विलोभनीय कोरीवकाम

दगडांनी कशाप्रकारे संस्कृती, शिक्षण, व्यापार, राहणीमान, वास्तुकला धर्म आणि कलेला अधिष्ठान प्राप्त करून दिलं हे जाणून घ्यायचं असेल तर लेणी पाहायला हव्यात.
Enchanting carving
Enchanting carvingsakal

मुंबई-पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मधोमध आहेत कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी. अप्रतिम सौंदर्याने परिपूर्ण अशा या लेणी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत. तिथलं विलोभनीय कोरीवकाम पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं.

दगडांनी कशाप्रकारे संस्कृती, शिक्षण, व्यापार, राहणीमान, वास्तुकला धर्म आणि कलेला अधिष्ठान प्राप्त करून दिलं हे जाणून घ्यायचं असेल तर लेणी पाहायला हव्यात. महाराष्ट्रात सर्वाधिक लेणी सापडतात आणि मुंबईच्या आसपास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातीलच कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी समूहापर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ची गाडी असेल तर उत्तम. अन्यथा, मळवली येथील रेल्वेचं फाटक ओलांडून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भाजे गावाच्या समोरच एक टेकडी आहे. या टेकडीवर जायला पायऱ्या आहेत. तिथून लेणीपर्यंत जाता येते किंवा जवळच असलेल्या लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांवरूनही लेणीपर्यंत पोहोचता येते.

प्राचीन काळात ‘वलुरक’ या नावाने ओळखले जाणारे कार्ला हे शैलगृह प्राचीन शैलगृहांमध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या बौद्धकेंद्रांपैकी एक आहे. येथील गुंफा इंद्रायणी नदीच्या उत्तरेस १०० मीटर उंचीवर डोंगरात कोरलेल्या आहेत. भाजे गुंफासमूहापासून या गुंफा साधारण आठ किमी अंतरावर दक्षिणेस आहेत. कार्ला येथील गुंफांसह एकूण १६ गुंफा कोरलेल्या आहेत. इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स.चे सहावे-सातवे शतक या काळातील हीनयान (थेरवाद) आणि महायान पंथीय कलेचा उत्कृष्ट आविष्कार येथे पाहायला मिळतो. या गुंफासमूहात एक चैत्यगृह (प्रार्थनागृह) आणि बाकीचे सगळे विहार (राहण्याच्या खोल्या) आहेत. सातवाहन राजवटीच्या काळात भारतात कोरल्या गेलेल्या या प्रकारच्या सर्व चैत्यगृहांपेक्षा कार्ला येथील चैत्यगृह मोठे आहे. या चापाकृती चैत्यगृहापुढे एक व्हरांडा आहे. चैत्यगृहामध्ये असलेल्या खांबांच्या दोन ओळी, त्याची तीन भागांत विभागणी करून स्तुपाच्या मागे एकत्र येतात. या तीन भागांपैकी भिंतीलगतच्या दोन्ही भागांचे छत सपाट आहे, तर मधल्या स्तुपासमोरील भागातील स्तंभांनी एका मोठ्या तुळईला आधार दिलेला आहे. त्या तुळईचे वरचे छत गजपृष्ठाकृती आहे, जे स्तुपाच्या वर अर्थगोलाकार बसलेले दिसते. या छताला लाकडी तुळ्याही जोडलेल्या दिसतात. या गुंफांच्या निर्मितीसाठी विविध लोकांनी दान दिलेले दिसते. येथे आढळणाऱ्या निरनिराळ्या शिलालेखांमधून वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांची आणि अनेक ठिकाणांचीही नावे समजतात. मुख्य म्हणजे काही न ओळखता आलेल्या ठिकाणांचाही यामध्ये समावेश आहे. उदा. उमेहनकट आणि धेनुकाकट. धेनुकाकट या ठिकाणचे बहुतेक दानकर्ते यवन (ग्रीक) होते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

येथील एका मोठ्या चैत्यगृहाच्या दारापाशी डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. ४५ फूट उंचीच्या या स्तंभावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. चैत्यगृहाबाहेर कोरलेल्या खांबावर हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, मिथुन शिल्पाच्या जोड्या, चैत्यकमानी आदी गोष्टी दिसतात. सज्जाच्या दोन्ही बाजूला अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. त्याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्प कोरलेली आहेत. डाव्या बाजूच्या हत्तीवर पुढे गौतम बुद्धांच्या मूर्तीही कोरलेल्या पाहायला मिळतात. लेणी परिसरात मुख्य लेणीच्या बाहेर एकवीरा देवीचे मंदिरदेखील आहे.

भाजे येथील लेणी कार्ल्यापेक्षा लहान आहेत, मात्र तिथलं बांधकाम त्याच प्रकारचं आहे. इथल्या चैत्यगृहालादेखील लाकडी तुळ्यांचं छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतले लेख आहेत. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरल्याचं मानलं जातं. त्यानंतर आठशे वर्ष लेणीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणचं सूर्यलेणं अतिशय प्रसिद्ध आहे. या सूर्यलेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट, सालंकृत शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्याचे थर आणि चैत्यस्तुपाचे नक्षीकाम केलेलं दिसतं.

बेडसे लेणी विसापूर येथील टेकडीवर आहे. हा प्रदेश प्राचीन काळी घनदाट जंगलाचा होता. बेडसे लेणीमध्ये त्याकाळी बौद्ध विश्वासाचे मठ होते. येथे मठाच्या सांस्कृतिक इतिहासाचे वर्णन करणारे अनेक शिलालेख आहेत. आपल्या काळातील एकमेव शैलचित्र बौद्ध मठ येथे आहे. सामान्यत: विहार लेणी आयताकृती असतात. या गुहेत, शैलचित्र खोल्यांच्या मध्यभागी असलेली सामान्य जागा अष्टकोनी आकारातील आहे. येथे एकूण १३ शालचित्र खोल्या असून त्यापैकी अनेक अतिशय सुस्थितीत आहेत.

कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी समूहातील प्रत्येक चैत्यगृह, विहार मुबलक वेळ हाती ठेवून पाहण्यासारखे आहे. येथील किचकट आणि तितकेच सुंदर कोरीवकाम आकर्षक आहे. प्रत्येक पॅनलवर कोरलेल्या शिल्पांना कथा असून त्यांचे वेगवेगळे अर्थ आणि इतर लेण्यांशी नातेसंबंध आहेत. लेणी पाहताना एखादा पुरातत्त्वशास्त्रज्ञ सोबत असल्यास त्याची प्रचिती येईल. या लेणी एकमेकांपासून काही किलोमीटर अंतरावर असल्यामुळे एकाच फेरीत पाहता येऊ शकतात. पण प्रत्येक ठिकाणच्या लेणींना योग्य न्याय द्यायचा असेल तर तीन वेगळ्या ट्रीप्स सहज करता येऊ शकतील.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com