
Leopard : आजीसाठी 'ती' बिबट्याशी भिडली! 10 वर्षाच्या नातीनं 60 वर्षाच्या आजीला वाचवलं; मध्यरात्री घडला थरार
मानवाने जंगल तोडल्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसत असतात. वाघ, बिबट्या, गव्यासारखे प्राणी मानववस्तीमध्ये घुसून तेथील प्राण्यावर हल्ला करत असतात, नासधूस करत अशतात. तर बिबट्यांनी माणसांवर हल्ला केल्याचेही प्रकार घडले आहेत.
सध्या अशीच एक घटना समोर आली असून त्यामध्ये एका १० वर्षाच्या चिमुकलीने आपल्या ६० वर्षीय आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं आहे.
ही घटना गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात घडली आहे. येथील लिमखेडा तालुक्यातील दाहोद गावात मंगळवारी रात्री बिबट्या घुसला होता. यावेळी घराच्या बाहेर झोपलेल्या ६० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. चंपा चौहान असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव असून हिरल असं तिच्या शेजारी झोपलेल्या नातीचं नाव आहे.
बिबट्याने हल्ला केल्यानंतर आजीने आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून महिलेच्या शेजारी झोपलेली तिची १० वर्षाची नात हिरल उठली आणि तिने आजीकडे धाव घेतली.
बिबट्या आजीवर हल्ला करत असताना हिरलने आजीकडे धाव घेत आजीला मिठी मारली. त्यानंतर बिबट्याने आजीला सोडलं आणि निघून गेला. नातीच्या प्रेमापुढे बिबट्याची ताकद कमी पडली होती. शेवटी नातीमुळे आजीचा जीव वाचला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांकडून आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या चिमुकलीचे कौतुक केले जात आहे.