सफर भितरकनिकाची

भुवनेश्वर विमानतळापासून साडेतीन तासांवर असलेले भितरकनिका हे सागरी अभयारण्य. तपकिरी पंखाच्या खंड्याची अनेक उत्कृष्ट छायाचित्रे तिथे मिळाली.
Bird
BirdSakal
Summary

भुवनेश्वर विमानतळापासून साडेतीन तासांवर असलेले भितरकनिका हे सागरी अभयारण्य. तपकिरी पंखाच्या खंड्याची अनेक उत्कृष्ट छायाचित्रे तिथे मिळाली.

डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

- भुवनेश्वर विमानतळापासून साडेतीन तासांवर असलेले भितरकनिका हे सागरी अभयारण्य. तपकिरी पंखाच्या खंड्याची अनेक उत्कृष्ट छायाचित्रे तिथे मिळाली. अनेकदा तर बोट चक्क हा खंड्या बसलेल्या फांदीच्या अगदी जवळ गेली. लॉन्ग शॉट्स, क्लोजअप अशा सर्व तऱ्हेची छायाचित्रे टिपता आली. अत्यंत आकर्षक असलेल्या या खंड्याच्या प्रजातीचे तसेच मॅन्ग्रूव्ह पिट्टाच्या यशस्वी छायाचित्रणामुळे हा भितरकनिका दौरा आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला.

कांदळवनांना पर्यावरण परिसंस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आता कुणीच नाकारू शकत नाही. पूर्वी कांदळवन म्हणजे निरुपयोगी दलदल असाच सर्वसाधारण समज होता. त्यामुळे त्याची वारेमाप कत्तल करण्यात येई. कांदळवनांमध्ये विशिष्ट प्रकारचे पशू-पक्षी, कीटक व वृक्ष-वनस्पती आढळतात जे इतरत्र दिसत नाहीत.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात असेच एक नितांत सुंदर कांदळवनयुक्त राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य आहे. भुवनेश्वर विमानतळापासून साडेतीन तासांवर असलेले भितरकनिका हे सागरी अभयारण्य. येथील वनविभागाने बांधलेले निवासस्थान कांदळवनाशेजारीच अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. भरतीच्या वेळेस पाणी अगदी रिसॉर्टजवळ येते व काही वेळेस त्यासोबत मगरसुद्धा दिसते. येथे बोटीतून सफारी करण्याची सोय आहे. निवासस्थानापासून बोटीच्या धक्क्यापर्यंत जाण्याच्या मार्गावर दुतर्फा असलेल्या झाडांवर अनेक दुर्मिळ पक्षी हमखास दिसतात.

आम्ही भितरकनिका दौरा ठरवला तो मुख्यतः दोन विशेष पक्ष्यांकरिता. मॅन्ग्रूव्ह पिट्टा आणि तपकिरी पंखाचा खंड्या (ब्राऊन विंगड किंगफिशर)साठी. यापैकी तपकिरी पंखाचा खंड्या यापूर्वीच आम्ही सुंदरबन येथे छायाचित्रित केला होता; परंतु त्या वेळेस केवळ एकमेव छायाचित्र मिळाले होते. तेही फारसे समाधानकारक नव्हते व त्याचे चांगले छायाचित्र मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे भितरकनिका.

या दौऱ्याच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. विशेष म्हणजे कांदळवनाच्या इतक्या जवळ मुक्कामाचा अविस्मरणीय अनुभव. खिडकीतून दिसणारे पक्षी इ. एके संध्याकाळी मासेमारी मांजर (फिशिंग कॅट) पाहण्यासाठी निघालो. तीन तास बोटीतून प्रवास होता व दिवस मावळल्यावर ज्या ठिकाणी ते मांजर दिसते तिथे पोहोचायचे होते. ठरल्याप्रमाणे आम्ही पोहोचलो. अर्ध्या तासात छायाचित्रण आटोपून परतायचे असे ठरले होते. म्हणजे जेवायला पुन्हा मुक्कामी परतायचे होते; पण तासभर शोध घेऊनही ते मांजर काही दिसले नाही. त्यातही आमच्या मार्गदर्शकाने मोठा घोळ केला. त्याने भरती-ओहोटीची वेळ व्यवस्थित पहिली नव्हती. आम्ही तिथे पोहोचल्यावर ओहोटी सुरू झाली, त्यामुळे आम्हाला सहा तास तिथेच अडकून राहावे लागले. सोबत खायला फारसे नव्हते. पाणीही थोडेच होते. त्यामुळे बोटीवर असलेल्या दही व पोहे यावर भागवावे लागले. डासांसोबतची ती उघड्या बोटीवरची संपूर्ण रात्र कायम लक्षात राहील. उजाडता उजाडता भरती सुरू झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली.

मॅन्ग्रूव्ह पिट्टा छायाचित्रित करण्याकरिता कांदळवनाच्या गर्द दाटीवाटीने वाढलेल्या वनातून पायी फिरावे लागले. एरिअल रूट्स (हवाई मार्ग)मधून वाट काढताना खूपच दमछाक होत होती. आमच्यापैकी बरेच जण त्यावरून घसरून पडलेदेखील. या कांदळवनाच्या गर्द वनात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते असे जाणवले. तपकिरी पंखाचा खंड्या (ब्राऊन विंगड किंगफिशर)चे छायाचित्रण मात्र सहजतेने झाले. त्याची अनेक उत्कृष्ट छायाचित्रे मिळाली. अनेकदा तर बोट चक्क हा खंड्या बसलेल्या फांदीच्या अगदी जवळ गेली तरी तो शांत बसून होता. लॉन्ग शॉट्स, क्लोजअप अशा सर्व तऱ्हेची छायाचित्रे टिपता आली. अत्यंत आकर्षक असलेल्या या खंड्याच्या प्रजातीचे तसेच मॅन्ग्रूव्ह पिट्टाच्या यशस्वी छायाचित्रणामुळे हा भितरकनिका दौरा कायम लक्षात राहिला. येथे पुन:पुन्हा या, हीच साद भितरकनिकाने आम्हा सर्वांना घातली.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com