नवरदेवाने लग्नात मागितली बाईक; सासऱ्याने भरमंडपात पाहुण्यांसमोर चप्पलेने हाणला | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

नवरदेवाने लग्नात मागितली बाईक; सासऱ्याने भरमंडपात पाहुण्यांसमोर चप्पलेने हाणला | Viral Video

लहानपणापासून आपण अनेक लग्नाला हजेरी लावली असेल. प्रत्येक मुलीचे वडील लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मेहनत घेत असतात. तर अनेकदा व्यवस्थित तयारी करूनही विघ्न येतात. पण कधीकधी विघ्न न येताही लग्नामध्ये व्यत्यय येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नातील असून नवरदेवाने आपल्या होणाऱ्या सासऱ्याला लग्न लागायच्या वेळेला दुचाकीची मागणी केली. त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी नवरदेवाला थेट चप्पलेने भर मंडपात पाहुणे मंडळींच्या समोर मारहाण केली आहे. वडिलांचा संताप या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

"मी शेत विकून तुला गाडी द्यायची का?" असं सासरा नवरदेवाला मारताना म्हणत आहे. तर नंतर काही लोकांनी मध्यस्थी करून हे भांडणं सोडवल्याचं दिसत आहे. त्यानंतर नवरदेवानेही आपली मागणी मागे घेतली आणि तो लग्नासाठी तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रत्येक बाप आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळण्यासाठी आणि तिला वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. काबाडकष्ट करून पैशांची जमवाजमव करत असतो. पण ऐनवेळी नवरदेवाने दुचाकीची मागणी केल्यामुळे या नवरीच्या वडिलांना संताप अनावर झाला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. "ऐन लग्नामध्ये अशी मागणी करणाऱ्या नवरदेवाला असंच चप्पलने मारायला पाहिजे" अशा कमेंट काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.