esakal | 'या' कारणामुळं मंदावला कासवर फुले उमलण्‍याचा वेग!
sakal

बोलून बातमी शोधा

Kas Plateau

कास पठार परिसरात गेल्‍या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.

'या' कारणामुळं मंदावला कासवर फुले उमलण्‍याचा वेग!

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जागतिक वारसास्‍थळाच्‍या यादीत समावेश असलेल्‍या कास पठार (Kas Plateau) परिसरात गेल्‍या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे फुले उमलण्‍याचा वेग मंदावला असून, फुलांच्‍या वाढीसाठी आता उन्‍हाची आवश्‍यकता असल्‍याचे मत स्‍थानिक व्‍यक्‍त करत आहेत. पर्यटकांची संख्‍या कमी असली तरी थांबलेले अर्थचक्र फिरू लागल्‍याने स्‍थानिकांच्‍या रोजीरोटीचा प्रश्‍‍न काहीअंशी निकाली निघण्‍यास मदत झाली आहे.

कास पठारावर दुर्मिळ फुले आणि वनस्‍पती दरवर्षी मोठ्या प्रमाणात उमलत असतात. याठिकाणी उमलणाऱ्या फुलांची ख्‍याती जागतिक पातळीवर पसरल्‍यानंतर या ठिकाणाकडे देशभरातील निसर्गप्रेमींच्‍या नजरा वळल्‍या. या ठिकाणी फुलणारी फुले दुर्मिळ प्रकारातील असल्‍याने त्‍यांच्‍या जतनासाठी स्‍थानिकांसह वन विभागाने जास्‍तीचे लक्ष त्‍या ठिकाणावर केंद्रित केले. फुलांचे जतन होण्‍याबरोबरच कास पठाराच्‍या सौंदर्यात आणखी भर घालणारे उपक्रम या ठिकाणी जाणीवपूर्वक राबविण्‍यात आले. या उपक्रमांमुळे कास पठारावरील फुलांचे सौंदर्य पाहण्‍यासाठी येणाऱ्या पर्यटकांना जास्‍तीच्‍या सुविधा उपलब्‍ध होऊ लागल्‍या. कोरोनामुळे गतवर्षीचा हंगाम होऊ शकला नव्‍हता. यंदा हा हंगाम पूर्ण क्षमतेने करण्‍याची तयारी स्‍थानिक प्रशासनासह वन विभागाने केली होती. ठरल्‍याप्रमाणे यंदाचा हंगाम सुरू झाला असून सुमारे दहा हजारांच्‍या घरात पर्यटकांनी येथील फुलांचा नजारा आपल्‍या नजरेत टिपला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राचे 'मिनी कास पठार' पर्यटकांसाठी सप्टेंबरमध्ये सुरु होणार?

Kas Plateau

Kas Plateau

गेल्‍या तीन ते चार दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस, दाट धुके आणि सोसाट्याचा वारा असल्‍याने तसेच गणेशोत्‍सवाची धामधूम असल्‍याने कास पठार परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या गेल्‍या काही दिवसांपासून मंदावली आहे. संततधार पावसामुळे पठारावरील फुले उमलण्‍याचा वेग मंदावला आहे. सद्य:स्‍थितीत पठारावरील फुले ४० टक्के उमलली असून, त्‍यांच्‍या वाढीमध्‍ये पावसाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. येत्‍या काही दिवसांत पाऊस थांबून ऊन पडल्‍यास फुले उमलण्‍याच्‍या वेगात वाढ होण्‍यास सुरुवात होईल, असे मत स्‍थानिक व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचा: कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

रोजगारनिर्मितीला वेग

दरम्यान, गतवर्षी बंद पडलेला कास पठारावरील हंगाम सुरू झाल्‍याने त्‍या ठिकाणचे थांबलेले अर्थचक्र गतिमान होण्‍यास मदत झाली आहे. पर्यटक येत असल्‍याने रोजगारनिर्मितीला वेग आल्‍याने स्‍थानिकांच्‍यात आनंदाचे वातावरण आहे.

loading image
go to top