
Toilet Break : ऑफिसमध्ये ६-६ तास घेत होता टॉयलेट ब्रेक! कंपनीनं फायर केलंच, कोर्टानेही सुनावलं
कामाच्या ठिकाणी छोटे ब्रेक, लंच ब्रेक घेणं चुकीची गोष्ट नाही. खरंतर कामाच्या मध्ये ब्रेक घेणं ही आपली शारीरिक आणि मानसिक गरजच आहे. मात्र, हा ब्रेक किती वेळ घ्यावा यालाही काही मर्यादा आहे. अन्यथा काम कमी अन् ब्रेक जास्त असं झालं, तर कंपनी तुम्हाला नक्कीच कायमचा ब्रेक घ्यायला लावू शकते.
चीनमधील एका व्यक्तीला नुकताच याचा प्रत्यय आला. कामाच्या ठिकाणी तब्बल सहा-सहा तास टॉयलेट ब्रेक घेतल्यामुळे या व्यक्तीला कामावरून काढून टाकण्यात आलं. साऊथ चायना मार्निंग पोस्ट या चिनी वृत्तपत्राने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.
सहा तासांचा ब्रेक
मिळालेल्या माहितीनुसार, ऑफिसमध्ये दर दोन तासांनंतर ही व्यक्ती वॉशरूमला जात होती. त्यानंतर सुमारे तासभर ही व्यक्ती तिथेच असायची. असं करत करत दिवसाचे सुमारे सहा तास ही व्यक्ती टॉयलेटमध्येच बसून असायची. सुरुवातीला मॅनेजर आणि कंपनीतील इतर लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, ही नित्याची बाब झाल्यानंतर या व्यक्तीला कामावरून काढण्यात आलं. (Man fired for taking long toilet breaks)
कोर्टात घेतली धाव
ही व्यक्ती या कंपनीत सुमारे सात वर्षांपासून काम करत होती. त्याला पोटाचा विकार सुरू झाल्यानंतर त्याने असे मोठे टॉयलेट ब्रेक घेण्यास सुरुवात केली. हे ब्रेक घेणं आपली अपरिहार्यता असल्याचं म्हणत, या व्यक्तीने कंपनीच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात धाव घेतली होती.
कोर्टानेही सुनावलं
सुनावणी सुरू असताना कंपनीच्या एचआरने या व्यक्तीचा वर्क रिपोर्ट कोर्टात सादर केला. कंपनीचा या व्यक्तीच्या ब्रेक घेण्याला आक्षेप नव्हता. मात्र, या ब्रेकमुळे त्याची प्रॉडक्टिव्हिटी अगदी शून्य झाली होती. त्यामुळे कंपनीला असं पाऊल उचलावं लागलं, असा दावा एचआरने केला. हे पाहिल्यानंतर कोर्टाने देखील या व्यक्तीला सुनावत त्याची याचिका रद्द केली.