
इतकं कमवलं तरी कसं? कोटींचा बंगला, १० गाड्या, ३० लाखांचा TV...; इंजिनिअरचा पगार मात्र ३० हजार
पगार फक्त 30 हजार रुपये महिना असणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची तक्रार मध्यप्रदेशातील भोपाळ येथील लोकायुक्त कार्यालयाला मिळाली. ही तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत अधिकाऱ्याच्या घरासह अनेक ठिकाणी छापे टाकले गेले. या छापेमारीनंतर यंत्रणांच्या हाती जे लागलं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. मालमत्तेची यादी पाहून तुम्हाला देखील हे कमवलं तरी कसं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार, हेमा मीना हाऊसिंग कॉर्पोरेशनचे प्रभारी सहायक अभियंता आहेत. हेमा या कंत्राटी कर्मचारी आहेत. गुरुवारी, 11 मे रोजी पहाटे लोकायुक्तांच्या पथकाने भोपाळ, रायसेन आणि विदिशा येथील त्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आणि अवघ्या काही तासांतच इंजिनीअर हेमा मीना यांची सुमारे सात कोटींची मालमत्ता सापडली.
लोकायुक्त टीमचे नेतृत्व करणारे डीएसपी संजय शुक्ला यांनी माहिती दिली की, हेमा मीना हाऊसिंग कॉर्पोरेशन भोपाळमध्ये प्रभारी सहायक अभियंता (कंत्राटी) म्हणून काम करतात. 2020 मध्ये हेमा यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार आली होती. याप्रकरणी तपास सुरू करून गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात काय सापडलं?
संजय शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, लोकायुक्त भोपाळ यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, हेमा मीना यांनी भोपाळच्या बिलखिरिया गावात 20,000 स्क्वेअर फूट जमीन तिच्या वडिलांच्या नावावर खरेदी केली होती. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बंगला बांधण्यात आला आहे. याशिवाय भोपाळ, रायसेन आणि विदिशा येथील विविध गावांमध्ये त्यांनी शेतजमिनी खरेदी केल्या आहेत.
तपासात हेमा मीना यांनी हार्वेस्टर, भात पेरणीचे यंत्र, ट्रॅक्टर व इतर शेती उपकरणेही खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. हेमा मीना यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची किंमत कायदेशीर उत्पन्नापेक्षा 232% अधिक असल्याचे लोकायुक्तांचे म्हणणे आहे. चौकशीनंतर मीनाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर लोकायुक्तांच्या पथकाने त्यांच्या बिलखिरिया येथील निवासस्थानासह तीन ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली. छाप्यात आतापर्यंत सुमारे 5 ते 7 कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. 30 लाख रुपये किमतीचा टीव्ही सापडला ज्याचा आकार 98 इंच आहे.
छापेमारीत बिलखिरिया येथे बंगला, फार्म हाऊस, लाखोंची कृषी उपकरणे आणि एक डेअरी सापडली आहे. फार्म हाऊसमधून लाखोंची सरकारी उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर त्यांच्याकडे पिटबुल, डॉबरमन जातीच्या कुत्र्यांसह सुमारे 50 परदेशी जातीचे कुत्रे सापडले.
आज तकच्या वृत्तानुसार, हेमा यांच्या डेअरीत सुमारे 60 ते 70 विविध जातींच्या गायी आढळून आल्या. यासोबतच फार्म हाऊसमध्ये एक खास खोलीही आढळून आली, ज्यामध्ये महागडी दारू आणि सिगारेट्स होती. हेमा यांच्या बंगल्यातून 2 ट्रक, 1 टँकर आणि एक थारसह 10 महागडी वाहने जप्त करण्यात आली आहेत. छापा टाकण्याची कारवाई अद्याप पूर्ण झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्ण झाल्यानंतरच एकूण मालमत्तेचे मूल्यांकन केले जाईल असे सांगण्यात आले आहे.