टपली का मारली? रिक्षाचालकाने जाब विचारताच चाकूने हल्ला; घटना CCTV मध्ये कैद | Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

टपली का मारली? रिक्षाचालकाने जाब विचारताच चाकूने हल्ला; घटना CCTV मध्ये कैद | Video Viral

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात सकाळी रिक्षाचालक उभे होते. एका दुचाकीस्वाराने एका रिक्षा चालकाच्या डोक्यात टपली मारली. रिक्षा चालकाने टपली का मारली? असे विचारताच दोघे दुचाकीस्वार मागे फिरले आणि त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण करत त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक सीताराम शेवाळे (वय 45) हे जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोघा दुचाकी स्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भर रस्त्यात हा हल्ला होत असताना इतर रिक्षा चालक तसेच नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. कोणीही सीताराम यांच्या मदतीला पुढे आले नाही.

डोंबिवली राहणारे सिताराम हे रिक्षाचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी त्यांनी आपली रिक्षा व्यवसायावर आणली होती. सकाळी 7.15 च्या सुमारास इंदिरा चौकातील कॅनरा बँकेसमोर रिक्षा उभी करून ते चहा पिण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या एका दुचाकी स्वाराने त्यांच्या डोक्यात टपली मारली. यावर त्यांनी डोक्यात टपली का मारली असे विचारताच दुचाकीस्वार मागे फिरले आणि त्यांनी सिताराम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यातील एकाने सीताराम यांच्या हातावर धारदार चाकूने वार करत नंतर तेथून दोघांनी पळ काढला. जखमी सीताराम हे तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांना उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

सिताराम यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात दोघा दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्या आधारे पोलीस दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.

विशेष बाब म्हणजे सिताराम यांच्यावर हल्ला होत असताना इतर रिक्षाचालक देखील तेथे उपस्थित होते. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका यावेळी घेतली. सिताराम यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. सकाळच्या वेळी रस्त्यावर गर्दी असताना अशा प्रकारे चाकू हल्ले शहरात घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेवरून रामनगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारे कोणतीही घटना घडल्यास तेथे उपस्थित नागरिकांनी वाहनांचा नंबर नोंदवून ठेवावा किंवा फोटो काढून ठेवावा जेणेकरून पोलिसांना हे गुन्हे रोखण्यात यश येईल.