Video: पुण्याच्या गार्डन वडापाववर जपानच्या राजदुतांना मारला ताव; म्हणाले, थोडं तिखट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hiroshi Suzuki, Ambassador of Japan

Video: पुण्याच्या गार्डन वडापाववर जपानच्या राजदुतांना मारला ताव; म्हणाले, थोडं तिखट...

पुणे : जागतिक नेत्यांपासून ते हॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण भारतीय स्ट्रीट फूडचे चाहते आहेत. त्यात आता भारत आणि भूतानमधील जपानी राजदूत हिरोशी सुझुकी यांचीही भर पडली आहे. सुझुकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, त्यातही आपल्या पुण्यात. सुझुकी यांनी पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव आणि थोरात बार्बेक्यू मिसळवर चांगलाच ताव मारला.

आपल्या भारतीय स्ट्रीटफूड प्रचंड आवडतात असंही त्यांनी म्हटलं आहे. या पदार्थांचा आस्वाद घेतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना पुणे-ओकायामा फ्रेन्डशिप गार्डन अर्थात पु.ल. देशपांडे उद्यानालाही भेट दिली. (Pune Garden Vada Pav Japanese ambassador Hiroshi Suzuki take taste video shares on twetter)

एका कार्यक्रमासाठी पुण्यात असलेल्या सुझुकी यांनी पुण्याच्या कॅम्प भागातील प्रसिद्ध गार्डन वडापाव जागेवर जाऊन खाल्ला. याचा व्हिडिओ बनवला आणि तो ट्विटही केला. हा वडापाव त्यांना प्रचंड आवडला फक्त थोडं तिखट कमी हवं अशी छोटी तक्रारही त्यांनी केली.

जपानी राजदूताने आपल्या एका ट्विटर फॉलोअर्सच्या सूचनेनुसार पुण्यातील प्रसिद्ध थोरात बारबेक्यू मिसळवर देखील ताव मारला. यामध्ये त्यांना रेस्तराँच्या वेटरनं नाशिकच्या काळ्या मसाल्यातील मिसळ पाव, पुणेरी खट्टामिठ्ठा मिसळचा पर्याय दिला तसेच या मिसळ अनलिमिटेड असल्याचं त्यानं सांगितलं. त्यावर सुझुकी यांनी आश्चर्यही व्यक्त केलं. याचाही व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरुन पोस्ट केला.

दरम्यान, त्यांच्या या पोस्टवर नेटिझन्सनी मोठा प्रतिसाद दिला असून त्यांच्या काही फॉलोवर्सनी त्यांना भारतातल्या इतर भागातील स्वादिष्ट पदार्थ खाऊन पाहण्याचा देखील आग्रह केला. एकानं तर त्यांना सूचवलं की, तुम्ही खूपच स्पाईसी खाल्लं असेल तर तुमचं पोट थंड करण्यासाठी तुम्ही मँगो लस्सी किंवा मँगो आइस्क्रीम खावं, तर एकानं एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला दिला. तर आणखी एका फोलोवरनं त्यांना एखादी पुणेरी स्वीटडिशही खाण्याचा सल्ला दिला. (Marathi Tajya Batmya)

जपानच्या पंतप्रधानांनीही खाल्ली होती पाणीपुरी

यापूर्वी मार्चमध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी भारत दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तिथं अस्सल भारतीय स्ट्रीट फूड गोलगप्पे अर्थात पाणीपुरीचा आस्वाद घेतला होता. त्याचबरोबर 'आम पन्ना' आणि 'लस्सी' हे भारतीय पदार्थही चाखले होते.

टॅग्स :Pune NewsJapan