मोदींसोबत जपानच्या पंतप्रधानांनी खाल्ली पाणीपुरी; "कुणाच्या तोंडाला सुटलं पाणी?" नेटकरी सुसाट | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

मोदींसोबत जपानच्या पंतप्रधानांनी खाल्ली पाणीपुरी; "कुणाच्या तोंडाला सुटलं पाणी?" नेटकरी सुसाट | Viral Video

पाणीपुरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. ठेल्यावरील असो किंवा गाड्यावरील, पाणीपुरी खायला कुणाला आवडणार नाही असं सहसा होत नाही. या पाणीपुरीची आवड जपानच्या पंतप्रधानांना पण लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासोबत पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी ते सोमवारी सकाळी दिल्लीमध्ये आले होते. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला.

दरम्यान, फुमियो किशिदा यांनी दिल्लीतील त्यांच्या पहिल्या दिवशी, सभांना उपस्थित राहण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बुद्ध जयंती पार्कला भेट दिली. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असून, "सुकी पुरी पण खाऊन जा" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

त्याचबरोबर फुमियो किशिदा पाणीपुरी खात असताना नरेंद्र मोदी त्यांच्याकडे पाहताना दिसत आहेत. यावर नेटकऱ्यांनी "कुणाच्या तोंडाला सुटलं पाणी?" अशा कमेंट केल्या आहेत.