नाही. घरही तसं भीतीदायकच वाटतं होतं. लाकड्याच्या फटीतून खालची सगळी जमिन दिसत होती. आम्ही जेवायला 8 वाजता येतो असं सांगून आलो आणि आम्ही खोलीत गप्पा मारत बसलो होतो. मी आणि उफा ब्रम्हतल ट्रेकचे किस्से सांगत होतो तर अजिता रुपकूंडचे. माने आणि जया आपल्या नुसत्याच ऐकत होत्या. आवडीचा विषय निघाली की आम्हाला गप करतील एवढ्या बोलायच्या. आम्ही गप्पांत रंगलो आणि लाईट गेले. आमची चांगलीच भांबेरी उडाली. शेजारच्या खोलीतून आजी मेणबत्ती घेऊन आल्या आणि आम्ही मेणबत्ती लावून पुन्हा गप्पा मारत बसलो. मेणबत्तीच्या प्रकाशात ते घर काहीतरी वेगळं आणि भारी भासत होतं. 1950साली असायचा तसा छोटासा टीव्ही, वरती सगळीकडे येशूख्रिस्त आणि मदर मेरीच्या मूर्ती आणि फोटो लावले होते. खिडक्यांच्या तुटलेल्या लाकडाच्या जागी जाड अशी प्लास्टिकची पाकिटं लावली होती. एका माळ्यावर सगळ्यांच्या चपला ठेवल्या होत्या. त्यांच्या आणि आमच्या खोलींमध्ये फक्त एक मोडका, अर्धवट बंद होणारा दरवाजा आणि एक पडदा होता. रात्रभर त्यांचं तीन महिन्यांचं बाळ रडत राहिलं आणि मी आणि उषा जाग्या होत राहिलो. 

सकाळी उशीरापर्यंत झोपायचं असं ठरवलं होतं पण गाढ झोप लागलीच नाही. पाच वाजता उषा म्हणाली मला बाथरुमला जायचं आहे, चल म्हणाले आणि का काय माहित पण दोघी पुन्हा झोपलो. अखेर सहा वाजता उठलो आणि बाहेर पडलो. आमच्या आधीच अजिता आणि जया उठून गाव फिरायला निघूनही गेल्या होत्या. आम्ही दोघी फ्रेश झालो आणि बाहेर येऊन ओट्यावर छोटा बाक होता त्यावर बसलो. रात्रभर अधूनमधून रडणाऱ्या त्या गोंडस भाळाला आता त्याची आजी उन्हात घेऊन बसायला बाहेर आली. त्याच्याशी मी मराठीत गप्पा मारायला सुरवात केली आणि तेसुद्धा खुदूखुदू हसू लागलं. ते म्हणतात ना, लहान मुलं देवाघरची फुलं असतात. खोटं नाहीच ते अजिबात.  आम्ही आवराआवर केली आणि ट्रेकसाठी निघालो. आता मला फक्त तो धबाधबा पाहायचा होता ज्यानं मला ओढत इथवर आणलं होतं. 

ज्या दिवशी आम्ही डबल डेक्कर आणि रेन्बो वॉटरफॉलचा ट्रेक सुरु केला तेव्हा मला सगळ्यात जास्त उत्सुकता हा धबधबा शोधण्याची होती. मला फक्त हा धबाधबा याच ट्रेकमध्ये आहे एवढंच माहित होतं. त्यामुळे प्रत्येक धबधब्यापाशी मी फक्त हा 'तो' धबधबा नाही एवढंच म्हणून उषाला वैताग आणला होता. आम्ही जिथे राहिले तिथून फक्त दहा मिनिटांवर डबल डेक्कर रुट ब्रिज होता. आम्ही गेला तेव्हा दुसरं कोणीचं नव्हतं. आख्खा ब्रिज आमचा होता. खरंच नवल आहे तो ब्रिज म्हणजे. त्या झाडाची मुळं एकमेकांमध्ये अशी काही गुंतली आहेत की फक्त पाहतच बसावे लागते. 

Image may contain: tree, plant, sky, outdoor, nature and water

आणखी फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी यावर क्लिक करा 

चेरापुंजीमध्ये जवळजवळ 11 रुट ब्रिज असल्याचे म्हटले जाते. चेरापुंजी हॉलिडे रिसॉर्टचा मालक असणाऱ्या तमिळनाडूच्या एका माणसाने इथल्या स्थानिक खासी महिलेशी लग्न केलं होतं. याच माणसाने या सर्व ब्रिजेसना पर्यटकांसाठी नकाशावर आणले होते. 

डबल डेक्कर आधी होता सिंगल डेक्कर
डबल डेक्कर ब्रिज हा जवळपास दीडशे वर्ष जुना आहे. नॉनग्रियाटमध्ये अनेक सिंगल रुट ब्रिज आहेत. डबल डेक्कर असणारा हा एकमेव ब्रिज आहे. आधी हा सुद्धा फक्त सिंगल ब्रिजच होता मात्र, पावसामुळे या ब्रिजखालील पाणअयाची पातळी वाढून ती ब्रिजपर्यंत पोहोचायची म्हणून इथल्या माणसांनी दुसऱ्या मजला बांधला जाईल अशा दृष्टीने मुंळं वाढवायला सुरवात केली. आता दुसऱ्या मजल्याच्यावरही मुळं वाढायला सुरवात झाली आहे. 

कधी जाल?
चेरापुंजीला पृथ्वीवरील सर्वांत जास्त ओल्या जागांपैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे पावसाळ्याच प्रचंड पाऊस पडतो. साधारणत: इथे एप्रिलमध्ये पावसाळा सुरु होतो तो ऑक्टोबरपर्यंत सुरु असतो. सर्वाधिक पाऊस हा जून आणि जुलै महिन्यात पडतो. त्यामुळे पावसाळा सोडून कोणत्याही ऋतूत तुम्ही जाऊ शकता. 

डबल डेक्करवर थोडा वेळ बसून आम्ही पुढे निघालो. या भागात पावलोपावली काळी मिरीची झाडं आणि वेगवेगळ्या आकारांची आणि रंगांची फुलपाखरं दिसतात. आम्ही जसं जसं आम्ही धनदाट जंगलात जायला सुरवात केली तसं डाव्या बाजूने पाण्याचा जोरदार आवाज येऊ लागला. डाव्या बाजूने पाणी खळखळ करत वेगात वाहात होतं. आता आम्हाला बांबू आणि तमालपत्रांची झाडं दिसू लागली. जवळपास तासभर चालल्यानंतर आमच्या समोर प्रचंड मोठी धबाधबा उभा ठाकला. हाच तर होता तो! गेलं वर्षभर ज्याची भर दिवसाही मी स्वप्न पाहिली होती, पहिल्या दिवसापासून ज्यासाठी मी उषाकडे किरकिर केली होती, जो माझं मेघालयला येण्यामागचं खरं कारण होता तो हाच तर होता. रेन्बो वॉटरफॉल. प्रचंड भव्यआणि रौद्र रुप त्याचं. बरोबर मध्यात एक मोठा दगड आहे, त्याच्यावर जोरदार आवाज करत हा सातत्याने प्रहार करतो. या धबधब्याच्या बरोबर मध्यात इंद्रधनुष्य स्पष्ट दिसतं. या धबधब्याच वर्णन शब्दांत करणं फारच कठीण. आपण त्याच्याजवळ गेल्यावर पाणअयाचे तुषार जेव्हा आपल्या सर्वांगाला स्पर्श करतात तेव्हा अगदी स्वर्गात असल्याचा भास होतो. 

Image may contain: mountain, sky, outdoor, nature and water

बराच वेळ मी तिथे शांत उभी राहिले, मनात डोळ्यात, कॅमेरात प्रत्येक क्षण साठवून घेतला. 'मी पुन्ही नक्की येणार'हा वादा करुन मी माघारी फिरले. आता आम्ही एका भन्नाट आणि अविश्वयनीय स्पॉटला जाणार होतो. गावातील लोकं त्याला स्विमिंगपूल म्हणतात. रेन्बो वॉरफॉलमधून येणारं पाणी एका ठिकाणी मोठा प्रमाणात साठतं आणि तिथून कमी वेगाने खाली वाहत जातं. त्याच जागी नैसर्गिकरित्या एक स्विमिंगपूल तयार झाला आहे. भर दुपारी दोनच्या उन्हातही त्याचं पाणी अत्यंत थंड आणि आल्हाददायक होतं. बघता बघता सर्वांनी त्यात डुबकी घेतली. तास दीड तास आम्ही अक्षरश: एखाद्या प्राण्यासारख्या त्यात पडून होतो. दिवसभराच्या चालण्याचा सगळा थकवा क्षणात निघून गेला. 

Image may contain: outdoor, nature and water

पुन्हा गावात पोहोचल्यावर आम्ही आमच्या गाईडच्या घरी त्यांच्या सहा महिन्यांच्या बाळासोबत खेळायला गेलो. होमस्टे खरंच किती भारी असतात ना? किती सहज अनोळखी माणसं एकमेकांशी जोडली जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. उतरताना साडेतीन हजार पायऱ्याकाहीच वाटल्या नव्हत्या. मात्र, चढताना आता जीव जाणार होता. आम्ही आठला वर जायला सुरवात केली. थांबत थांबत आम्ही दहापर्यंत वर पोहोचलो. आता इथून आम्ही शिलॉंगला जाणार होतो. आमची ट्रीप आता संपत चालली आहे याची चूणचूण आता जाणवू लागली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel blog of double Decker bridge and Rainbow Waterfalls in Meghalaya by Harshada Kotwal