R. K. Narayan: 'मालगुडी डे' चे जनक आर के नारायण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्याचं स्मरण... जाणून घ्या त्यांच्याबद्दल

आरके नारायण यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
R. K. Narayan
R. K. Narayansakal

आरके नारायण यांची गणना इंग्रजी साहित्यातील महान कादंबरीकारांमध्ये केली जाते. दक्षिण भारतातील मालगुडी या काल्पनिक शहरावर त्यांनी त्यांची रचना केली. 10 ऑक्टोबर 1906 रोजी जन्मलेल्या नारायण यांना त्यांच्या 'गाईड' या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांना पद्मविभूषणनेही सन्मानित करण्यात आले. त्यांच्या 'गाईड' या कादंबरीवर आधारित चित्रपटाने त्यांना लोकप्रियतेचा आणखी एक परिमाण दिला, जो आजही स्मरणात आहे.

'मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे आहे.

नारायण यांनी १९३५ साली मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी नारायण यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना या गोष्टी वाचून मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले.

पुढाकार घेऊन त्यांनी नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक खूप गाजले. नारायण यांनी त्यानंतर एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.

वाचक या गोष्टी वाचताना त्यात हरवून जातात. पूर्णपणे हे गाव काल्पनिक आहे यावर अनेक लोकांचा विश्वास बसत नाही, नारायण यांनी इतके वास्तववादी चित्रण आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट देखील निघाला. श्री.ज.जोशी यांनी दि गाईडचे मराठी रूपांतर केले आहे. मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही आर.के.नारायण यांचे चित्रपट निघाले आहेत.

तसेच आर.के.नारायण यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. ‘मालगुडी डेज्’ या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.

लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारण देखील करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे ३९ भाग प्रसारित झाले होते. या मालिकेत ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते.

काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. नारायण यांची तुलना साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. नारायण यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान नारायण यांना मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com