घेऊ जरासा मोकळा श्‍वास

मुंबईत जन्मलेल्या आणि लहानाचे मोठे झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदातरी शालेय सहलीच्या माध्यमातून किंवा पालकांसोबत ‘म्हातारीचा बूट’ पाहिलेला आहे.
kamla nehru park
kamla nehru parksakal
Summary

मुंबईत जन्मलेल्या आणि लहानाचे मोठे झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदातरी शालेय सहलीच्या माध्यमातून किंवा पालकांसोबत ‘म्हातारीचा बूट’ पाहिलेला आहे.

मुंबईतील धावपळीच्या आणि प्रदूषित वातावरणातून फुप्फुसाला मोकळा श्वास घ्यायची संधी आपण शोधत असतो. त्यासाठी लहान-मोठ्या सर्वांसाठीच अतिशय कल्पकतेने साकारलेले कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन ही दोन्ही ठिकाणं सर्वोत्तम पर्याय आहेत. कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट आजही लहानग्यांना अचंबित करतो आणि मोठ्यांना बालपणात घेऊन जातो. हँगिंग गार्डनमधील झाडे, वेलींना आकार देऊन बनवलेले प्राणी खुणावणारे आहेत.

मुंबईत जन्मलेल्या आणि लहानाचे मोठे झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदातरी शालेय सहलीच्या माध्यमातून किंवा पालकांसोबत ‘म्हातारीचा बूट’ पाहिलेला आहे. आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी उंच आणि ज्याच्या आत शिरून पायऱ्या चढून वर जाता येतं असा हा बूट लहानग्यांना थेट परिकथेत घेऊन जातो. म्हणूनच की काय तिथे एकदा जाऊन आल्यानंतर पालकांकडे पुन्हा तिथे कधी जायचं याची विचारणा मुलांकडून वारंवार केलेली असते. मोठे झाल्यावर लहानपणीच्या या आठवणींवर आपले आपल्यालाच हसू येते. पण अशा आठवणी आणि जागा मनात कायम घर करून राहतात. त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी आज आपण जाणार आहोत कमला नेहरू पार्कमध्ये, जिथे हा म्हातारीचा बूट आजही लहानग्यांना अचंबित करतो आणि मोठ्यांना बालपणात घेऊन जातो. त्याचसोबत हँगिंग गार्डन्सला जिथे झाडे आणि वेलींना आकार देऊन प्राणी बनवण्यात आले आहेत, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, चालण्यासाठी मातीचे मोठे ट्रॅक आणि आठवड्याच्या कुठल्याही दिवशी सकाळी किंवा सायंकाळी निवांतपणे बसून गप्पा मारण्याची सोय आहे. ‘मलबार हिल’ या दक्षिण मुंबईतील टेकडीवरील ही शंभर वर्षांहून अधिक वयोमान असलेली ठिकाणं याच कारणांमुळे आजही आबालवृद्धांना आपल्याकडे आकर्षित करतात.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी), ग्रँट रोड, चर्नी रोड अशा वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरून टॅक्सी किंवा बसने या ठिकाणी पोहोचता येते. सीएसएमटीवरून गेलात तर मरिन डाईव्ह आणि पुढे गिरगाव चौपाटी वाटेत लागते. समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेल्या मलबार हिलकडे जाणारा रस्ता आणि आजूबाजूची मोठमोठाली घरं हीच मुंबईची ओळख असल्याने या परिसराची अशी धावती भेट मुंबई दर्शन केल्याचाही आनंद देऊन जाते.

‘हँगिंग गार्डन्स’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या उद्यानाचे खरे नाव ‘फिरोजशहा मेहता उद्यान’ होय. १८८० साली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेले हे उद्यान एका तलावावर बांधण्यात आले आहे. १९२१ मध्ये या उद्यानाची पुनर्रचना करण्यात आली. आधीच टेकडीवर असलेल्या या उद्यानामध्ये पायऱ्या चढून प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वारापासूनच हिरव्यागार झाडांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेले उद्यान मन प्रसन्न करून टाकते. वेगवेगळी झाडे, वेली, रोपे, फुलझाडे आणि त्यांचा वापर करून तयार केलेल्या विविध प्रतिकृती आणि सायंकाळी रंगीत रोषणाईवर उडणारी कारंजी ही या उद्यानाची आकर्षक केंद्रे आहेत. झाडे, वेली आणि फुलांनी सजलेल्या या उद्यानातील जलसंवर्धन केंद्राचे पाणीच हे उद्यान सदाहरित ठेवण्यास मदत करतं.

‘फिरोजशहा मेहता उद्याना’समोरच लहान मुलांचे आकर्षण असलेला म्हातारीचा बूट जिथे आहे ते कमला नेहरू पार्क आहे. या ‘म्हातारीच्या बुटा’चे रचनाकार असलेले सोली आरसीवाला अलिकडेच काळाच्या पडद्याआड गेले. आपले बालपण आनंदी बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, म्हणून त्यांचे नाव माहीत असणं गरजेचं आहे. पार्कमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असलेल्या भिंतीवर पार्कमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे कोलाज (छायाचित्र आणि नाव) केलेले दिसते. समोरील लोखंडी कुंपणाला निरनिराळ्या फुलांचे रंगीबेरंगी डिझाईन आहे. अलिकडेच मुंबई महापालिकेने उद्यानांचा चेहरामोहरा बदलून टाकत बालकवितांच्या संकल्पनेवर आधारित त्याची पुनर्रचना केली आहे. अधिक मोकळ्या जागा, वेगवेगळया प्रकारच्या आसनव्यवस्था, नियोजनबद्ध पद्धतीने केलेले वृक्षारोपण, फुलपाखरे आणि पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या झाडांची लागवड, तसेच वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन लावलेली सुवासिक फुलझाडे, झाडांची ओळख करून देणारे नामफलक आणि विशेष म्हणजे रात्री प्रकाशनिर्मितीमुळे इथल्या जैवविविधतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन केलेली रोषणाईची या पार्कची वेगळी ओळख अधोरेखित करतं.

पार्कमधील अ‍ॅम्फी थिएटरला इंद्रधनुष्याच्या रंगात, तसेच जंगल बुक आणि माकड-बगळ्याची गोष्ट भिंतीवर रंगविण्यात आली आहे. माशांसाठी मोठी टाकी बांधून त्यासभोवती ‘ये रे ये रे पावसा’ या कवितेच्या संकल्पनेवरून कारज्यांची निर्मिती केली आहे. संरक्षण जाळींवर मण्यांच्या पाटीची, पायवाटांवर काचपाणी खेळाची रचना करण्यात आली आहे. ज्या मरिन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीच्या बाजूने आपण वर जातो तोच अथांग पसरलेला समुद्र उंचावरून बघता यावा यासाठी दोन प्रशस्त गॅलरी येथे आहेत. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी यापेक्षा सर्वात चांगली जागा मुंबईत शोधून सापडणार नाही.

म्हातारीच्या बुटाच्या थोडं पुढं चालून गेल्यावर खाली बाबुलनाथच्या दिशेने जायला पायऱ्या आहेत. रुंद दगडी पायऱ्याचा हा रस्ता मलबार हिलवरून थेट बाबुलनाथ मंदिराच्या दारात घेऊन जातो. झाडांच्या सावलीत विसावलेल्या या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला मजबूत कठडा आहे. थोड्या निर्जन अशा या पायऱ्यांच्या वाटेवर ठाण मांडून बसता येतं, तासनतास निवांत गप्पा मारण्यासाठी. याच रस्त्यावरून पुढे गिरगाव चौपाटीसुद्धा गाठता येते. मुंबईतील धावपळीच्या आणि प्रदूषित वातावरणातून फुफ्फुसाला मोकळा श्वास घ्यायची संधी द्यायची असल्यास लहान-मोठ्या सर्वांसाठीच अतिशय कल्पकतेने साकारलेल्या या दोन्ही ठिकाणांची भेट सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com