मंडपेश्वर लेणी

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली किंवा दहिसर रेल्वे स्थानकावरून थेट रिक्षाने लेणीपर्यंत पोहोचता येते. मंडपेश्वर ही सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहेत.
Mandapeshwar Caves
Mandapeshwar CavesSakal
Summary

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली किंवा दहिसर रेल्वे स्थानकावरून थेट रिक्षाने लेणीपर्यंत पोहोचता येते. मंडपेश्वर ही सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहेत.

बोरिवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मंडपेश्वर लेणी घारापुरीची समकालीन मानली गेली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे. मंदिर स्थापत्य हा विषय तोपर्यंत विकसित होऊ लागला असल्यामुळे याची रचना मंदिर स्थापत्यानुसार झालेली दिसते. शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा हा ठेवा डोळे भरून पाहून घ्यावा.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त लेणी असल्या तरी स्थानिकांसाठी सर्वांत अज्ञान असलेल्या वास्तू याच आहेत. मुंबईतही विविध ठिकाणी लेणी आहेत; मात्र मुंबईच्या पर्यटन नकाशावर प्रामुख्याने बोरिवली येथील कान्हेरी लेणीच असतात. बोरिवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अशीच एक मंडपेश्वर लेणी. घारापुरी येथील लेणीच्या समकालीन असलेली ही लेणी मुंबईतील अनेक लेण्यांपैकी सर्वांत लहान लेणी आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली किंवा दहिसर रेल्वे स्थानकावरून थेट रिक्षाने लेणीपर्यंत पोहोचता येते. मंडपेश्वर ही सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहेत. कलात्मक अशा या लेणींवर एकेकाळी पोर्तुगीजांनी कब्जा केला होता. लेणीच्या छतावर चर्च बांधून धर्मप्रसाराचे काम येथून चालत असे. चर्चचे अनेक अवशेष या परिसरात आजही पाहायला मिळतात. अनेकांना सांगून खरे वाटणार नाही; पण प्राचीन काळातील मुंबईवर बौद्ध धर्माचा आणि काहीअंशी पाशूपत या शैव संप्रदायाचाही प्रभाव होता. मुंबईतील पडण, जोगेश्वरी, घारापुरी आणि बोरिवलीची मंडपेश्वर लेणी हे त्याचे महत्त्वाचे पुरावे होत. मंडपेश्वर लेणी घारापुरीची समकालीन मानली गेली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे. मंदिर स्थापत्य हा विषय तोपर्यंत विकसित होऊ लागला असल्यामुळे याची रचना मंदिर स्थापत्यानुसार झालेली दिसते.

पूर्वी मोकळे आणि खुले आवार असलेला लेणी परिसर आता कुंपण घालून संरक्षित करण्यात आला आहे. लेणीसमोर भरपूर जागा आहे. दारातून आत प्रवेश करताच एक दगडी वाट थेट लेणीपर्यंत जाते. वाटेच्या दोन्ही बाजूंना हिरवळ आहे. मुख्य लेणीच्या समोर प्रशस्त मोकळी जागा असून, कातळात कोरलेली भव्य लेणी आणि त्यावर नंतर अतिक्रमण करून केलेले दगडी बांधकाम लगेच ओळखू येते. मंडप प्रवेशासाठी असलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना भग्नावस्थेतील दोन सिंह दिसतात. जवळपास ५१ फूट रुंद आणि २१ फूट लांब खोलीचा एक मंडप समोर दिसतो. त्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. या खांबांवरील कोरीव काम नंतरच्या काळात झाले असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या खांबांवर लेणीचा भार नसून केवळ सजावट म्हणून ते कोरलेले दिसतात. लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी शिवमंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहान गुंफा आतून जोडलेल्या असून त्यालाच जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे. या गुंफेत शिवतांडव, लकुलिश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत. नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजवणाऱ्यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतं. नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव, गणपती, विष्णू असून नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत असतानाच्या शिल्पातील बारकावे आजही ओळखू येतात.

पोर्तुगीज व्यापारासाठी भारतात आले खरे, पण त्यासोबत धर्मही घेऊन आले. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी येथे चर्च बांधलं. नटेशाच्या दालनाच्या उंबरठ्यावरचे दोन खांब काढून दालनाचं अल्टारमध्ये रूपांतर केलं. जागोजागी लाकडी तुळई लावण्यासाठी चौकोनी खोबण्या खोदल्या. काही खोबण्यांत लाकडाचे अवशेष अजूनही शिल्लक असल्याचे दिसते. डावीकडच्या दगडात कोरलेल्या एका मूर्तीच्या जागी कोरलेला क्रॉस स्पष्ट दिसतो. बोरिवलीच्या कान्हेरीप्रमाणेच इथेही पाण्याचे व्यवस्थापन केल्याचे दिसते. पोर्तुगीजांनी कोरलेल्या क्रॉसच्या खाली एक मोठं टाकं त्याची प्रचीती देतं. पेशव्यांनी पोर्तुगीजांकडून वसई जिंकल्यानंतर मंडपेश्वरही ताब्यात घेतलं आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडणारा शिलालेख इथे आहे.

लेणीच्या वरच्या बाजूस चर्चचे अवशेष दिसतात. लेणीच्या उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून जाऊन हे अवशेष पाहता येतात. खरं तर या लेणीची फार देखभाल केली जात नाही असे दिसते. लेणीमध्ये शिवलिंग असल्याने भाविक दर्शनासाठी येतात. त्रिपुरी पौर्णिमेला येथे दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो; मात्र एरव्ही तिथे फार कोणी फिरकत नाही. शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा हा ठेवा भिंतींमध्ये लुप्त होण्याच्या आधी डोळे भरून पाहून घ्यायला हवा.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com