निसर्गाची रंगपंचमी

मुंबईतील नागरिकांना हिरवे वन व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणारे महाराष्ट्र निसर्ग उद्यान. या उद्यानात एकूण पंधरा हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे.
निसर्गाची रंगपंचमी
Summary

मुंबईतील नागरिकांना हिरवे वन व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणारे महाराष्ट्र निसर्ग उद्यान. या उद्यानात एकूण पंधरा हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे.

मुंबईतील नागरिकांना हिरवे वन व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणारे महाराष्ट्र निसर्ग उद्यान. या उद्यानात एकूण पंधरा हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. जवळपास दोन किलोमीटरची एक पायवाट उद्यानात फेरफटका मारण्यासाठी आहे. त्यावरून फिरताना असंख्य प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, वेली, पक्षी, कोळी, फुलपाखरे आणि सरपटणारे प्राणी सहज नजरेस पडतात.

काही पर्यावरणप्रेमी आणि सरकारने एकत्र येऊन मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्सच्या मागच्या बाजूस मिठी नदीला लागून गलिच्छ कचराभूमी व दलदल असलेल्या जागेचा कायापालट करण्याचे ठरवले. १९८२-८३ मध्ये जागा साफ करण्यापासून ते झाडे लावण्याचे काम ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’सारख्या नामवंत संस्थेने हाती घेतले. बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सलीम अली यांच्या हस्ते १९८३ मध्ये पहिले सदाहरित झाड या जागेवर लावण्यात आले. त्यानंतर झाडे लावण्याच्या मोहिमेत मुलांना विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सामावून घेतले गेले. पुढे १९८७ मध्ये पुन्हा डॉ. सलीम अली यांनी वड, पिंपळ, उंबर, पळस आणि आंबा या पाच स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण केले. एकेकाळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या झाडांपासून आज एक सदाहरित उद्यान मुंबईच्या मध्यभागी तयार झाले आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यान या नावाने ते ओळखले जाते.

सायन-वांद्रे लिंक रोडवरील उद्यान मध्य रेल्वे मार्गावरील सायन अथवा चुनाभट्टी रेल्वे स्थानकापासून आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम आणि वांद्रे रेल्वेस्थानकांपासून जवळ आहे. स्टेशनवरून रिक्षा अथवा बसमार्गे गेल्यास महाराष्ट्र निसर्ग उद्यान किंवा धारावी डेपो सांगितल्यास तुम्ही इच्छित स्थळी पोहचू शकता. ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित करण्यात आलेले हे उद्यान शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निसर्गसंवर्धन, शिक्षण व जनजागृती करण्यासाठी गेली अनेक वर्षे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सर्व पायाभूत सुविधांनी युक्त अशा या उद्यानात शैक्षणिक केंद्र, निसर्ग फेरीची पायवाट, जलाशय आणि एक रोपवाटिकादेखील आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबईतील नागरिकांना हिरवे वन व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देण्याचं काम महाराष्ट्र निसर्ग उद्यान करत आहे. उद्यानात एकूण पंधरा हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून, त्यामध्ये वृक्ष, झुडूप आणि वानस यांच्या प्रजातींचा समावेश आहे. जवळपास दोन किलोमीटरची एक पायवाट उद्यानात फेरफटका मारण्यासाठी तयार केली गेली असून त्यावरून फिरताना असंख्य प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, वेली, पक्षी, कोळी, फुलपाखरे आणि सरपटणारे प्राणी सहज नजरेस पडतात.

सामान्य नागरिकांसाठी हे उद्यान म्हणजे निसर्ग पर्वणी आहे; तर निसर्गाच्या अभ्यासकांसाठी माहितीचे एक मोठे भंडार. उद्यानात फुलपाखरू, वृक्षाच्छादित, नक्षत्र वन, फळझाडे, कल्पवृक्ष/ताडीच्या जातीची झाडे, औषधी वनस्पती, रोपवाटिका, गांडूळखत, सुगंधित व मसाले वनस्पती, खाडीकिनारी आणि फायकस पट्टा फेरी आणि पावसाळी पाणी साठवणूक असे विविध विभाग आणि प्रकल्प आहेत. या सगळ्याचे निरीक्षण, माहिती आणि अनुभव घेताना संपूर्ण दिवस कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही.

उद्यानात प्रवेश करताच समोरच असलेली शैक्षणिक केंद्राची एकमेव इमारत सूर्यासारखी गोलाकार आकारात आहे. अन्नसाखळीचे जसे जाळे असते, त्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक समाविष्ट असतात त्याच आधारावर या इमारतीमध्ये कलाकृती रेखाटून पृथ्वीवरील पंचमहाभूतांचे (सूर्य, हवा, आकाश, पाणी आणि वायू) वर्णन येथे केलेले आहे. इमारतींचा आराखडा अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की जेथे सूर्यप्रकाश, वायुजीवन आणि थंड हवामानाचा इष्टतम वापर करता येतो. हे यासाठी सांगितले, कारण भेट देणाऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून ही इमारती पाहावी. याच इमारतीच्या एका बाजूला खुला रंगमंच आहे. उद्यानात फेरी मारून आल्यानंतर वृक्षांच्या छायेत, पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट ऐकत मातीच्या पायऱ्यांवर बसून निसर्गातील विविध घटकांवर चर्चा, भोजन आणि वामकुक्षीसाठी यापेक्षा सुयोग्य जागा असूच शकत नाही.

फुलपाखरांच्या संवर्धनामध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उद्यानामध्ये सध्या ८५ प्रकारची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी तुम्हाला किती ओळखता येतात आणि दिसतात याची सोबतच्या लोकांबरोबर स्पर्धा लावता येईल. एका बाजूला मिठी नदीचा परिसर आणि दुसऱ्या बाजूला गजबजलेले शहरीकरण यांच्या मध्यभागी असलेल्या या उद्यानात १२५ पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्या जवळजवळ भारतात सापडणाऱ्या एकूण प्रजातींच्या १० टक्के आहेत हे विशेष. त्यामध्ये स्थलांतरित पक्षांचादेखील समावेश आहे. शिवाय विविध प्रकारचे कोळी, सरपटणारे प्राणी उद्यानाच्या अन्न साखळ्यांमध्ये व्यवस्थितपणे सामावले गेले आहेत. उद्यानातील रोपावाटिका आवर्जून पाहण्यासारखी आहे. जाता जाता तिथून एखादे तरी झाड विकत घेण्याची इच्छा मनात निर्माण झाली तर उद्यान सहलीचे चीज झाले असे म्हणता येईल.

कचरा क्षेपण भूमीचे नियोजन करणे हा आजच्या काळात मोठा जागतिक यक्ष प्रश्न आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यान हा त्यावर शोधलेला उपाय आहे. वेगवेगळ्या देशांतील तसेच शहरांतील अभ्यासक येथे केलेले प्रयत्न व त्याचे परिणाम पाहण्यासाठी येतात. आपण तर या शहराचेच नागरिक आहोत, मग आपण इतक्या सुंदर जागेपासून अनभिज्ञ आणि अलिप्त राहून कसं चालेल.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com